बुद्ध तत्वज्ञान

या दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौध्द होणे होय

बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य दृष्टिने पाहिलेला धम्म जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून धम्माचे चक्र प्रवर्तीत केले. त्या प्रसंगी बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच पारमिता असे म्हणतात. (पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण)

१) शील पारमिता : – शील म्हणजे चारित्र, सदाचारी वर्तन, नैतिकतेने जगणे. कुशल कर्म करणे अकुशल कर्म न करणे होय, शील म्हणजे पाप कर्मापासून सावध राहण्याची प्रवृत्ती होय. माणूस कितीही विद्वान असेल, प्रज्ञावंत असेल पण शीलवान नसेल तर सारे ज्ञान व्यर्थ होय. ज्ञानाला शील सदाचाराची जोड आवश्यक आहे. म्हणूनच बुध्द धम्मात शील सर्वात महत्वाचे आहे.

२) दान पारमिता : – दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात फार महत्व आहे. दान करणे हा श्रेष्ठ गुण होय. दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. घेण्याएवजी माणूस देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे. जे विवंचनेत आहेत, जे दानावरच जगतात, अशांना सढळ हाताने मनपूर्वक दान केले पाहिजे. दान देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये. कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे. सुखप्राप्ती, स्वर्ग प्राप्ती, धनप्राप्ती. पाप मुक्त व्हायचे म्हणून, दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे. त्याचा देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द उपासकाने धन, द्रव्य, वस्त्र, रक्त व प्रसंगी शरीराचेही दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय. समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतो. आपण जे कमावले त्याला अप्रत्यक्षपणे समाजाचाही हातभार लागलेला असतो. दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्या, तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल होईल, म्हणून बौध्द उपासकाने शक्य तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ लागतो. मनातील तृष्णेचा क्षय होऊ लागतो, समर्पनाची प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय, धम्माच्या प्रसार, प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. पण सोंग ढोंग करून भिक मागण्याऱ्यांना, कर्मकांड, देवदैवतांचे नावावर दान देऊ नये. निरर्थक उत्सवांना दान देऊ नये.

३) उपेक्षा पारमिता : – उपेक्षा म्हणजे अनासक्ती होय. सर्वच चांगल्या व वाईट, मंगल वा अमंगल बाबीकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टिकोन म्हणजे उपेक्षा होय. जीवनात प्रिय वा अप्रिय असे काहीच नसणे म्हणजे उपेक्षा होय, मनाची तटस्थवृत्ती म्हणजे उपेक्षा होय. उपेक्षा म्हणजे मी किंवा माझे किंवा त्याचे असा भेद न करण्याची मनाची प्रवृत्ती होय, निंदास्तूती, लाभ, हानी, चांगल, वाईट, कुरूप, सुप, यश – अपयश याकडे तटस्थपणे पाहणे होय. कशानेच प्रभावित न होणे म्हणजे उपेक्षा होय.

४) नैष्कम्य पारमिता : – याचा अर्थ जीवनातील भोग प्रकृतीचा त्याग करणे होय. शरीरातील ६ इंद्रियांना सुखद संवेदना देणाऱ्या सर्वच भौतिक वस्तूपासून अनासक्त राहणे म्हणजे नैष्कम्य होय. जीवनातून काम, भोग प्रवृत्तीचे उच्चाटन म्हणजे नैष्कम्य होय, शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूप्रति अनासक्त असणे, त्यागी असणे म्हणजे नैष्कम्य पारमिता होय. वस्तू मिळाली की खुप आनंदून न जाने, नाही मिळाल्या कि दुःखी न होने होणे म्हणजे नैष्कम्य पारमिता होय.

५) विर्यपारमिता : – विर्य याचा अर्थ प्रयत्न करणे होय. योग्य प्रयत्न करणे होय, स्वत:वर व स्वत:च्या सामर्थ्यावर (बौध्दिक, शारीरिक, मानसिक) अतुट श्रध्दा असणे म्हणजे विर्य पारमिता होय. स्वत:हाती घेतलेले कार्य सर्वस्व पणाला लावून करणे, विचलित न होणे, धैर्य खचू न देने पळपुटेपणा न करणे, सर्व शक्तीनिशी हाती घेतलेले उत्तम कर्म करत राहाणे म्हणजे विर्यपारमीता होय, मानसिक व शारीरिक बळ असणे म्हणजे विर्य पारमिता होय, मन व शरीरसामर्थ एकवटून योग्य कृती करणे म्हणजे विर्यपारमिता होय.

