ब्लॉग

१२२ वर्षानंतर पिप्राहवा स्तुपातील बुद्धअस्थी श्रीलंकेतून परत भारतात आणले

पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८ मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता दहा फूट खोलीवर त्यांना एक दगडी मंजुषा आढळली. ती हळुवार पणे बाहेर काढली आणि उघडली असता त्यात पाच कलश मिळाले. त्यात काही अस्थी व माणिक-रत्ने होती. मात्र एका करंडकावर ब्राह्मी लिपीत लिहिले होते की ‘शाक्य कुळाच्या ताब्यातील भगवान बुद्धांच्या अस्थी’ हे वाचून सर्वजण चकित झाले. पुरातत्व खात्याने देखील या बुद्धधातूबाबत शिक्कामोर्तब केले.

कुशीनगर विमानतळावर बुद्धअस्थी करंडक विमानातून मोठ्या भक्तिभावाने उतरविला, तो क्षण खूप आनंदाचा होता. तथागतांच्या धातूंना त्रिवार वंदन.

त्या प्रसंगी सयामचा (आता थायलंड) राजा राम-५ याचा पुतण्या ‘प्रिसदंग’ हा सिरिलंकामधून भिक्खूची उपसंपदा घेऊन पिप्राहवा येथे आला होता. त्यांनी बघितले की बुद्धअस्थी मिळाल्या आहेत. लगेच त्यांनी अर्ज केला की त्या अस्थी सयाम देशाला द्याव्यात. तो देश बौद्ध असल्याने तेथे त्या अस्थींची भक्तिभावाने पूजा होईल. तेव्हा एक मोठा समारंभ होऊन त्या पवित्र अस्थि राजा राम-५ यांना दिल्या गेल्या. पुढे त्या बँकॉक येथे नेल्यावर राजाने त्या अस्थींचे पूजन केले. आणि पुन्हा भाग करून ते म्यानमार, श्रीलंका येथील पॅगोडे व विहारांना दिले. ब्रिटिशांनी कलश व काही रत्ने कलकत्ता येथील म्युझियममध्ये ठेवली. व काही रत्ने विल्यम पेपे यालासुद्धा दिली. भगवान बुद्धांच्या या अस्थीकलशांना आज बौद्ध जगतात खूप पुजले जाते. त्याचे दर्शन घेतले जाते.

प्रिप्रहवा स्तूप आणि स्तूपात सापडलेले बुद्ध अस्थींचे करंडक

श्रीलंकेस मिळालेले प्रिप्रहवा स्तूपातील बुद्धधातू आता १२२ वर्षांनी श्रीलंकन प्रतिनिधी मंडळाने कोलोम्बो ते कुशीनगर या विमान प्रवासाने नुकतेच परत भारतात आणले आहेत. बुध्दधातूच्या प्रोटोकॉल प्रमाणे श्रीलंकन एअर लाईन विमानात बुद्धधातु करंडक पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळून 1A या प्रवासी सीट जवळ व उंचावर ठेवण्यात आला होता. व त्याजवळ फक्त भिक्खू महाथेर महानायक यांना बसण्याची परवानगी होती.

बुद्ध धातू अवशेषाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कुशीनगर विमानतळावर विमान उतरल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे शुभ्र पांढरे पेहेराव असलेल्या प्रतिनिधींनी बुद्ध धातू करंडकाचे स्वागत केले. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगव्या पेहेरावातच स्वागत केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की अश्विन पौर्णिमेच्या पवित्र दिवशी बुद्धधातू परत भारतात आले याचा खूप आनंद झाला. पंतप्रधान मोदी देखील बुद्धधातू पूजा सभारंभास उपस्थित राहिले. आता हे पूजनीय बुद्धधातू कडीकुलपात बंदिस्त न राहता दर्शनासाठी खुले राहतील अशी आशा करूया.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)