इतिहास

बुद्ध आणि कमलपुष्प यांचा काय संबंध?

या पृथ्वीतलावर भगवान बुद्धांचे शिल्प किंवा प्रतिमा ही नेहमीच कमळावर म्हणजेच पद्मावर आसनस्थ दाखविली जाते. कारण कमलपुष्प आणि बुद्धरूप यांचा अतूट बंध आहे. पद्म विरहित बुद्धमूर्ती सुद्धा असतात. पण जी शुद्धता, पवित्रता कमलपुष्पाने दृग्गोचर होते तशी परिमाणकता पद्म विरहित बुद्धमूर्तीत साधली जात नाही. किंवा अशी बुद्धमूर्ती कमलपुष्प शिल्प किंवा प्रतिमेत ठेवली तरी चालते. मात्र जर बुद्धमूर्ती दुसऱ्या कुठल्या पुष्पात विराजमान केली असेल तर त्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला बुद्धांविषयी बिलकूल ज्ञान नाही असे खुशाल समजावे. भगवान बुद्ध आणि कमलपुष्प यांचा काय संबंध आहे हे बऱ्याच भारतीयांना अद्याप ज्ञात नाही. चला तर स्वतः भगवान बुद्धांनी ‘बुद्ध आणि कमलपुष्प’ यांचा परस्पर काय संबध आहे याबद्दल एका सुत्तात सांगितले आहे ते पाहूया.

एके समयी भगवान उक्कठ्ठ आणि सेतव्य या गावांनां जोडणाऱ्या रस्त्याने जात होते. त्याचवेळी एक द्रोण ब्राह्मण सुद्धा त्याच रस्त्याने चालला होता. तेव्हा द्रोण ब्राह्मणाने जमिनीवर उठलेले पायाचे ठसे पाहिले. या ठशांवरती आऱ्यासहित, धावेसहित व नाभिसहित परिपूर्ण चक्र असल्याचे त्यास दिसले. ते पाहून त्यास आश्चर्य वाटले. हे अद्भुत आहे. हे माणसाचे पायाचे ठसे नसावेत असे त्याला वाटले. त्याचवेळी भगवान बुद्ध रस्ता सोडून एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन शरीर सरळ ठेवून जागृत बसले असताना द्रोण ब्राह्मण भगवंतांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तेथे आला. त्याने भगवंतांना एका वृक्षाखाली प्रसन्न, शांत, दमन-शमनयुक्त, अलिप्त, शुद्ध आणि निर्वाणयुक्त मुद्रेत पाहिले. तेव्हा तो आदराने भगवान बुद्ध यांच्या जवळ गेला व म्हणाला..

‘आपण देव असाल ?’
‘ब्राह्मण मी देव नाही.’
‘आपण गंधर्व असाल ?’
‘ब्राह्मण मी गंधर्व नाही.’
‘आपण यक्ष असाल ?’
‘ब्राह्मण मी यक्ष नाही.’
‘आपण मनुष्य असाल ?’
‘ब्राह्मण मी मनुष्य नाही ?’

तेव्हा द्रोण ब्राह्मण बुचकळ्यात पडला. तो पुढे म्हणाला ‘आपण देव असाल’ असे विचारल्यावर म्हणता, हे ब्राह्मण ! मी देव नाही, ‘आपण गंधर्व असाल’ असे विचारल्यावर म्हणता ‘हे ब्राह्मण ! मी गंधर्व नाही’, ‘आपण यक्ष असाल’ असे विचारल्यावर म्हणता ‘हे ब्राह्मण ! मी यक्ष नाही’, ‘आपण मनुष्य असाल’ असे विचारल्यावर म्हणता ‘हे ब्राह्मण ! मी मनुष्य नाही’, तर मग आपण कोण आहात?

तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ‘हे ब्राह्मण ! ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला ‘देव’ म्हटले जाऊ शकले असते ते माझे आस्रव समूळ नाश पावलेले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झालेले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. हे ब्राह्मण ! ज्या आस्त्रवांच्या असण्यामुळे मला ‘गंधर्व’ म्हटले जाऊ शकले असते, ‘यक्ष’ म्हटले जाऊ शकले असते, ‘मनुष्य’ म्हटले जाऊ शकले असते, ते माझे आस्रव समूळ नाश पावले आहेत, तोडलेल्या ताड वृक्षाप्रमाणे झाले आहेत, अभाव प्राप्त झालेले आहेत, भविष्यात उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. ब्राह्मण ! ज्याप्रमाणे उत्पल असते, पद्म असते वा पुंडरीक असते, ते पाण्यात उत्पन्न होत असते. पाण्यात वाढत असते परंतु ते पाण्यापासून अलिप्त राहुन पाण्याच्या वर असते. त्याचप्रमाणे ब्राह्मणा ! मी जगात उत्पन्न झालो आहे, जगात वाढलेला आहे, परंतु या विकारयुक्त जगाला जिंकून त्यापासून अलिप्त राहून विहार करीत असतो. अरे ब्राह्मणा ! मला ‘बुद्ध’ समज.

याचाच अर्थ असा की ज्याप्रमाणे सुंदर कमलपुष्प पाण्याने या जगात लिप्त होत नाही त्याचप्रमाणे ‘बुद्ध’ सुद्धा विकारयुक्त दलदलीच्या जगामध्ये वावरून विकार लिप्त होत नाहीत. सर्वांपासून ते अलिप्त आहेत. म्हणूनच ते बुद्ध आहेत. यामुळेच बुद्धांची प्रतिमा साकारताना, त्यांचे शिल्प साकारताना पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून ते कमलपुष्पावरती साकारले जाते. ( संदर्भ :- अंगुत्तर निकाय – द्रोण सुत्त )

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *