भगवान बुद्धांची मौल्यवान शिकवणुक आणि तिचे अपूर्व स्वरूप सर्व भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात दिसून येते. सदाचारास प्रवृत्त करण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व त्यांच्या उपदेशात आढळते. त्याचप्रमाणे प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत असल्याने क्षणभंगुरता या पृथ्वीवर पसरल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर बुद्धांचे अध्यात्मिक तत्त्वज्ञान ही फार मोठी सामर्थ्यशाली देणगी जगाला मिळाल्याचे दिसते. आणि म्हणूनच जगात सर्वत्र बुद्ध तत्त्वज्ञान झपाट्याने पसरत असून अनेक देशात त्यांच्याप्रती आदरयुक्त भाव प्रगट होत आहे. अनेक देशांनी बुद्धांच्या या थोर व्यक्तीमत्त्वाबाबत आदर व्यक्त करण्यासाठी, नमन करण्यासाठी टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत.
१९ व्या शतकात टपाल व्यवस्था सुरु झाल्यावर टपाल तिकिटांचा जन्म झाला. आणि मग प्रत्येक देश त्यांच्या देशातील ऐतिहासिक स्थळांच्या व आदरणीय आणि राष्ट्रीय व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकिटावर छापू लागले. १९५६ साली २५०० वी बुद्धजयंती सर्व जगभर साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने अनेक देशांनी टपाल तिकिटे प्रसिद्ध केली. सन २०१४ मध्ये भूतान देशाने बुद्धांच्या जीवनक्रमातील ठळक घटनांची १२ टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. ती आज महत्त्वाची मानली जातात. या टपाल तिकीटांमधून भगवान बुद्ध यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतचा जीवनप्रवास उलगडलेला दिसून येतो. सिरीलंका ने २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेत साजऱ्या होणाऱ्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने २० देशातील पूजनीय बौद्ध स्थळांची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली.
अनेक देशात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने टपाल तिकिटे प्रसिद्ध होत असतात. भारत हा भगवान बुद्धांचा देश असून देखील येथे बुद्धांचे टपाल तिकीट क्वचितच प्रसिद्ध होते. व जरी प्रसिद्ध केले तरी मिडिया त्याची माहिती देत नाही. कर्नाटक मधील लोकेश्वर राव यांनी बुद्धप्रतिमा असलेल्या अनेक देशातील टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. त्यांच्या संग्रहात १९ व्या शतकापासून ते आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या ५० देशातील जवळजवळ ५०० च्या वर स्टॅम्पचा भरणा आहे. २०१९ मध्ये सिडनी येथे भरलेल्या स्टॅम्प आणि कॉइन प्रदर्शनात मध्ये त्यांना रौप्यपदक प्राप्त झाले. मागील आठवड्यात गुरुवार दिनांक ७ जानेवारी २१ रोजी त्यांच्या ‘Buddhism on Stamps’ या पुस्तकाचे प्रकाशन बेंगलोर येथे झाले. त्यांच्या संग्रहात गोळा केलेली एक तृतीयांश टपाल तिकिटे ही बुद्ध प्रतिमेची आहेत.
सोबत अनेक देशातील बुद्ध प्रतिमा असलेल्या टपाल तिकिटांचे फोटो वाचकांच्या माहितीसाठी आणि अभ्यासासाठी येथे देत आहे. मुले हा छंद आवडीने जोपासतात. अशा या बुद्धप्रतिमांच्या टपाल तिकिटांवर मोठा निबंध-प्रबंध लिहिला जाऊ शकतो. कारण प्रत्येक देशाचे टपाल तिकीट हे त्या देशाचा इतिहास सांगत असते.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)