६) शांती पारमिता : – क्षमावान होणे, क्षमाशीलहोणे, शत्रु प्रतीही उदार होणे, क्रोध रहीत होणे, दयावान होणे म्हणजे शांती पारमिता होय, अहिंसेने हिंसेला जिंकणे म्हणजे शांती होय. मनात अंशाती, चंचलता, क्रोध, व्देष, गर्व, नसणे, चिंता, ओढ नसणे, म्हणजे शांती पारमिता होय.

७) सत्य पारमिता : – असत्यवादी न होणे. सत्यवादी बनणे, असत्याला सत्याने पराभूत करणे, सत्याचे सामर्थ्य वाढवणे म्हणजे सत्य पारमिता होय. लोभासाठी, लाभासाठी, इंद्रियांच्या सुखासाठी असत्य न बोलने, जे आहे जसे आहे तसेच स्विकारणे म्हणजे सत्य पारमिता होय. सदैव सत्य स्विकारण्याचे, बोलण्याचे सामर्थ्य वाढवणे म्हणजे सत्य पारमिता होय. असत्यापासून दुर राहणे, सत्याचे स्वरूप समजने, सत्याचा आग्रह धरने , सत्याचा प्रचारप्रसार करणे म्हणजेच धम्माचा प्रसार करणे होय.

८) अधिष्ठान पारमिता : – याचा अर्थ कृतसंकल्पवान असणे होय. दृढ निश्चयी बनणे म्हणजेच अधिष्ठान होय. आपल्या उदात्त ध्येयाप्रती अविचल असणे म्हणजे अधिष्ठान होय. पूर्ण शक्ती व श्रध्देने आपल्या ध्येयाप्रती दृढ संकल्पित असणे म्हणजे अधिष्ठान होय. विचलित न होता घेतलेले कार्य करणे, म्हणजे अधिष्ठान होय.

९) करूणा पारमिता : – सर्वच सजीव प्राण्याप्रती दयाभाव बाळगणे, दयेला प्रेमाची जोड देणे म्हणजे करूणा होय. दया म्हणजे करूणा नव्हे. करूणा ही पुत्रवत प्रेम सारखी असावी. करूणेमुळे प्राणीमात्रांचे जीवन फुलते, निर्भय बनते. बुध्दाच्या ठायी असलेली करूणा ही अथांग सागरा समान होती. म्हणून बुध्दाला करूणा सागर म्हणतात. प्रेमयुक्त दयेला कृतिची जोड असणे म्हणजे करूणा होय. विश्वातील समस्त दुःखीतांप्रती बुध्दाच्या मनात करूणा जागली व म्हणूनच बुध्दाने शुध्द असा बुध्द धम्म जनकल्याणासाठी प्रर्वतीत केला. म्हणून बुध्द हे करूणेचे प्रतिक होते. करूणादर्श होते महाकारुणिक होते.

१०) मैत्री पारमिता : – आपला मित्र असो वा शत्रु, आपला हितचिंतक असो वा टीकाकार सांप्रती दयाभाव, प्रेमयुक्त दया बाळगणे म्हणजे मैत्री होय, केवल मनुष्याप्रतीच मैत्री नव्हे तर सर्वच प्राणी मात्रांप्रती दयाभाव. प्रेमभाव ठेवणे, प्रेम युक्त दयाभाव म्हणजे मैत्री होय. मैत्रीला कसलीच बंधने व सीमा नसतात. मैत्री ही वैश्विक असते. ती प्रांत व देशांच्या सीमा ओलांडून जाते ती बंदीस्त नसते, म्हणून मैत्री ही अत्यंत महत्वाची आहे. मैत्रीचा लोप म्हणजे विनाश होय.

यावरून बौध्द धमीय व्यक्तींनी शीलांचे पालन करणे व उत्कृष्ठ गुणांचा, पारमितांचा संचय करणे आवश्यक आहे याची कल्पना येते. या दहा पारमिता आपल्या जीवनात उतरल्या पाहीजे. यातच सर्व प्राणीमात्रांचे कल्याण आहे. बुध्द धम्म म्हणूनच आचरणात आणण्याचा धम्म आहे. कर्मकांडाचा धर्म नाही. हा जाणून घेण्याचा धर्म आहे. निव्वळ शब्दांच्या कसरती करण्याचा धम्म नाही. खुप ग्रंथ वाचणे, पद मिळवणे, म्हणजे बौध्द होणे नव्हे, तर पंचशील तत्वानुसार जीवन जगणे, आर्य अष्टांगिक मार्गानुसार चालणे, त्याचे पालन करणे व जीवनात दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौध्द होणे होय.

3 Replies to “या दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौध्द होणे होय

  1. Manushprani mansikta sharirk aarthik aani sawvidhanik angikrut krawe ani lokshaba Rajysabaha vidansabha lokprtindi ni samajek pariwarrtan bharty Nagari kanna kamkarnes pravert karwe

Comments are closed.