इतिहास

भारतातील पिप्राहवा स्तुपातील बुद्ध अस्थींचा माहितीपट – Bones of the Buddha

‘Bones of the Buddha’ हा एक टीव्हीवरील माहितीपट असून तो २०१३ मध्ये आयकॉन फिल्मद्वारे नॅशनल जिओग्राफिक चॅनेल साठी फ्रान्समधून तयार करण्यात आला. यामध्ये पिप्राहवा स्तुपात आढळलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थिबाबतची माहिती आहे.

१८९८ मध्ये जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थीं तेथील इस्टेटचे मालक विल्यम पेपे यांच्या जमिनीवरील स्तुपात सापडल्या तेव्हा नेहमी प्रमाणे कावेबाज लोकांनी गोंधळ घातला. त्याच्या सत्यतेबाबत शंका-कुशंका उपस्थित केल्या. कारण भगवान बुद्धांचे वाढत चाललेले महत्व आणि भारतभर सापडत असलेले पुरावे त्यांना धोकादायक वाटत होते. भारतातील प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत त्यांनी आजपर्यंत गोंधळ आणि संशयाचे वातावरण तयार केले आहे.

इतिहास लेखक चार्ल्स ऍलेन यांना भगवान बुद्धांच्या अस्थींबाबत शंका-कुशंका उपस्थित करून कावेबाज वर्गाने घातलेला गोंधळ माहीत होता. म्हणून त्यांनी मुळाशी जाण्याचे ठरविले. हा स्तूप ज्यांनी प्रथम खोदला ते विल्यम पेपे यांचे लंडन मधील घर त्यांनी गाठले. पेपे यांचा ७२ वर्षाचा नातू निल पेपे यांची गाठ घेतली. त्यांनी त्यांच्या आजोबांची सर्व कागदपत्रे, पेटी आणि जवाहिर दाखविले. त्याची त्यांनी तपासणी केली.

त्यानंतर चार्ल्स ऍलेन भारतात आले. विल्यम पेपे यांची भारतात त्यावेळी असलेली इस्टेट आणि त्यावरील बंगला बघितला. स्तूप पहिला. अस्थीकलशावरील लिहिलेल्या ब्राम्ही लिपीची तपासणी जर्मन मधील इन्स्टिट्यूट ऑफ इंडोलॉजीचे प्रोफेसर हॅरी फॉक यांच्या तर्फे केली. कलकत्त्याला दोघांनी जाऊन स्तुपात सापडलेली दगडी मंजुषा तपासली. सयाम (थायलंड) येथे जाऊन तेथे नेण्यात आलेल्या बुद्ध अस्थि आणि माणिकमोती यांची पाहणी केली. अशातर्हेनें सर्वांगीण शास्त्रोक्त तपास करून या भगवान बुद्धांच्याच अस्थि आहेत हे ठामपणे प्रतिपादन केले.

म्हणून ‘Bones of the Buddha’ हा माहितीपट आवर्जून पाहावा. भारतातील अनेक ठिकाणी सापडलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींना कावेबाज समाज कसा दचकून राहतो हे समजेल. म्हणूनच आजही या पवित्र अस्थि त्यांनी स्तुपात न ठेवता कडी कुलपात बंदिस्त ठेवल्या आहेत. उद्या त्या बाहेर काढून त्यांचे पूजन होऊ लागले तर अख्खा भारत ‘बुद्धं शरणं गच्छामि..’ म्हणेल अशी त्यांना भीती वाटते. म्हणूनच ASI देखील स्तुपांचे नूतनीकरण करत नाही. आणि हे सर्व बदलायचे असेलतर एकजुट हवीच.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *