बुद्ध तत्वज्ञान

मज्झीम निकाय मधील ‘ककचूपम सुत्ताचे सार’ मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी

त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक’ या मधील मज्झिम निकाय या विभागातील अनेक सुत्ते सुंदर उपदेशांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आढळतात. यातील उपदेश लोकांना समजेल असा असून कल्याणकारक आहे. या मज्झिम निकाय मधील ककचूपम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात…..

“भिक्खुंनो, एखादा मनुष्य हातात कुदळ घेऊन येईल आणि म्हणेल ‘मी, या पृथ्वीचा नाश करीन’ असे बोलून तो इथे तिथे खोदू लागला, माती फेकू लागला. ‘तू आता नष्ट झालीस. तू आता नष्ट झालीस’. असे म्हणू लागला तर तुम्हाला काय वाटते भिक्खुंनो..! काय तो मनुष्य या महापृथ्वीला नष्ट करू शकेल ? नाही ना..! कारण ही महापृथ्वी गंभीर आहे, अमर्यादित आहे. तिला नष्ट केले जाऊ शकत नाही. तो मनुष्य विनाकारण स्वतःला त्रास आणि दुःख करून घेत आहे.

त्याचप्रमाणे भिक्खूंनो, दुसरी व्यक्ती तुमच्याशी योग्य वेळी बोलेल किंवा अयोग्य वेळी बोलेल, सार्थ बोलेल किंवा निरर्थक बोलेल, मैत्रीपूर्ण चित्ताने बोलेल किंवा द्वेषपूर्ण चित्ताने बोलेल, स्नेहाने बोलेल किंवा कठोरतेने बोलेल. परंतु तुम्ही आपल्या चित्ताला विकारयुक्त होऊ देणार नाही. तोंडातून दूर्वचन काढणार नाही. मैत्रीभावाने हितानुकंपी होऊन रहाल. द्वेषपूर्ण चित्ताने नाही. त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा मैत्रीपूर्ण चित्ताने व्यापुन राहाल. महापृथ्वीप्रमाणे अचल, अटळ, गंभीर रहाल. दुसरे मला काहीही म्हणोत. पण मी मात्र पृथ्वीसारखे विपुल, विशाल व अमर्यादित मैत्रीपूर्ण चित्ताने, अवैराने, अद्वेषाने साऱ्या विश्वाला व्यापून विहार करीन. असे भिक्खुंनो तुम्हाला शिकले पाहिजे.”

एखादा मनुष्य लाख किंवा हळद किंवा नीळ किंवा मंजिष्ट घेऊन येईल आणि म्हणेल “मी आकाशात चित्र काढीन, रूप प्रकट करीन, तर भिक्खुंनो, तो आकाशात चित्र काढू शकेल ? रूप प्रकट करू शकेल ? नाही ना..! कारण आकाश अरुपी, अनंत आहे. तेथे चित्र काढणे किंवा रूप तयार करणे सोपे नाही. तो मनुष्य विनाकारण स्वतःला त्रास आणि दुःख करून घेईल. याच प्रकारे भिख्खूंनो तुम्हीसुद्धा बोलताना अवैराने, अद्वेषाने, मैत्रीपूर्ण चित्ताने विहार करून बोलावयास शिकले पाहिजे.

एखादा मनुष्य गवताची जळती मशाल घेऊन येईल आणि म्हणेल मी या गवताच्या मशालीने गंगानदी जाळून टाकीन. तिला तप्त करीन. तर भिक्खुंनो काय तो मनुष्य त्या गवताच्या मशालीने गंगानदी जाळू शकेल ? तिला परितप्त करू शकेल ? नाही ना…! कारण गंगानदी गंभीर आहे. अमर्यादित आहे. तिला गवताच्या मशालीने पेटवता येणे शक्य नाही. परितप्त करता येणे शक्य नाही. तो मनुष्य स्वतःलाच विनाकारण त्रास व दुःख करून घेईल. याच प्रकारे भिक्खुंनो, तुम्हीसुद्धा बोलताना बोलणाऱ्याला लक्ष करून साऱ्या विश्वात गंगे सारखे विपुल, विशाल होऊन अवैराने, अद्वेषाने, मैत्रीपूर्ण चित्ताने विहार करा.

असे हे ककचूपम सुत्ताचे सार. मनुष्य जातीस कायमस्वरूपी कल्याणकारी होते, सद्या ही आहे आणि भविष्यात ही होईल. या उपदेशाचे वारंवार मनन केले तर ते मनुष्याच्या चिरकाल हिताचे व सुखाचे होईल.