जगभरातील बुद्ध धम्म

रशिया आणि अमेरिकेत उभारण्यात येतेय भव्य ‘बुद्धशिल्प’

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

रशियातील डोगी पर्वतावर बुद्धमूर्तीचे शिल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संपूर्ण किझिल शहरातून हे बुद्धशिल्प दिसेल.

रशियाच्या तुवान प्रांतातील बुद्धमूर्ती
या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बुद्धमूर्ती उभारण्याच्या दोन चांगल्या घटना दोन बलाढ्य देशात घडून आल्या. एक रशियात तर एक अमेरिकेत घडली. पहिली म्हणजे रशियाच्या तुवान पर्वतीय प्रदेशात ‘डोगी’ पर्वतावर बुद्धमूर्ती उभारण्याचे काम सुरू झाले. येथे शाक्यमुनी बुद्ध यांचे सुवर्ण शिल्प उभारण्यात येणार आहे. या कामी तुवा बुद्धिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. या बुद्ध प्रतिमेमुळे तेथील प्रांतात अजून अध्यात्मिक उन्नती होईल आणि लोकांमध्ये धम्माचा विश्वास बळकट होईल असे सर्वांना वाटते. तुवान प्रांताची राजधानी किझिल KYZYL ही डोगी पर्वताजवळ आहे. एक हजार मीटर उंच असलेल्या या पर्वतावरून किझिल शहराचे मनोहर दृश्य दिसते. येथे बुद्धमूर्ती उभी झाल्यावर तीचे दर्शन किझिल व तिच्या आजूबाजूच्या प्रदेशातून होईल. बुद्धप्रतिमा ही अध्यात्मिक ऊर्जेचा मोठा स्त्रोत आहे. तिचा प्रभाव नक्कीच किझिल प्रांतावर पडेल असा विश्वास सर्वांना आहे.

रशियातील तुवान प्रांतातील पर्वतावर सुवर्ण बुद्धशिल्प उभारण्यात येणार असून येथून किझिल शहराचे मनोहर दृश्य दिसते.

अमेरिकेतील लोवा शहरातील बुद्धमूर्ती
दुसरी घटना अमेरिकेत घडलेली आहे. लोवा हे अमेरिकेत मिस्सौरी आणि मिसिसिपी नदीच्यामध्ये वसलेले मोठे शहर आहे. तेथील मार्शलटाउन भागात थेरवादी धम्म सोसायटीने (TDS) भूमीस्पर्श मुद्रेतील ५.५ मीटर उंचीच्या एका मोठ्या बुद्धशिल्पाचे नुकतेच ८ ऑगस्टला अनावरण केले. यावेळी ३२ भिक्खूं आणि हजारो बौद्ध बांधव सोहळा पाहण्यास सकाळी उपस्थित होते. या थेरवादी धम्म सोसायटीमध्ये बर्मीज, चायनीज यांच्या बरोबर कारेन आणि राखाइन अशा प्राचीन बौद्ध जमाती सुद्धा आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन व एकजुटीने राहून शुभ्रधवल बुद्धमूर्ती घडविली आहे. हे धम्मकार्य निश्चितच स्फूर्तीदायक आहे.

अमेरिकेतील लोवा शहरात मार्शलटाउन भागात ही ५.५० मीटर उंचीची बुद्धमूर्ती उभारण्यात आली आहे.

सह्याद्रीच्या कुशीत बुद्धमूर्ती का नाही?
भारता बाहेर बौद्ध समाज एकजुटीने राहताना दिसतो. मग भारतातच तो विखुरलेला का दिसतो ? तसेच भारतातील १२०० लेण्यांपैकी ८० टक्के लेण्या महाराष्ट्रात आहेत. मग इथल्या सह्याद्रीच्या एखाद्या पर्वतावर बुद्धमूर्ती उभारली जाईल का ? नवीन पिढी या बाबत पुढाकार घेईल काय ?