इतिहास

भगवान बुद्धांचा सहावा वर्षावास – मंकुल पर्वत, वैशाली-श्रावस्ती, भाग ९

वैशाली वरून बुद्ध श्रावस्ती मधे आले. श्रावस्ती मधील अनाथपिंडकाचे जेतवन आणि विशाखाने दान दिलेले पूर्वाराम विहार या दोन्ही विहारात बुद्ध संघासहित राहत असत. येथून जवळच, वैशाली मार्गावर मंकुल पर्वतावर सहावा वर्षावास व्यतीत केला. आज हा पर्वत किंवा डोंगर म्हणजे कोणता हे निश्चित सांगता येत नाही, मात्र बुद्धांचा आधीच्या आणि नंतरचा वर्षावास हा याच भागात असल्यामुळे, मंकुल पर्वत देखील या भागात असण्याची शक्यता जास्त आहे. येथे काही काळ व्यतीत केल्यानंतर बुद्ध पुढील वर्षावासासाठी श्रावस्ती येथे गेले.

जेतवन मधील बुद्धांची मूलगंधकुटी, संकीसा येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभाचे शीर्ष

भ. बुद्धांचा सातवा वर्षावास – संकस्स, बिहार

सातवा वर्षावास बुद्धांनी संकस्स म्हणजे आत्ताचे बिहार मधील फर्रुखाबाद जिल्ह्यातील संकीसा बसंतपूर गाव होय येथे व्यतीत केला. श्रावस्ती वरून बुद्ध वर्षावासासाठी येथे पोहचले. ज्या वनात बुद्धांनी वर्षावास केला तेथे सम्राट अशोकाने एक स्तूप आणि एक विहार बांधले. आज या विहाराला “बिषारी देवी” मंदिर म्हणून पुजण्यात येते.

संकीसा येथील बुद्धांची देशना, थाई चित्रकला, वॉल्टर’स म्युझियम, सम्राट अशोकाने बांधलेले विहार. आता त्याचे रूपांतर बिषारी देवी मंदिरात झाले आहे.

याच ठिकाणी निगंठांनी चिंचा नावाच्या नटीला बुद्धांना कडे पाठवून दिले होते. “जयमंगल गाथा”मध्ये याचे सुरेख वर्णन केले आहे. चिंचा पोटाला लाकडी ओंडके बांधून बुद्धांकडे जाते आणि सर्व भिक्खू संघाला उपदेशून, बुद्धांकडे पाहून म्हणते कि तुम्ही माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाचे पिता आहात. बुद्धांना तिचा फसवेपणा लक्षात येतो, मात्र ते शांत राहतात. तेवढ्यात तिने पोटाला बांधलेले ओंडके निसटून पडतात आणि तिचे पितळ उघडे पडते.

अनाथपिंडकाने दान दिलेल्या जेतवन विहाराचे काही अवशेष

कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया,
चिञ्चाय दुट्ठ वचनं जनकाय मज्झे ।
सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।

वर्षावासासाठी बुद्ध वैशाली वरून श्रावस्ती ला आले

हे पाहून चिंचा बुद्धांच्या पाय पडते व क्षमा मागते. आपण केलेल्या कृत्याचा तिला मनस्ताप होतो. बुद्ध तिला उपदेश देतात. फा हियान नुसार बुद्ध श्रावस्ती येथील जेतवनराम विहारात असताना, तेथून जवळच असलेल्या सुवर्णोपवन चैत्य जवळ झाला. वर्षावास संपल्यानंतर बुद्ध पुन्हा वैशाली कडे निघाले.

अतुल भोसेकर

संदर्भ:
बुद्धचर्या
विनय पिटक
जयमंगल गाथा
The Life of Buddha
बुद्धकालीन भूगोल
DPPN