आंबेडकर Live

बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. त्यामुळे जगभरातील १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. पण भारतात १९५३ पासून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि ही सुट्टी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे तत्कालीन केंद्र सरकारला द्यावी लागली. त्यामुळे आज भारतात बुद्ध जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

हिंदू , मुसलमान, जैन, पारशी यांच्या सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्यात येत होती. मात्र , बुद्धजयंतीच्या दिवशी अशी सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ पासून प्रयत्न सुरू केले होते. बाबासाहेब मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर त्यांनी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्या वेळचे गृहमंत्री मॅक्सवेल यांची त्याबाबत तयार होता. मात्र, त्या वेळा जागतिक युद्ध सुरू असल्यान बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जाहीर केल्यास युद्धासाठी मुसलमानांकडून मदत मिळणार नाही, या विवंचनेमुळे ती जाहीर होऊ शकली नाही.

इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.’ अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.

म्हणून सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील, प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली होती.

दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंतीची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.

7 Replies to “बाबासाहेबांमुळेच आज भारतात बुद्धजयंतीची सार्वजनिक सुट्टी

Comments are closed.