बुद्ध तत्वज्ञान

श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये भगवान बुद्धानीं दिलेला उपदेश!

श्रावस्तीतील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या पर्णकुटीमध्ये (आरामामध्ये) भगवान बुद्धानीं एकदा खालील प्रमाणे उपदेश केला–

“भिक्खूंनो ! जे वर्तमानात दुःखद आहे आणि भविष्यातही दुःखद आहे त्याला अविद्ये मध्ये पडलेला अडाणी नीट जाणत नाही. तो त्यांचे सेवन करतो. त्याला सोडत नाही. त्यामुळे त्या माणसाचे अनिष्ट धर्म वाढतात व इष्ट धर्म क्षीण होतात. अज्ञ माणसाचे असे होत असते.”

“भिक्खुंनो ! जे वर्तमानात दुःखद आहे आणि भविष्यातही दुःखद आहे त्याला विद्यायुक्त ज्ञानी नीट जाणतो. तो त्याचे सेवन करीत नाही. त्याला सोडून देतो. त्यामुळे त्या माणसाचे अनिष्ट धर्म क्षीण होतात. व इष्ट धर्म वाढतात. सज्ञ माणसांचे असे होत असते.”

वरील सुत्तावरून बोध घ्यायचा की या जगात अनेक चुकीच्या धारणांना मनुष्य कवटाळून बसतो. अनेक चुकीची गृहीतके त्याला बरोबर वाटतात. मी म्हणतो तेच बरोबर, असे त्यास वाटत असते. वादविवाद करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो.त्यामुळे तो रसातळाला जात असतो व दुसऱ्यांना ही चुकीची माहिती देऊन त्यांचे नुकसान करतो. यास्तव सातत्याने चहुबाजूंनी अध्ययन करून ज्ञानी व्हावे. नम्र व्हावे. काळ्या ढगाआडून बाहेर पडणाऱ्या चंद्राप्रमाणे ज्ञानाने प्रकाशित व्हावे. चुकीच्या धारणा व बाळगलेली चुकीची गृहीतके पुन्हा तपासावीत. अज्ञान सोडून ज्ञान मार्गावर आरुढ व्हावे व दुसऱ्यांनाही सन्मार्गाचा उपदेश करावा म्हणजे येणारा भविष्यकाळ हा प्रकाशमान व सुखकारक होईल.

मज्झिम निकाय
महाधम्मसमादान सूत्त

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)