बुद्ध तत्वज्ञान

बुध्दाला विश्वातील चार महान सर्वश्रेष्ठ सत्याचा लागलेला शोध

विश्वातील सत्य जानून, समस्त मानव जातीच्या दुःखाचे कारण काय असावे, याचा शोध घेण्यासाठी सिध्दार्थ गौतामाने गृह त्याग केला. त्याकाळी प्रचलित सारे ध्यान समाधी मार्ग त्याने अभ्यासले, अनुभवले. साऱ्याच तप साधना करणा-या ऋषी मुनींची भेट घेऊन दुःख मुक्तिचा मार्ग जानण्याचा प्रयत्न केला. कठोर तप केले. निव्वळ हाडांचा सापळा होईपर्यंत शरीर तापवले, परंतु मार्ग सापडेना. शेवटी, पिंपळाच्या झाडा खाली बुध्दाला सत्याचे ज्ञान प्राप्त झाले. बोधी, संम्बोधी प्राप्त झाली, प्रकाश दिसला. महाकारुनिक बुध्दाला दुःखाचे मूळ कळले. सुखाचा मार्ग दिसला. एका चिरंतन, सत्याचा बोध झाला. सिध्दार्थ गौतम बुध्द झाला ! दुःख वेदनेने जर्जर झालेली मानवता हसली. विश्वाला बुध्द मिळाला आणि मिळाला त्या महाकारुनीक बुध्दाचा धम्म, बुध्द धम्म ! तथागत बुध्दाला विश्वातील चार महान सर्वश्रेष्ठ सत्याचा शोध लागला. त्यालाच चार आर्य सत्य असे म्हणतात. ( आर्य म्हणजे सर्व श्रेष्ठ )

पहीले आर्य सत्य :

१ ) दु:ख आहे : – मानवी जीवनाबद्दल, जीवनातील दुखाबाबत जे चार श्रेष्ठ सत्य बुध्दाला कळले त्यातील पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख सत्य होय. बुध्दाच्या मते १) जन्म हाच मुळात दु:खमय आहे २) मृत्यु हाही दुःखमय आहे ३) सारे जीवनच दु:खमय आहे. जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा सारा जीवन प्रवासच दुःखमय आहे. हे दुःख शारीरिक आणि मानसिक अशा दोन प्रकारचे आहे. धनिक असो वा निर्धन, स्त्री असो वा पुरुष, राजा असो की प्रजा, साऱ्यांनाच दुःखाशी सामना करावा लागतो. आजार, व्याधी दुर्धर रोग, अपंगत्व, वृध्दत्व ही दु:खद आहेतच, शिवाय स्नेही जनांची ताटातुट, धन संपत्तीची हानी, आप्त, मित्रांचे मृत्यू, अपयश, स्वप्नभंग, अपेक्षित न मिळणे, नको ते मिळणे, हवे तेव्हा न मिळणे, हवे तेवढे न मिळणे, इतरांपेक्षा कमी मिळणे, इतरां सारखे चांगले न मिळणे या आणि इतर घटना मानवला दु:खात लोटत असतात. यावरुन जीवनात दु:ख आहे हे सत्य आपण मान्य केलेच पाहिजे यालाच दुःख आर्य सत्य असे म्हणतात. जन्म आणि दु:ख याएकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जन्म व दु:ख हे अविभाज्य अंग आहेत.

दुसरे आर्य सत्य:

२) दुःखाला कारण आहे : – हे बुध्दाला कळलेले दुसरे महान सत्य होय. मनुष्यप्राणी हा निसर्गाची निर्मिती आहे. जशी झाडे, झुडपे, पशु, पक्षी, तसाच माणूसही निसर्गाची निर्मिती होय. निसर्गाचे स्वत:चे नियम आहेत. त्यातला महत्वाचा नियम म्हणजे प्रत्येक घटनेमागे कारण असणे हा होय. कारणाशिवाय, जगात काहीही घडत नाही. घडूच शकत नाही. वारा आला तरच पान हलतं ! म्हणूनच कारण व परिणाम यांचा अतूट संबंध आहे. प्रत्येक परिणामाच्या मुळाशी एक किंवा अनेक कारणे असू शकतात. बरेचदा विशिष्ट घटनेमागची नेमकी कारणं आपल्याला कळत नाहीत. पण कारण हे असतेच. यालाच बुध्दाचा कार्यकारण भाव असे म्हणतात. मनुष्य दु:खी आहे, त्याला कारणं आहेत. तो सुखी आहे, त्यालाही कारणं आहेत. चालतांना साधी ठेच लागली तरी त्याला कारण आहे. कदाचित चालतांना रस्ता निट पाहून न चालणे हे त्याचे कारण असेल.

तिसरे आर्य सत्य

३ ) दःख निवारण : – बुध्दाला जे तिसरे आर्य सत्य ( श्रेष्ठ सत्य ) कळले ते हेच, जिवन दुःखमय आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जिवनात दु:ख हे आहेच परंतु बुध्दाला एक आशेचा किरण गवसला. तो म्हणजेच, दुःख निवारण शक्य आहे, दु:ख दूर केले जाऊ शकते, हा होय. ज्या गोष्टी निर्माण होतात त्या सर्वच नष्ट होतात. या सूत्राचा आधार घेऊन असे दिसून आले की जर दुःख निर्माण होऊ शकतात, तर ते नष्टही केले जाऊ शकतात. कारण उदय आणि य म्हणजेच निर्मिती आणि अंत हा निसर्गाचा नियमच आहे. यातुन बुध्दाला विश्वाचा कार्यकारणभाव कळला. कारण व परिणाम यातील संबंध कळला, कारणाशिवाय दुःख निर्माण होणे शक्य नाही. म्हणजेच दुःख दूर करावयाचे तर दु:खाची कारणं दूर करावी लागतील. एकदाची दुःख निर्माण करणारी कारणं नष्ट झाली की आपोआप दुःखही नष्ट होईल. बुध्दाने निराशावाद नव्हे, आशावाद सांगितला. दुःख आहे पण ते दूर केले जाऊ शकते हा आशावाद ! आणि बुध्दाने जे काही सांगितले ते सारे काही अनुभूतीतून, अनुभवातून, स्वजाणीवेतून, दिव्य ज्ञानातून, कळलेले सर्वश्रेष्ठ सत्य होय.

चौथे आर्य सत्य

४) दुःख निवारण्याचा मार्ग आहे : – बुध्दाला जे चवथे अंतिम सत्य कळले ते हेच. यालाच बुध्दाचा माध्यम मार्ग म्हणतात. यालाच दु:ख मुक्तीचा मार्ग असे म्हणतात. यालाच धम्मपथ असेही म्हणतात. यालाच निर्वाण पथ असेही म्हणतात. आठ अंग असलेला सर्व श्रेष्ठ जीवनमार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय, या अष्टांगिक मार्गावरुन जे चालतात ते याच जन्मात दु:ख मुक्त होतात. म्हणूनच हा दुःख मुक्तीचा मार्ग होय.

One Reply to “बुध्दाला विश्वातील चार महान सर्वश्रेष्ठ सत्याचा लागलेला शोध

Comments are closed.