इतिहास

तामिळनाडू राज्यातील पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथील बुद्धमूर्ती

तामिळनाडूतील नागपट्टिनम जिल्ह्यात अनेक बुद्धमूर्ती व शिल्पे आढळून येत आहेत. दक्षिण भारतातील नागपट्टिनम हे एकेकाळी बौद्ध धर्माचे मोठे क्षेत्र होते. संगम राजवटीतील पुम्फहार पासून बौद्धधर्म तेथे रुजला होता. ब्राँझ धातुच्या बुद्धमूर्ती तेथेच अलीकडे सापडल्या होत्या. मोठ्या पाषाणातील बुद्धमूर्ती सुद्धा तेथील काही गावात दुर्लक्षित पडलेल्या आढळून येत आहेत. पेरूनचेरी आणि पुथामंगलम येथे सापडलेल्या बुद्धमूर्ती यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

नागपट्टिनम जिल्ह्यात मथीलादुथुराई तालुक्यात पेरूनचेरी नावाचे गाव आडबाजूस आहे. या गावात जवळजवळ पाच फूट सात इंच उंचीची बुद्ध मूर्ती आढळून आली असून ती आठव्या ते दहाव्या शतकातील असावी. शंभर वर्षांपूर्वी या गावात एका घराचा पाया खणताना ती मिळाली असून पुरातत्व खात्यास त्याची अद्याप कल्पना नाही असे दिसून येते.

ज्यांनी ही बुद्धमूर्ती शोधली त्यांना प्रणाम

सध्या या मूर्तीला वाघिश्वरार देवळाच्या बाजूकडील एका रिकाम्या स्थानी ठेवले आहे. जवळजवळ पुरुषभर उंच असलेल्या या ध्यानस्थ बुद्धमूर्तीच्या शिरावरील उश्नीशा अखंड असून चेहऱ्यावर मंद व गूढ स्मित विलसत आहे. कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत असून चिवर वस्त्रांची कडा स्पष्ट दिसत आहे. कुठेही क्षती न पोहोचलेली ही बुद्धमूर्ती उत्कृष्ट कलेचा आविष्कार आहे. तेथील पुरातत्व विभागाने लवकरात लवकर या मूर्तीसाठी छोटे विहार तेथे उभारावे.

मथिलादुथुराई तालुक्याचा हा भाग प्राचीन ‘अरिवलूर’ या प्रांतात मोडतो. अरिवलूर म्हणजे ‘the place of people with wisdom’ असा होतो. आणि तामिळनाडूत ‘अरिवार’ म्हणजे बौद्ध संघ असे मानले जाते. प्राचीन काळाच्या चोला राजवटीत बुद्धीझम येथे बहरला होता.

पुथामंगलम ( बुद्धामंगलम ) गावातील बुद्धमूर्ती

पुथामंगलम हे एका गावाचे नाव असून मूळ नाव बुद्धमंगलम असावे. हे गाव नागपट्टीनम जिल्ह्यात किलेवेल्लूर जवळ आहे. येथे सुद्धा पाषाणाची बुद्ध मूर्ती मिळालेली असून ती शेता समोरील विहारात ठेवली आहे. काही वर्षापूर्वी थायलंडवरून बौद्ध पर्यटकांचा ग्रुप येथे फिरत फिरत आला होता. त्यांनी त्या बुद्धमूर्तीसाठी विहार बांधकामास सहाय्य केले होते.

परदेशातील बौद्ध पर्यटक जर भारतात येऊन बुद्धमूर्तीसाठी विहार बांधत असतील तर येथील शासन, जाणकार आणि लोकप्रतिनिधी डोळेबंद करून का बसले आहेत ? जोपर्यंत बुद्धांबाबत व त्यांच्या तत्वज्ञानाबाबत तेथील समाजात जागृती होत नाही तोपर्यंत धम्माबाबत अनास्था तशीच राहणार. तामिळनाडूतील बौद्ध व आंबेडकर संघटनांनी या पुरातन बुद्धमूर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुढाकार घेतला पाहिजे. व धम्म जागृती अधिक जोरदार केली पाहिजे.

संदर्भ :- https://wayofbodhi.org/buddha-statues-of-buddhamangalam-an…/

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)