आंबेडकर Live

केळूस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

“गौतम बुद्धांचे चरित्र” हे गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिहिलेले मराठी भाषेतले पहिले चरित्र आहे. हे चरित्र इ.स. १८९८ साली प्रसिद्ध झाले. म्हणजे सुमारे ११६ वर्षापूर्वी; पण त्याही आधी हे चरित्र “आध्यात्मिक ज्ञानरत्नावली” या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. स्थूलमानाने १२५ वर्षापूर्वी मराठी भाषेत पहिल्यांदाच महामानव गौतम बुद्धांचा परिचय करून देण्याचे फार मोठे श्रेय गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांना द्यावे लागते.

बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की, “दादा केळूस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुध्दा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाहो. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याच्यांत रस घेण्याची ही माझी सुरूवात होती.

इ.स. १९०७ च्या डिसेंबर मध्ये बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. चाळकरी मंडळींनी त्यांचा सत्कार केला. या सत्कार प्रसंगी दादा केळूस्करांनी त्यांना हे स्वलिखित पुस्तक आशीर्वाद म्हणून दिले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय १७-१८ वर्षांचे होते. इथून पुढे पन्नास वर्षे बाबासाहेब सवड मिळेल तेव्हा गौतम बुद्धांचे चरित्र आणि तत्वज्ञान याचा अभ्यास करीत होते. अखेर या अभ्यासाची परिणती त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला या घटनेत झाली, हे आज सर्वांनाच माहीत आहे.

असे असले तरी या पुस्तकाकडे मराठी वाचक वळला तो मात्र १९६० नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसाठी इ.स. १९५६ साली नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. आपल्या अनुयायांसाठी त्यांनी सुत्रमय भाषेत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ इंग्रजीत लिहीला. लगेच काही वर्षात या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि या ग्रंथातल्या प्रस्तावनेत बाबासाहेब बुद्ध धम्माकडे केव्हा आणि कसे वळाले या विषयीची प्रेरणात्मक माहीती मराठी वाचकांसमोर आली.

बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर इतका खोलवर संस्कार रूजवणारा हा ग्रंथ इ.स. १९६० नंतर मात्र, आंबेडकर अनुयायांनी चळवळीची एक महत्वाची साधनसामग्री म्हणून वाचायला सुरुवात केली. मात्र आंबेडकरी समाज सोडला तर इतर मराठी भाषक वाचकांपर्यंत मात्र हा ग्रंथ म्हणावा तसा पोहोचला नाही ही वस्तुस्थिती आहे.

One Reply to “केळूस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

Comments are closed.