ब्लॉग

बोधिसत्व मंजुवरा : अशा शिल्पांमधून भारतीय बौद्ध मूर्ती कलेची प्रगल्भता दिसून येते

भारतीय बौद्ध मूर्तीकलेमध्ये ज्या काही मूर्ती घडवल्या गेल्या नंतरच्या कालखंडात त्या मूर्तीपासून प्रेरित होऊन इतरही पंथांत मूर्ती निर्माण झाल्या. बौद्ध धम्मातील हीनयाबून व महायान या पंथातील मत-मतांतरे यामुळे मूर्ती कलेला प्रारंभ झाला. परंतु नंतरच्या काळात बौद्धमूर्ती कलेत इतर देव-देवतांच्या मूर्तींचा शिरकाव झाला.

बौद्ध धम्मात बोधिसत्व या संकल्पनेला महत्त्व दिले आहे. बुद्धत्त्वाकडे जाण्याची पहिली पायरी म्हणजे बोधिसत्व ही अवस्था होय. मग या बोधिसत्वांची महती सांगणारा जातक कथासंग्रह तयार झाला आणि अनेक बोधिसत्वांची माहिती समोर आली. त्यापैकी आपण बोधिसत्व मंजूवरा यांच्या शिल्पा विषयी माहिती पाहणार आहोत. प्रस्तुत शिल्प हे बांगलादेशातील वस्तुसंग्रहालयात आहे.

बोधिसत्व मंजूवरा कमलपुष्पावर पद्मासनात विराजमान आहेत. शिल्पास तीन मुख आणि सहा हात आहेत. तीन मुखांच्या डोक्यावर करंडक मुकुट असून मधल्या चेहऱ्यावर कपाळावर तिसरा नेत्र आहे. कानात चक्राकार कुंडले, गळ्यात हार, उपाहार, स्कन्दमाला, केयुर ,कटक वलय, कटीसूत्र, पादवलयलं इत्यादी अलंकार शिल्पाच्या अंगाखांद्यावर अंकित केलेले आहेत.

शिल्पास एकूण सहा हात असून त्यातील समोरील दोन्ही हात छातीशी एकमेकांविरुद्ध धरले आहेत. ते हात भंगलेले आहेत. खालच्या उजव्या दोन नंबरच्या हातात बाण असावा. तोही भंगलेला आहे. वरच्या तिसऱ्या उजव्या हातात घेतलेली तलवार मुगुटाच्या वरपर्यंत दाखवलेली आहे. डाव्या वरच्या हातात पूर्ण विकसित कमलपुष्प आहे. डाव्या खालच्या हातात धनुष्य आहे. मूर्तीचा चेहरा अतिशय शांत असून चेहर्‍यावर दिव्य हास्य आहे. डोळे अर्धोन्मिलीत आहेत.

शिल्पाच्या मुकुटाच्या वरच्या बाजूस तीन अर्धवर्तुळाकार नक्षी आहेत. श्रृंगावर गज,सिंह, मकरव्याल व छोट्या स्तूपांच्या आकारात मधोमध पाच स्त्री देवता अंकित केलेल्या आहेत. अत्यंत रेखीव असणारू हे शिल्प सद्यस्थितीला बांगलादेशात आहे. अशा शिल्पांमधून भारतीय बौद्ध मूर्ती कलेची प्रगल्भता दिसून येते.

डाॅ.धम्मपाल माशाळकर
मूर्ती अभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ,सोलापूर