बुद्ध तत्वज्ञान

माझ्या महापरिनिर्वाणानंतर येतील आणि म्हणतील अरे रे बुद्ध तर गेले

तथागत बुद्धाचे महापरिनिर्वाण होणार होते. कुशीनगरमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक माणूस धावत जेथे बुद्ध झोपले तेथे आला, व म्हणाला, ‘गेल्या तीस वर्षापासून विचार करतोय. तथागतांच्या दर्शनाला जायचे आहे.

माझ्या या गावात तुम्ही अनेक वेळा आलात. परंतु वेळच मिळाला नाही. कधी घरात लग्न, तर कधी पत्नीचा आजार, कधी दुकानात गर्दी तर कधी पाहुण्यांची वर्दळ, गेली तीस वर्षे चाल ढकल चालली होती. परंतु आज समजले की तुम्ही हे जग सोडून जाणार आहात. आपले महापरिनिर्वाण होणार आहे. तुम्हाला भेटण्याची पुन्हा संधी नाही. म्हणून सर्व कामे बाजूला सारून धावत आलो. तुमच्या दर्शनाचा ध्यास होताच, परंतु काही ना काही काम आडवे येतच होते.

बुद्ध म्हणाले, ‘तरी देखील तू लवकरच आला आहेस, अनेक असे आहेत जे माझ्या महापरिनिर्वाणानंतर येतील आणि म्हणतील अरे रे बुद्ध तर गेले. आम्हाला हे विचारायचे होते आणि आम्हाला ते विचारायचे होते. तू तीस वर्षानंतर का होईना, परंतु आलास, हेच महत्वाचे आहे. उशीरा जागलास, एकदाचा जागलास तरी ! जे अद्याप झोपले आहेत त्यांचे वाईट वाटते, इतकंच. ‘