बातम्या

झारखंड येथे सापडले दहाव्या शतकातील बौद्ध विहार

झारखंडची राजधानी रांची जवळ हजारीबाग जिल्ह्यामध्ये “झुळझुळ” टेकडीच्या पायथ्याशी १० व्या शतकातील पाल राजवटीमधील एक बौद्ध विहार पुरातत्व विभागाला उत्खननात नुकतेच सापडले. झुळझुळ टेकडीच्या पायथ्याशी तीन छोट्या टेकड्या होत्या. मागील वर्षी तेथे उत्खनन करताना बौद्ध संस्कृतीचे अवशेष आढळले होते. परंतु कोविड लॉकडाऊन मुळे काम ठप्प झाले होते.

यावर्षी उत्खननाच्या दुसऱ्या फेरीत जानेवारीत तेथे बौद्ध विहाराचे अवशेष आढळून आले. तेथे तीन कक्ष असून एका बाजूस बुद्धांची ध्यानस्थ मुद्रा असलेली चार शिल्पे आणि भूमीस्पर्श मुद्रेचे एक शिल्प मिळाले आहे. त्याच प्रमाणे तारा देवतेचे शिल्प तेथेच प्राप्त झाले आहे. डॉ. नीरज मिश्रा , सहाय्यक पुरातत्ववेत्ते यांनी सांगितले की हे वज्रयान पंथाचे विहार असून ५० × ५० चौ.मी. जागेवर स्थापित असल्याचे दिसून येते. तारा हे स्त्री बोधिसत्वाचे महायान पंथातील रूपक असून वज्रयान पंथात तिची अनेक रूपे आढळतात.

हे ठिकाण पूर्वी मोठे धार्मिक स्थळ असावे कारण सारनाथ आणि गया येथे जाण्यासाठी येथूनच प्राचीन रस्ता होता. प्रवेशद्वार आणि पायऱ्या देखील येथे आढळल्या आहेत. सितागढ जिल्ह्यात बोऱ्हानपूर गावी सुद्धा गौतम बुद्धांचे शिल्प मिळाले आहे. थोडक्यात झारखंडमध्ये नवीन बौद्धस्थळे उत्खननात प्राप्त होत असून एकेकाळी बौद्ध संस्कृती भारतभर बहरली होती हे दिसून येते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)