ब्लॉग

…म्हणून बाबासाहेबांनी नागभूमीत धम्माची दीक्षा दिली

नाग संस्कृतीने भारताला फार मोठी देण दिलेली होती. नागांची समाजव्यवस्था ही समानता व बंधुत्वाच्या सिध्दांतावर आधारित होती. सर्वच समाज घटकांना समान हक्क प्राप्त होते. त्यांची शासनप्रणाली ही गणतंत्रात्मक अथवा गणराज्याच्या अथवा संघगणाच्या सर्वच घटकांना समान दर्जाचे मानले जात असे. सर्वच समाज घटक समान पातळीवर मानण्यात येत असल्यामुळे जातिविहिन समाज हा नागांच्या समाजव्यवस्थेचा कणा होता. या नाग संस्कृतीची सांगड बुद्धाच्या तत्वविचारांशी घालण्यात आल्यामुळे तिला बौद्ध धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले. त्यादृष्टीने भारतीय जीवनार जातिविहिन एकात्म समाज विकसित करण्याच्या प्रक्रियेत नाग संस्कृतीचे स्थान सर्वश्रेष्ठ मानावे लागेल.

महाराष्ट्राचा महार हा याच नाग संस्कृतीचा घटक होता. त्यांनी महाराष्ट्राच्या आद्य संस्कृतीचा विकास घडविला. परंतु या देशात घडून आलेल्या सांस्कृतिक विकासाच्या क्रांती आणि प्रतिक्रियावादी प्रतिक्रांतीच्या संघर्षात विकासवादी गतीला अवरोध करण्यात आला. सांस्कृतिक विकासाला परंपरेच्या रूढीवादाच्या अंधश्रध्देच्या कोंडवाड्यात बंदिस्त केले गेले आणि महार हा धर्मबाह्य बहिष्कृत. मध्यंतरीच्या अनेक शतकांमध्ये या महार जातीला आपल्या महान नाग संस्कृतीचा व धर्माचा विसर पडलेला होता.

परंतु विसाव्या शतकात उदयास आलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषाने अज्ञानांधकारात व हिंदू धर्माच्या गुलामगिरीच्या जोखडाखाली जीवन जगणाऱ्या या समाजाला त्याच्या अस्मितेची, थोर संस्कृतीची आणि त्यांच्या पूर्वजांच्या असलेल्या मानवता व श्रेष्ठ धर्माची जाणीव करुन दिली. नाहीतर पूरे एक हजार वर्षे हा समाज हिंदू धर्माच्या सीमारेषेवर राहून बहिष्कृताचे जीवनेच जगत राहिला. ज्या हिंदू धर्माने त्यांना आपल्या देवाच्या मंदिराची पायरी देखील ओलांडू दिली नाही, हिंदू धर्माने आपले म्हणण्यासारखे त्यांना काय दिले बरे! त्यामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने या समाजाने अगतीक धर्माची सर्व बंधने झुगारून दिली आणि त्या महापुरूषाने १४ आॅक्टोबर १९५६ ला महाराष्ट्राच्या या नागभूमीत या समाजाला त्यांचा वारसा असलेल्या भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली.

समता, बंधुत्व, मानवता व एकात्मता या महान तत्वांचा आदर्श भारतीय जनतेसमोर पुन्हा एकदा उभा राहावा म्हणून सांस्कृतिक क्रांतीची घोषणा दिली. बौध्द धम्माचा वारसा या देशाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. याचा अर्थ असा की, एके काळी या देशात समानतेवर आधारित जातिविहिन समाजव्यवस्था प्राचीन नागांच्या संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग होते आणि त्या संस्कृतीला भगवान बुद्धाच्या मानवतावादी धम्माचे अधिष्ठान होते, त्या संस्कृतीचा मानवतेच्या एकात्मतेचा वारसा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीच्या संदर्भात या देशाला दिला आहे.

संग्राहक -इंजि. सुरज तळवटकर

3 Replies to “…म्हणून बाबासाहेबांनी नागभूमीत धम्माची दीक्षा दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *