ब्लॉग

‘बुद्ध’ म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश – पुज्य दलाई लामा

अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. तुम्ही अगोदर स्वत: धम्माची पारख करा. परस्परांविषयी प्रेम बाळगा. सर्वधर्म समभाव यानुसार आपण चालले पाहिजे. भारत देश याचे एक उत्तम उदाहरण आहे, असे उद्गार जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी येथे काढले.

या वेळी बोलतांना पुज्य दलाई लामा पुढे म्हणाले की, बौद्ध धम्माला समजून घेण्यासाठी केवळ श्रद्धा ठेवून चालत नाही. त्यासाठी आपणाला प्रज्ञा व प्रगल्भ ज्ञानाची आवश्यकता आहे. धम्म समजून घ्यायचा असेल, तर आपणास त्यासंबंधीचे प्रमाणग्रंथ समजून घ्यावे लागतील. अमूक व्यक्ती जे सांगते ते वास्तव आहे का. ते सत्य समजावे का, याची अनुभूती येईल. त्यामुळेच तर तथागत ‘बुद्धांना आशिया खंडाचा प्रकाश,’ असे उगीच म्हटले जात नाही. धम्मामध्ये खोल रुजलेली प्रज्ञा आहे. विसाव्या शतकात पाश्चात्त्य देशांमध्येही बौद्ध धम्माबाबत मोठ्या प्रमाणात रुची वाढली आहे. महाराष्ट्रात नागपूूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे आज भारतात धम्माबाबतचे जे चित्र पाहावयास मिळते. त्याचे सर्व श्रेय बाबासाहेबांनाच जाते.

बुद्ध काळातही करुणा आणि अंहिसेचा पुरस्कार केला जात होता. आधुनिक काळात बुद्ध काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. अनेक महान धर्मगुरूंनी कठोर परिश्रम केले. प्रमाण धर्मग्रंथांचे जतन केले. त्याचा अभ्यास केला. या ज्ञानाची आजही तेवढीच गरज आहे.

आपण २१ व्या शतकातील बौद्ध बनले पाहिजे. दोन प्रकारचे धम्म अनुयायी असतात. एक श्रद्धा अनुयायी व एक प्रज्ञा अनुयायी. श्रद्धा अनुयायांमुळे बुद्धशासन फार काळ चालणार नाही. प्रज्ञा अनुयायांमुळेच चिरकाल टिकेल. मी सांगतो म्हणून धम्माचे अनुयायी बनू नका. सोनार ज्या प्रकारे सोन्याची परीक्षा करतो, त्याप्रमाणे धम्माचीही अगोदर परीक्षा घ्या व मगच तो स्वीकारा. श्रद्धेपोटी धम्म मानू नका. ज्ञानाच्या आधारावर धम्माचे अनुकरण करा. जेव्हा तुम्ही बुद्धांसमोर नतमस्तक होता. त्यांचे दर्शन घेत असता तेव्हा बुद्धांना शिक्षकाच्या रूपात बघा. त्यांनी दिलेल्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करा, असा उपदेश दलाई लामा यांनी दिला.

तीन दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबादेतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवनमधील डॉ.आंबेडकर स्टेडियमवर करण्यात आले होते. रविवारी परिषदेचा तिसरा दिवस होता. सकाळी ९.३० वाजता दलाई लामा यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक धम्मगुरूला डोळे भरून पाहण्यासाठी बौद्ध बांधवांनी पहाटेपासूनच स्टेडियमवर गर्दी केली होती. संपूर्ण स्टेडियम गर्दीने खचाखच भरल्यामुळे संयोजकांनी मिलिंद महाविद्यालयासमोरील पटांगणात ‘एलईडी’च्या माध्यमातून दलाई लामा यांच्या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण केले. तेथेही हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवांनी गर्दी केली होती.

बरोबर ९.३० वाजता दलाई लामांचे स्टेडियमवर आगमन झाले. प्रवेशद्वारात त्यांच्या हस्ते बोधिवृक्षाचे रोपण केल्यानंतर त्यांना फुलांनी सजविलेल्या रथातून धम्मपीठाकडे आणण्यात आले. त्यावेळी बौद्ध बांधवांनी जागेवर उभे राहून ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’चा घोष करीत त्यांना वंदन केले. मंगलमय वातावरणात धम्मपीठावर जाताच दलाई लामा यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मू्र्त्यांनां पुष्प अर्पण केले. या परिषदेचे मुख्य समन्वयक तथा राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच कांबळे त्यांचे स्वागत यांनी केले.

या प्रसंगी अखिल भारतीय भिक्खूसंघाचे संघानुशासक पुज्य भदंत सदानंदजी महाथेरो, वरिष्ठ भिक्खू पुज्य भदंत धम्मसेवकजी (मुळावा-यवतमाळ), अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष पूज्य भदंत बोधीपालोजी ( लोकुत्तरा चैरिटेबल मिशन चौका जिल्हा औरंगाबाद) आणि देशविदेश्यातून मोठ्या संखेने आलेले भिक्खू आणि या आंतरराष्ट्रीय धम्मपरिषदेचे वैशिष्ट ठरावे ते म्हणजे जवळपास ४० भिक्षुणी चा संघ व महाराष्ट्रच्या काण्याकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातून आणि इतर देशातून आलेले बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी नागसेन वन फुलून गेले होते.

सुधाकर पखाले
धम्मस्थान स्तूप,
सद्धम्म प्रचार केंद्र, मालेगांव, जिल्हा वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *