ब्लॉग

महायान, हीनयान नव्हे एकायनच!

बौद्ध धम्माने अखिल विश्वाला समता, स्वातंत्र्य व मित्रता या तत्वत्रयीचा मार्ग दिला. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या वाटेवर चालून शील विशुद्धी, चित्त विशुद्धी आणि दृष्टी विशुद्धी सोबतच उपरोक्त तत्वत्रयीच्या कृतिशील मार्गाने भौतिक विशुद्धीचा मार्ग देखील प्रशस्त होतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या माध्यमातून अधोरेखित केले.

काळाच्या ओघात धम्मात अनेक यान निर्माण झाले होते. अर्थातच त्यामागे तात्विक मुद्दे तर होतेच सोबतच मनुष्य स्वभावाच्या स्वाभाविक प्रवृत्ती देखील कारणीभूत होत्या. विविध यानातील मतभेदांमुळे प्रतिक्रांतीवाद्यांचे चांगलेच फावले होते ही गोष्ट उघड आहे. सद्धम्मातील सज्जन उपासक उपासिकांनी पूजनीय भिक्खू-भिक्खुनी संघांच्या मार्गदर्शनाखाली पंथ म्हणून पुढे आलेल्या या यानांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता याची साक्ष अजिंठा लेण्यातील लेणी क्रमांक १९ आणि २६ देतात.

एवढेच नव्हे तर १९५० ला कोलंबो, श्रीलंकेत झालेल्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स च्या बृहत कार्यक्रमात बौद्ध जगतातील सर्व राष्ट्रांनी आणि बौद्ध विद्वानांनी एकमताने ठराव पारित केला की हीनयान हा शब्द गाळून टाकण्यात यावा. मूळ बुद्धवचनांमध्ये आपण जेंव्हा पाहतो तेंव्हा एक महत्वपूर्ण बाब समोर येते, की, खुद्द शास्त्याने या मार्गाला एक नामाभिधान दिलं आहे. दीघनिकायातील महासतीपठ्ठान सुत्तात तथागत म्हणतात,

” एकायनो अयं, भिक्खवे, मग्गो सत्तानं विसुद्धीया,…”

मराठी अनुवाद– भिक्खुनो शुद्धीचा एकच मार्ग आहे

यावरून लक्षात येते की मूळ धम्म संदेश हा न हीनयान आहे न महायान तो केवळ एकायनच आहे. बाबासाहेबांनी १९५६ ला केलेल्या अभूतपूर्व धम्मक्रांतीला नवयान वगैरे संबोधन सध्या प्रचलित होत आहे. धम्म तत्वे ही कुठल्याही यानात बंदिस्त न करता, मूळ बुद्धवचनांचा अर्थ आम्हाला समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेला ‘The Buddha And His Dhamma’ या ग्रंथराजबरोबरच ‘Buddha or Karl Marx’ आणि ‘Revolution and Counter Revolution in Ancient India’ हे दोन पुस्तके वाचने आवश्यक आहे.

पवनकुमार शिंदे , राष्ट्र हितकारिणी सभा

संदर्भ : 
१) Archeological Survey of India., ‘Ajanta’, 2004. P.82,92.
२) Buddhist Missionary Society., ‘Gems of Buddhist Wisdom’., Reprinted and donated by The Corporate body of Buddha Educational Foundation, Taiwan., P.457.
३) विपश्यना विशोधन विन्यास इगतपुरी., ‘महासतीपठ्ठानसुत्त’., १९९६, मूलपाठ पृ २.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *