जगभरातील बुद्ध धम्म

ब्राझीलमध्ये भव्य बुद्धमूर्ती; दीडशेच्या वर बौद्ध विहारे

ध्यानस्थ बुद्ध प्रतिमेच्या प्रचंड मोठ्या शिल्पाचे अनावरण ब्राझील देशामध्ये एस्पिरितो सेंटो या राज्यात एका झेन मॉनेस्ट्रीच्या आवारात नुकतेच झाले. पाश्चिमात्य देशातील हे ध्यानस्थ बुद्ध प्रतिमेचे सर्वात मोठे शिल्प असून त्याची उंची ३८ मीटर आहे. म्हणजेच रिओ-दे-जेनेरियो या शहरात असलेल्या ‘क्रिस्ट दी रिडीमर’ यांच्या पुतळ्याएवढी उंच आहे.

मुख्य बुद्धमूर्ती पुढे १५ लहान सफेद बुद्धमूर्ती आहेत

या बुद्धमूर्तीचे बांधकाम दीड वर्षे चालले होते व ते मागील वर्षीच पूर्ण झाले होते. परंतु काही तांत्रिक बाबी तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचा यथावथ विधी ( Eye-Opening Ceremony ) झाला नव्हता, तो डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आला. आता २८ ऑगस्ट रोजी झेन प्रार्थना होऊन ते जाहीररीत्या खुले करण्यात आले आहे. हे शिल्प मोर्रो-दा-वर्जेम या मॉनेस्ट्रीच्या आवारात आहे. त्याला लागूनच मोठा हायवे आहे. तसेच पर्यावरणाचे भान राखून झेन पद्धतीने आजूबाजूस उद्यान विकसित केल्यामुळे बुद्धमूर्तीचे शुभ्रधवल शिल्प खूपच खुलून दिसते. दूर अंतरावरून देखील ही मूर्ती दिसते.

१९७४ मध्ये बौद्ध भिक्खू रोयटन टोकूडा यांनी ‘मोर्रो-दा-वर्जेम’ या झेन बौद्ध मॉनेस्ट्रीची स्थापना ब्राझीलमध्ये केली. हे बौद्ध विहार १५० हेक्टर जागेवर पसरले असून त्यातील १४० हेक्टर जागेत तर जवळपास जंगल आहे. तिथे सोरे-झेनच्या परंपरेनुसार अभ्यास करण्यास आलेल्या भिख्खूंना धम्माचे तसेच पर्यावरणाचे शिक्षण दिले जाते. येथील झेन उद्यानात विविध मुद्रेतील बुद्धमूर्ती आहेत.

ध्यानसाधनेसाठी वृक्षाखाली चौथरे बांधले आहेत. तसेच मुख्य बुद्धमूर्ती पुढे १५ लहान सफेद बुद्धमूर्ती आहेत. ब्राझीलमधील हे ठिकाण आता मोठे आकर्षण ठरत आहे. कारण एकूण लोकसंख्येच्या ८८% लोकसंख्या कॅथॉलिक असली तरी बुद्धांचा दुःखमुक्तीचा मार्ग सर्व मानवजातीला महत्वाचा वाटत आहे. आठवड्याच्या शेवटी शनिवारी, रविवारी येथे हजारोच्यावर पर्यटक आत्ताच भेट देऊ लागले आहेत. सध्या ब्राझीलमध्ये दीडशेच्या वर महायान व थेरवादी परंपरेची बौद्ध विहारे आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *