ब्लॉग

दलित हिंदू नाही म्हणत ‘या’ अस्पृश्य नेत्याने १८९८ साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती

तामिळनाडूतील अस्पृश्य (पारियार) समाजातील अयोथीदासार (आययोथी थास, अयोध्यादास) यांनी १८९८ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन तामिळ मधील (वैदिक) धर्मांध लोकांना हादरा दिला होता. बौद्ध धम्मच आपला मूळ धर्म आहे, असा युक्तिवाद करून त्यांनी पारियार या अस्पृश्य जातीतील लोकांना बुद्ध धम्म स्वीकारण्यास सांगितले होते.

अयोथीदासार यांनी फक्त धर्मांतरच केले नाहीतर मद्रास जवळ पेरंबुर येथे साऊथ इंडिया बुद्धिस्ट असोसिएशन स्थापन केले होते. विशेष म्हणजे ही संस्था आजही अस्तित्वात आहे.

अयोथीदासार हे तामिळ मधील जातीभेद विरोधी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. तामिळ, सिद्ध औषध, तत्त्वज्ञान, इंग्रजी, संस्कृत आणि पाली या भाषांमध्ये साहित्य ज्ञान होते. अयोध्यादास यांचा जन्म 20 मे 1845 रोजी मद्रास (सध्या चेन्नई) येथे झाला होता, त्यानंतर ते निलगिरी जिल्ह्यात स्थायिक झाले होते. १८७६ मध्ये, त्यांनी अद्वैतानंद सभेची स्थापना केली आणि रेव्ह. जॉन राथिनाम यांच्या सहकार्याने द्रविड पांदियन नावाचे मासिक सुरू केले.

१८८६ मध्ये अयोथीदासार यांनी एक क्रांतिकारक घोषणा केली की अनुसूचित जातीचे (अस्पृश्य) लोक (दलित) हिंदू नाहीत. या घोषणेनंतर त्यांनी 1891 मध्ये “द्रविड महाजना सभा” स्थापन केली. श्रीलंकेच्या बौद्ध पुनरुत्थानवादी अनागरिका धर्मपाल यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अयोथीदासार हे चळवळ करीत होते. त्याचवेळी कर्नल हेनरी स्टील ऑलकोट यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवन कार्यात होते.

अयोथीदासार यांनी आपल्या अनुयायांसह कर्नल हेनरी स्टील ऑलकोट यांची भेट घेतली आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्त केली. अयोथीदासार यांच्या म्हणण्यानुसार, तामिळ मधील पारियार जात समूहाचे लोक हे मूळचे बौद्ध होते तर आर्यांच्या आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या जमीनी लुटून मालक झाले.

ऑलकोट यांच्या मदतीने अयोथीदासार यांनी सिलोनला (श्रीलंका) गेले आणि सिंहली बौद्ध भिक्खू सुमंगला नायकेकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे भारतातील पहिले अस्पृश्य व्यक्ती ठरले. श्रीलंकेवरून परत आल्यावर अयोथीदासार यांनी मद्रास जवळ पेरंबुर येथे १८९८ साली ‘साऊथ इंडिया बुद्धिस्ट असोसिएशन’ स्थापन केली. अयोथीदासार यांनी ‘बुद्धरदम अदिवेदम’ हे एक महत्वाचे पुस्तक तामिळ भाषेत लिहले. तसेच साऊथ इंडिया बुद्धिस्ट असोसिएशन तर्फे एक साप्ताहिक सुद्धा सुरु केले होते. मात्र १९१४ साली त्यांच्या निधनानंतर बंद पडले.

बाबासाहेबांनी पेरंबुर विहारला भेट दिली

पेरंबुर येथे साऊथ इंडिया बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने एक बुद्ध विहार बांधण्यात आले होते. १९५४ मध्ये बाबासाहेबांनी पेरंबुर येथील बौद्ध विहारला भेट दिली होती. बाबासाहेब त्यावेळी दक्षिणेकडील बौद्ध धर्मावर संशोधन करत काही दिवस प्रवास केला होता. बाबासाहेबांच्या या भेटीचा उल्लेख शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ.आंबेडकर भाषण व लेखन, खंड १७ भाग ३ मध्ये केलेला आहे.

– जयपाल गायकवाड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *