जगभरातील बुद्ध धम्म

हजारो वर्षे जुना असलेला ”या” देशातील ”बोधिवृक्ष” अतिरेक्यांनी नष्ट केला

पाकिस्तानातील इस्लामाबाद शहराजवळ असलेल्या जंगल भागात एक मोठा पिंपळ वृक्ष मरगला टेकडीच्या पायथ्याशी होता. हा इस्लामबादचा भाग सेक्टर-७ असा ओळखला जातो. या पुरातन वृक्षाच्या फांद्या सगळीकडे झाकोळल्या होत्या. जशी काय मोठी वृक्षछत्रीच पसरलेली दिसत असे. इस्लामाबादचे रहिवासी या पिंपळवृक्षाबद्दल तसे अनभिज्ञ होते. तथापि आशिया खंडातील बौद्ध देशातून काही पर्यटक तसेच राजदूत व त्यांचे कर्मचारी येथे येऊन या झाडाला वंदन करीत असत. कोणीतरी तेथे काँक्रीटचे आश्रयस्थान देखील उभारले होते. तेथे बसून परदेशी पर्यटक शांत वातावरणात ध्यानधारणा करीत. बोधिवृक्ष म्हणून कोरियन पर्यटक त्याला वंदन करीत.

पाकिस्तानात १९७० पूर्वी इतिहास विषय शिकवताना बौद्ध धर्माचा इतिहास सुद्धा शिकविला जात असे. मात्र १९७० नंतर सर्व विद्यापीठातून इस्लामच्या अगोदरचा इतिहास शिकविणे बंद झाले. खरेतर तक्षशिला विद्यापीठ, असंख्य मॉनेस्ट्री ( संघाराम ), विहार, गांधार कलाशिल्पे आणि स्तूप यांच्या पुरातन अवशेषांची रेलचेल या भागात आहे. सम्राट अशोकाच्या काळात धम्माचा प्रसार झाल्यावर मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखालील हा भाग गांधार शिल्पकलेचे मोठे केंद्र होते.

इस्लामाबादचा परिसर आणि पेशावरचा भाग येथे बौद्ध संस्कृतीची नगरे होती. चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते असे इतिहास सांगतो. आणि येथेच ‘शाह अल्लाह दिट्टा’ गावात बौद्ध लेण्या आहेत. यास्तव हा अवाढव्य पिंपळवृक्ष हा बौद्ध संस्कृतीच्या इतिहासाचा मोठा ठेवा होता. मूळ बोधीवृक्षाची फांदी येथे आणून लावली असावी असा ईतिहासकारांचा दावा आहे. यामुळे आशिया खंडातील तैवान, कोरिया देशातून बौद्ध पर्यटक दरवर्षी येथे येऊन बोधिवृक्षास भेट देत होते.

मात्र १९८० नंतर सर्व चित्र पालटले. पाकिस्तानचे जनरल झिया उल हक यांनी इस्लामीकरण करण्याचा नारा दिला. देशभर मदरशांचे बांधकामास प्रोत्साहन देण्यात आले. त्यामध्ये एक मदरसा मरगला टेकडीपाशी स्थापन झाला. त्याचा विकास करताना सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली. झाडांची कत्तल करून पटांगणे तयार झाली. आणि सर्वात कडी म्हणजे मदरसा जवळील अवाढव्य पिंपळवृक्षास आग लावण्यात आली. या घटनेची दखल तेथील मीडियाने घेतली. या घटनेत काही धर्मांध लोकांचा हात असल्याचे दिसून आले. ते तालिबानचेच अनुकरण करत होते.

तथापि बोधिवृक्षाला आग लावली तरी वृक्ष नष्ट झाला नाही. कारण त्याचा घेर मोठा होता. टीका झाल्यावर शहर व्यवस्थापनाने वृक्ष जपण्याचा प्रयत्न केला. सभोवताली लोखंडी जाळी लावली. परंतु २००८ मध्ये तेथील अतिरेक्यांनी उरलेला वृक्ष सुद्धा नष्ट केला. त्याचबरोबर तेथे ध्यानधारणा करण्याचे आश्रयस्थान सुद्धा नष्ट केले. बसण्यासाठी लावलेली बेंचेस नाहीशी केली. थोडक्यात धर्मांधता माणसाला किती अमानुष बनवते हे दिसून आले. तेथील हरितपट्टा उध्वस्त केलाच त्याचबरोबर एका डेरेदार पुरातन पिंपळवृक्षाची विनाकारण वाताहात केली.

या गोष्टीस आता १२ वर्षे झाली असून तेथील मदरसा अजून मोठा झाला आहे. उरलेले जंगल नष्ट होत चालले आहे. मैदाने उभी राहिली आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नायनाट होत चालला आहे. भारतात देखील परिस्थिती वेगळी नाही. दया, क्षमा, शांती, करुणा, सहनशीलता हे सद्गुण लोप पावत चालले आहेत.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)