ब्लॉग

कान्हेरी लेणी पन्नास वर्षांपूर्वीची

बोरिवलीची ‘कान्हेरी लेणी’ म्हणजे मुंबईच्या सान्निध्यात असलेला सर्वात सुंदर प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा होय. इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.११ व्या शतकापर्यंत विकसित झालेल्या या लेण्या म्हणजे मुंबईचा एक अनमोल ठेवा आहे. सुंदर बुद्ध शिल्पे, स्तुप, चैत्यगृह, विहार, सभागृह, निवासस्थाने, शिलालेख, पाण्याची असंख्य कुंडे, बोधिसत्व आणि पद्मपाणी बुद्ध यांची शिल्पे असा असंख्य बौद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा तेथे दृष्टीस पडतो.

मुंबईपासून हे ठिकाण अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. शंभराच्यावर तेथे लेण्यां असून आजूबाजूस पसरलेल्या बोरवली नॅशनल पार्कमुळे या परिसराला निसर्ग सान्निध्याची जोड मिळाली आहे. बोरिवलीची कान्हेरी लेणी,अंधेरीची कोंडीवटे लेणी, मागाठणे लेणी, जोगेश्वरी लेणी, विरारची जिवदानी लेणी, गोरेगावची पडन लेणी, डुंगी लेणी (पनवेल-उरण), नाहूरचा ताम्रपट (भांडूप), कल्हार शिलालेख (भिवंडी), कण्हेर व पेल्हार शिलालेख (वसई), आकुर्ली शिलालेख आणि नालासोपारा स्तुप या सर्व प्राचीन बौद्ध स्थळांच्या सान्निध्यामुळे एकेकाळी मुंबईचा परिसर बुद्धांच्या जयघोषाने दुमदुमला होता याची साक्ष देतात.

पन्नास वर्षांपूर्वी जेंव्हा या कान्हेरी लेण्या इयत्ता चौथीत असताना बघितल्या तेंव्हा परिस्थिती पुर्णतः वेगळी होती. पूर्व व पश्चिम उपनगरे आताच्या सारखी गजबजलेली नव्हती. मराठी लोकांची वस्ती ठिकठिकाणी दिसत होती. त्याकाळी अभ्युदय नगर, काळाचौकी येथे रहात असताना १९६९-७० च्या दरम्यान या लेण्यां आईवडिलांसोबत बघितल्याचे आजही मला अप्रूप वाटते. लोकल ट्रेनने बोरीवलीला सकाळी गेलो तेंव्हा स्टेशन बाहेरच कान्हेरी लेणीस जाणारी बेस्ट बस होती. आम्ही जेव्हा लेण्यांपाशी गेलो तेंव्हा शांत वातावरणातील, काळ्या कातळातील या लेण्यां पाहताना भान हरपून गेले होते. सुट्टीचा दिवस असून देखील त्यावेळी इतर दर्शक बिलकुल नव्हते.

आईवडील आणि बहिणभावंडा सोबत तिथे खूप फिरलो. आईने सर्वांना घेऊन बुद्ध वंदना घेतली. त्यामुळे लहानपणापासून काळ्या कातळातील लेण्यांचा मृदुभाव अंतरी वसला. आणि त्याची आवड निर्माण झाली ती आजतागायत कायम आहे. वडिलांनी काढलेले कान्हेरी लेणींचे काही फोटो आजही संग्रहात आहेत. कृष्णधवल फोटोग्राफीचा तो जमाना होता. आजही त्याच्या काही निगेटिव्ह जपून ठेवल्या आहेत. इतिहासाची पाने लिहिताना हे फोटो आंतरिक समाधान देतात तसेच काळ्या कातळातील धम्माच्या आविष्काराने पुन्हा बळ प्राप्त होते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)