बातम्या

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून दहा एकर परिसरात तयार होणार ‘भीमपार्क’

मुंबई : जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे, अभ्यासकांसाठी महत्वाचे आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणारे ‘भीमपार्क’ उभारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, पालीभाषा , बौद्ध धम्म आणि पर्यटन या विषयाचे अभ्यासक या सर्वांच्या सूचनांचे स्वागत करुन हा प्रकल्प उभारण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून अजिंठा जवळील फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीमपार्क उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन हा प्रकल्प उभा राहणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावळे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, औरंगाबाद येथिल भन्ते करुनानंद थेरो, नांदेडचे भन्ते विनय बोधी, पुर्णाचे भन्ते उपगुप्त, नासिकचे पाली भाषा अभ्यासक, अतुल भोसेकर, धम्म अभ्यासक डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. ऋषीकेश कांबळे, पुण्याचे डॉ. बबन जोगदंड, मुंबई विद्यापिठाचे डॉ. लक्ष्मण सोनवणे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती वंदना घेवराईकर, नाशिकचे नरेंद्र तेजाळे, लातुरचे यशवंत भंडारे व इतर संबधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी तयार होत असलेल्या स्मारकासाठी अभ्यासपूर्ण लेखी सूचना मागविण्यात येतील. या प्रकारच्या इतर स्मारकांना भेटी देण्यासाठी अभ्यासगटाची नेमणूक करण्यात येईल.

पर्यटन विभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून यात डॉ.बाबासाहेब यांचे जीवन ,त्यांचे कार्य आणि त्यांनी केलेली चळवळ, त्यावेळेचे मंत्री, भारतीय राज्यघटनेमधील सहभाग या सर्व बाबींचा समावेश असेल.

दहा एकर परिसरात तयार होणाऱ्या या प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आणि सुमारे 25 कोटी रुपये लागतील. हा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.

या प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे सर्व मान्यवरांनी आभार मानले. या प्रकल्पाच्या उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. मान्यवरांनी महत्वपुर्ण सूचनाही केल्या.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक भूमिकेसह धार्मिक, आर्थिक आणि राजकीय निती याचा समावेश असावा
• राज्यातील सर्व लेण्यांची माहिती देणारे दालन असावे
• डॉ.आंबेडकर संरक्षण, आंतरराष्ट्रीय धोरण, कामगार, महिला यासारख्या क्षेत्रातील कामांची माहिती इथे मिळावी
• विदेशी पर्यटकांना संशोधनासाठी अभ्यासाची, राहण्याची सोय असावी.
• महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज यांच्यासह सयाजी महाराज गायकवाड यांच्या कामाचीही माहिती मिळावी
• डॉ. आंबेडकर लिहिलेले मराठीसह भिन्न भाषेतील साहित्य उपलब्ध असावे.
• माता रमाई यांच्या विषयीचे दालन असावे
• सम्राट अशोकाने केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाची माहिती असावी
• या ठिकाणी महोत्सव आयोजित करावेत
• भगवान गौतम बुद्ध यांची पूर्णाकृती मुर्ती असावी
• पंचशिलाची माहिती द्यावी
• सातत्याने अभ्यासपूर्ण भर टाकण्यासाठी अभ्यासक नेमावेत

या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून पुन्हा बैठक घेण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.