ब्लॉग

बोधिसत्व पद्मपाणि आणि अजिंठा

भारतातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांना अंकित केल्याचे दिसून येते. बुद्ध पदाला पोहोचण्यापूर्वी अनेक जन्मात बोधिसत्व म्हणून जन्म घेतला पाहिजे असे म्हटले गेलेले आहे. अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक १ मध्ये बोधिसत्व पद्मपाणी यांचे भित्तीचित्र आहे. आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध पावलेले आहे. ज्याने हातात कमळ धरलेले आहे तो बोधिसत्व पद्मपाणि होय.

इ.स.२-३ ऱ्या शतकातील भारतीय चित्रकलेला अजरामर करणाऱ्या या अप्रतिम सुंदर भित्तिचित्राने जगातील सर्व कलाप्रेमींना संमोहित केलेले आहे. भारतामध्ये अनेक लेण्यांच्या भित्तीचित्रात किंवा शिल्पांमध्ये पद्मपाणी आणि वज्रपाणी आपल्याला पाहायला मिळतात. पद्मपाणिच्या हातात देठासकट कमळपुष्प असते व दुसऱ्या हाताने उपासकांना संरक्षण देत आहे असे दाखविलेले असते तर वज्रपाणी बोधिसत्वाच्या उजव्या हातात शंख असतो व डाव्या हातात वज्र असते. कधी कधी त्यांना तीन डोकी आणि सहा हात दाखविलेले असतात. शक्ती नावाची स्त्री त्याच्या शेजारी बसलेली असते.

अजिंठा लेणी क्रमांक एक मधील पद्मपाणी बोधिसत्वाचे अप्रतिम भित्तीचित्र. जगभर या चित्राने कलाप्रेमींना भुरळ घातलेली आहे.

अजिंठ्याच्या चित्रशैली आधी बुद्धांच्या जीवनातले प्रसंग पाषाण शिल्पाद्वारे कोरण्याचा प्रघात दिसून येत होता. पण या शिल्पकारानां जागेच्या मर्यादेमुळे चौकटी बाहेर जाता येत नव्हते. आवश्यक ते हावभाव शिल्पांच्या चेहऱ्यावर दाखवता येत नव्हते. आणि म्हणूनच अजिंठा लेण्यांमधील भित्तीचित्रांना पाहताना त्याकाळच्या चित्रकारांनी आपली कलाकृती अधिक वेधकपणे चित्तारली असल्याचे आढळते. मानवी स्वभावाचे विविध पैलू, प्राणी, प्रतीके, स्त्रीयां, राजघराण्यातील व्यक्ती आणि जातक कथा यातून बुद्धांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न चित्रकारांनी केलेला दिसतो. थेरवादी पंथामध्ये बोधिसत्व म्हणजे अष्टांगिक मार्गाने चालून बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी जवळ पोहोचलेली व्यक्ती आहे तर महायानी विचारसरणीतील बोधिसत्व हा प्राणीमात्रावर उपकार करणारा, त्यांना मदत करणारा, आणि सर्वांचा हितचिंतक आहे. तो स्वतः बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही.

वास्तविक आपण सर्व थेरवादी बौद्ध परंपरा पाळतो. त्रिपिटकास महत्त्व देतो. परंतु आपल्या आजूबाजूस असणाऱ्या लेण्यांमधून आपल्याला असे दिसून येते की महायान पंथाचा देखील विकास खूप झाला होता. या महायन पंथाच्या संस्कृत ग्रंथाबरोबर अनेक हिंदू संस्कृत ग्रंथांची रचना दुसऱ्या तिसऱ्या शतकात करण्यात आली. अनेक देवदेवतांचा मूळ उगम महायान पंथात झाला होता. त्याच देवदेवता आज इतर धर्मात विविध नावांनी रूढ झालेल्या आढळून येतात. मंजुश्री, वज्रपाणी, तारा, प्रज्ञापार्मिता, मारीची, जांबाल, त्रैलोक्य विजय, हरिती, मैत्रेय, वसुंधरा, विश्वपाणि, ज्ञानकेतू, घंटापाणि, सरस्वती, अपराजिता, लोचना, पांडुरा अशा अनेक देवता यक्ष, किन्नर, गरुड, नाग यांचे सोबत विराजमान झाल्याचे दिसून येतात. अजिंठ्यात दाखविलेला बोधिसत्व पद्मपाणि हा अजानबाहू, गोरा, रुंद कपाळ आणि भरदार छाती असलेला असून चेहऱ्यावर सोज्वळ भाव आहेत. डोक्यावर रत्नजडित मुकुट असून हातात निळसर पांढऱ्या रंगाचे कमल पुष्प धरलेले आहे. त्याच्या नेसलेल्या वस्त्रावरून त्या काळातील वस्त्रप्रावर्णाची पद्धत लक्षात येते. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वैशिष्ट्यपूर्ण लय प्राप्त झाल्यामुळे हा पद्मपाणी अधिकच आकर्षक आणि प्रसन्न दिसतो. मात्र या पद्मपाणीची राणी सावळ्या रंगात रंगवली गेली आहे.

तरीही अजिंठ्याची कृष्ण सुंदरी म्हणून ओळखली जाणारी तिची प्रतिमा कमालीची सुंदर आणि सुडौल आहे. या निमित्ताने विष्णुदास नाम्याची स्वामिनी देखील काळी असल्याचे अभंगात नमूद केलेले आठवते. बोधिसत्व पद्मपाणि यांच्या बद्दल विस्तृतपणे वाचायचे असल्यास २२ एप्रिल २०१९ रोजीचा साप्ताहिक सकाळचा अंक वाचावा. त्यातील राधिका टिपरे यांचा बोधिसत्व पद्मपाणि वरील लेख अतिशय उत्कृष्ट आहे. सन १९७५ मध्ये नववीत असताना अजिंठा लेण्याला आई-वडिलांसोबत प्रथम भेट दिली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना अनेकदा आजोबा, मामा आणि मित्रांबरोबर लेण्यांचे दौरे झाले. प्रत्येक दौऱ्यात नवनवीन माहिती मिळत गेली.

अजिंठ्याच्या बरोबर औरंगाबाद लेण्यांचे दर्शन देखील मनावर कायम कोरले गेलेले आहे. तिथल्या बोधिसत्व पद्मपाणि शिल्पाला तर विसरू शकत नाही इतका त्याचा ठसा मनावर उमटला आहे. तरी औरंगाबादला गेल्यास त्या जिल्हयातील सर्व लेणी पुन्हा नव्या अभ्यासू नजरेने पहा. शिल्पांबरोबर भित्तीचित्रांचा देखील अभ्यास करा. त्यात दडलेली अजून नवीन माहिती तुम्हांस प्राप्त होईल. जगभर अजरामर झालेल्या या कलाकृतींना साकारलेल्या सर्व अनामिक कलाकारांना मानाचा मुजरा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)