आंबेडकर Live

मी तीन फक्कड गुरू केले; माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली

मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो.

पहिला गुरू बुद्ध

मी तीन फक्कड गुरू केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले. त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरू गौतम बुद्ध. दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च-नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला. मी बौद्धधर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्धधर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते.

दुसरे गुरू कबीर
माझे दुसरे गुरू कबीरसाहेब, त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता . गांधींना मी नुसते गांधी न म्हणता ‘महात्मा गांधी’ म्हणावे, अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानलेले नाही. मी त्यांच्यापुढे कबीराचीच उक्ती ठेवूनः

मानस होना कठीण है । तो साधू कैसा होत।।

तिसरा गुरू महात्मा फुले
माझे तिसरे गुरू महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन झाले. या तीन गुरूच्या शिकवणुकीने माझे जीवन बनले आहे.

तीन उपास्य दैवते तीन गुरूप्रमाणे माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या, विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहसंख्येने समाज विद्याहीन आहे. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानीत. पण बौद्धधर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. शिकणा-यांच्या जिभा कापल्या. याचा परिणाम म्हणून आजही या देशात ९० टक्के लोक अशिक्षित आहेत. ब्रम्हदेशात बौदधर्म आहे. तेथे ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. हिंदुधर्म व बौद्धधर्मातील हे अंतर आहे.

खरा प्रेमी ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्या उत्कटतेने माझे पुस्तकावर प्रेम आहे. शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुस-या कुणाजवळ आहे? दाखवा!

माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे. पण हे खो की, मी नेहमीच विनयशील असतो असे नाही, मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता त्याज्य समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले. पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहुन झाली नाही. समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही. परळला १०x१० च्या खोलीत मी कैक वर्षे काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला, पण मी कधी कोणाकडून स्वत:साठी थैली घेतली नाही.

या देशात आलेल्या सर्व व्हाईसरॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहसंबंध होता. पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही. दुस-यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रिम कोर्टाचा न्यायाधिश होता आले असते. पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे, असा मी विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो. परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे. म्हणून शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो.

माझी आत्मकथा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

2 Replies to “मी तीन फक्कड गुरू केले; माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *