ब्लॉग

बोधिसत्व सुगतीदर्शन लोकेतेश्वर; ही मूर्ती बौद्ध धम्मातील वज्रयान पंथाची लोकप्रिय देवता

भारतीय बौद्ध मूर्तिकलेचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, सुरुवातीच्या काळात ज्या बौद्धधर्माने मूर्तिपूजेला विरोध केला त्याच धर्मात हीनयान व महायान पंथाच्या विभीन्न विचारसरणीतून मूर्तिकलेचा प्रारंभ झाला आणि अनेक मूर्ती निर्माण झाल्या. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगणाऱ्या मूर्ती, यक्ष ,गंधर्व, किन्नर, द्वारपाल ,बोधिसत्व यासारख्या असंख्य मूर्ती तयार झाल्या. चतुर्भुज, षडभुज, अष्टभुज, दशभुज अशा प्रतिमा बौद्ध धर्मातही तयार झालेल्या दिसून येतात.

बौद्ध मूर्तीकले वज्रयान पंथात बोधिसत्त्वा चे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी प्रस्तुत मूर्तीही सुगत दर्शन लोकेश्वराची आहे. ही मूर्ती बौद्ध धम्मातील वज्रयान पंथाची लोकप्रिय देवता आहे. प्रस्तुत मूर्ती समपाद-अवस्थेत उभी असून षडभुज आहे .प्रदक्षणा क्रमाने उजवा खालचा हात अभय मुद्रित आहे. उजव्या मधल्या हातात शंख आहे. उजव्या वरच्या हातात जपमाळ आहे. डाव्या वरच्या हातात पाश, डाव्या मधल्या हातात कमलपुष्प व डाव्या खालच्या हातात कलश आहे.

डोक्यावर जटा मुकुट आहे. जटामुकुटाच्या मधोमध बुद्धप्रतिमा अंकीत केलेली आहे. कानातील चक्राकार कुंडले खांद्यावर विसावलेली आहेत. गळ्यात हार, केयुर ,कटकवलय, कटीसूत्र, उरूद्दाम, मुक्तद्दाम व उजव्या खांद्यावरून डाव्या कमरेपर्यंत यज्ञोपवीतसम अलंकार परिधान केलेले आहेत. वस्त्राच्या मोत्याच्या लडी मांडीवर रूळलेल्या आहेत. नेसूचे वस्त्र पायाच्या घोट्याच्या वर पर्यंत आहे. वस्त्राचा सोगा दोन्ही पायाच्या मधोमध सोडला असल्याचे अत्यंत खुबीने अंकित केलेले आहे. मूर्ती कमलासनावर स्थित आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस त्याच्या शक्ती आहेत. उजवीकडे तारा उभी आहे तर डाव्या बाजूस भुकटी उभी आहे.

तारा द्विभुज असून भृकुटि चतुर्भुज आहे. तारा अंजली मुद्रेत असून भृकुटी ही अंजली मुद्रेत आहे. भृकुटिचा मागील उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्या हातात कलश आहे.लोकेश्वराचा चेहरा प्रसन्न व शांत असून डोळे अर्धौन्मिलीत आहेत. श्रृंगावरील सुबक नक्षी अत्यंत उठावदारपणा अंकित केल्याने मूर्ती आकर्षक दिसते. मूर्तीच्या एकंदरीत लक्षणावरून ही मूर्ती बोधिसत्व सुगतीदर्शन लोकेश्वराची ठरते.

डाॅ.धम्मपाल माशाळकर
मूर्ती अभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ,सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *