लेणी

बुद्ध लेणीं ते पांडव लेणीं – एक प्रवास

भारतातील सर्वात प्राचीन वास्तू (एखाद दुसरा अपवाद वगळता) या येथील पाषाणात कोरलेल्या “बुद्ध लेणीं” आहेत. हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय सत्य आहे. सम्राट अशोकाने बाराबार आणि नागार्जुनी डोंगरात (आत्ताच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात) सर्वात पहिल्यांदा लेणीं कोरून दान दिली. त्यानंतर ही अतिशय अभिनव कला इतर प्रदेशात रुजू लागली. महाराष्ट्रात पाषाणाच्या प्रचंड मोठी डोंगरांची रांग या कलेला पोषक ठरली आणि भारतातील सर्वात जास्त लेणीं येथील अनेक डोंगरांच्या खांद्यावर दिमाखात दिसू लागली.

विनयानुसार बौद्ध भिक्खुंनी भिक्षाटन केल्यानंतर संपूर्ण वेळ एकांतात ध्यान आणि अभ्यासासाठी व्यतीत करायचा असतो. हे भिक्खू डोंगरातील या लेणींमधे राहत असत. स्थानिक लोकांना त्यांना “भिक्खू” म्हणतात हे कदाचित माहीत नसावे. तेव्हा जर कोणी विचारले कि डोंगरातील या लेणींमधे कोण राहते, तर स्थानिक सांगत असणार – “पंडु वस्त्रधारी” राहत आहेत व दिवसातून एकदा भिक्षा मागायला गावात येतात. भिक्खू “चीवर” घालतात जे पीत अर्थात पिवळ्या किंवा पिवळासर रंगाचे असते. त्यामुळे स्थानिक लोकं भिक्खूंना “पंडु वस्त्रधारी” म्हणत असावीत.

पालि भाषेत पंडु शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे. पांढऱ्या रंगला देखील पालि भाषेत पंडु किंवा पंडरु म्हणतात. पालि भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत आले आहेत. उदा. पंडुरोग म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन शरीर पिवळसर दिसते. पालि ही भ. बुद्धांच्या काळापासून आणि नंतर सम्राट अशोकाच्या काळात भारतातील एक राजमान्य भाषा होती. त्यामुळे नकळतपणे मराठी भाषेवर देखील पालि भाषेचा प्रभाव अधिक आहे.

पुढे या लेणींना “पंडु वस्त्रधारी राहणारे लोक” असे म्हणण्या ऐवजी “पंडु लेणीं” म्हणण्यास सुरुवात झाली. या लेणींना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधिकृत नाव देखील पंडु लेणी असेच आहे. हेच पुढे अपभ्रंशित होऊन “पांडू लेणीं” झाले. काही काळानंतर म्हणजे अंदाजे १६व्या शतकानंतर या लेणींना “पांडव लेणीं” म्हणण्यास सुरुवात झाली. आणि मग या लेणींचे कोरीवकाम पांडवांनी कसे केले याच्या अनेक सुरस कथा रचल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थाने मग या लेणींवर अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली.

साधारणतः ११ ते १२ व्या शतकानंतर बौद्ध धम्माचा ऱ्हास सुरु झाला आणि या लेणींवर बौद्ध भिक्खू दिसेनासे झाले. त्या वेळेस या लेणींवर इतर अनेक संप्रदायाचा वावर सुरु झाला. यातूनच पुढे या लेणींमधे अतिक्रमण सुरु झाले, अनेक देवतांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या किंवा लेणींमधील स्तूपाची मोडतोड करून या प्रतिकृती कोरण्यात आल्या. साधारणतः ज्या ज्या बुद्ध लेणींमधे अतिक्रमण झाले आहे ते सर्व १७ ते १८ व्या शतकानंतरचे आहे. ज्या भिक्खू संघासाठी या लेणीं दान करण्यात आल्या तोच भिक्खू संघ या लेणींकडे फिरकेनासा झाला आणि मग या लेणींचे “नामांतर” सुरु झाले. अतिक्रमणाची ही पुढची पायरी होय.

बुद्ध लेणीं ते पंडु लेणीं ते पांडू लेणीं ते पांडव लेणीं असा हा प्रवास आहे. विशेष म्हणजे मराठीत असलेला “लयन” म्हणजे “नटलेले” किंवा “लावण्य” म्हणजे “सौंदर्य” हे शब्द “लेणं” या शब्द पासूनच तयार झाले आहेत.

भारताचा सर्वात प्राचीन वारसा असलेल्या या बुद्ध लेणींना “जिवंत” ठेवण्यासाठी तरी आपण सर्वांनी या “बुद्ध लेणीं” कडे जायला हवे. ते आपले कर्तव्यच आहे….

– अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी संशोधक आणि अभ्यासक)