ब्लॉग

ज्यांचे चित्त कमजोर आणि संभ्रमित आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील साधने प्रभावी ठरू शकत नाहीत

सामान्यतः समाज पूर्वीपेक्षा आज जास्त सुशिक्षित झालेला आहे. परंतु वैज्ञानिक ज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साध्य करूनही बरेचसे लोक अजूनही भय, संदेह आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे दुःखी आहेत. अशा मानसिक अवस्थांच्या मागे मूळ कारण काय असेल? तर ते म्हणजे अज्ञान, अनिश्चितता (असुरक्षितता) आणि तृष्णा हे होय, शाश्वत आत्मा (मी) अस्तित्वात नाही. म्हणजे ‘ अनात्म वादाबद्दलचे आपले अज्ञान आपल्याला अहंकारी बनविते आणि अहंकारातून तृष्णेचा उगम होतो, वाढ होते. तृप्त न होणा-या इच्छा (गरजा) आणि आपल्याजवळ जे आहे ते गमावले जाण्याची भीती यामुळे आपण दिवसेंदिवस भरडले जात आहोत.

आपले काहीतरी नुकसान होईल किंवा आपण कोणत्यातरी‘ संकटात सापडू असे आपणास सारखे भय वाटत असते. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न पडतो. नकळत आपण आत्म्याचा प्रभाव मानणाच्या भूतकाळाकडे वळतो आणि त्याच्यापासून संरक्षण करून घेण्यासाठी मंतरलेला ताईत किंवा गंडा – दोरा यावर अवलंबून राहतो.

भगवान बुद्धाने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्यांचे चित्त कमजोर आणि संभ्रमित आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी बाहेरील साधने प्रभावी ठरू शकत नाहीत. आपल्याकडे एकच सुरक्षित (खात्रीशीर) मार्ग आहे; तो म्हणजे सत्याचा, ज्ञानाला शरण जाणे आणि आपल्या स्वतःच्या व इतर घडामोडींच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त ( साक्षात्कार ) करून घेणे. एकदा जर आपण समजून घेतले की, येथे स्वतःला नुकसान होऊ शकते असे वास्तविक पाहता काहीच नाही, तेव्हा आपण सुरक्षित आणि धीट बनत असतो. जो निर्भय निस्वार्थी आणि अनासक्त आहे त्याच्यापर्यंत कसल्याच प्रकारचे नुकसान, आपत्ती, संकटे इ. येऊ शकत नाही.

असे असले तरी, असे समजू नये की बुद्धधम्माने धार्मिक चिन्हे वापरणे नाकारले आहे. जसे – बुद्धाचे रूप असलेले लॉकिट ( Locket ) वापरल्यामुळे आपणास सुरक्षिततेची भावना प्राप्त होत असते. बरेच लोक भगवान बुद्धाच्या समतोल आणि शांत भाव असलेल्या बुद्धमूर्तीवर ध्यान करून समाधान आणि संतुष्टता प्राप्त करीत असतात. भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू म्हणतात की, जेव्हा ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात ठेवले होते तेव्हा त्यांच्या जवळ असलेली भगवान बुद्धाची छोटी मूर्ती हेच त्यांच्या समाधानाचे उगमस्थान होते. अर्थातच, मूर्ती किंवा प्रतिरूपामध्ये जादू किंवा विलक्षण शक्ती आहे असे नाही हे भगवान बुद्धाच्या अनंत गुणांचे प्रतिक आहे. कारण मारसेनेने आक्रमण केले तेव्हा प्रतीक होते, जे पं.नेहरूजींना निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीत शांत राहण्यासाठी धैर्य देणारे होते. आपण सुद्धा बुद्धरूप असलेल्या प्रतिमा किंवा सुत्त कोरलेले नाणे किंवा दगड आपल्या सोबत ठेवू शकतो. यामुळे आपणास आत्मविश्वास प्राप्त होतो. बहुतांश सर्वच सुत्ते अशी प्रार्थना किंवा मंगलकामना व्यक्त करून संपतात.

“या सत्यवचनाने माझे कल्याण होवो, माझे जयमंगल होवो ‘, यातून असे समजते की, ( बुद्धरूप असलेल्या ) प्रतिमा किंवा मूर्ती यात दैवी किंवा विलक्षण शक्ती असते, असे आपण बौद्धलोक मानत नाही. मात्र आपल्याला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी मदत करणारी ही साधने आहेत. एवढेच यातून सूचित होते.याचप्रमाणे काही बौद्ध लोक विहारात जातात, तेथे मोठ्या एकाग्रतेने परित्राणपाठ आणि सुत्तपठण केले जाते. तेथून शीलाचे ( पवित्र ) पाणी बाटल्यात भरून नेतात आणि रतन सुत ( धागा ) बांधून घेतात. यामुळेसुद्धा ते वापरणाऱ्याला मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. कारण ते त्यांच्यासाठी सत्याचे स्मरण करतात, जे सुत्तात व्यक्त केले आहे आणि जे भगवान बुद्धाच्या शब्दाची आठवण करून देणारे आहे.

संदर्भ:- बुद्ध धम्मच का?
डॉ. भदंत के.श्री.धम्मानंद.