ब्लॉग

शेतात सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीसाठी ग्रामस्थांनी बांधले सुंदर बुद्ध विहार

तामिळनाडूत सालेम जिल्ह्यात थलाईवसल तालुक्यात थियागणुर गावातील शेतात एक सात फूट उंचीची ध्यानस्थ बुद्धमूर्ती अनेक वर्षे पडून होती. अनेक पिढ्या त्यास पाहून गुजरल्या. पण जागृती नसल्याने तीचे काय करायचे हे तेथील जनतेला माहीत नव्हते. भारतात ब्रिटिशांच्या काळात झालेल्या उत्खननात बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडल्यावर बुद्धांची माहिती जनसामान्यांत झिरपत गेली. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, बुद्ध तत्त्वज्ञानाचा झालेला प्रसार, धम्माबाबत झालेले आकलन यामुळे बुद्ध म्हणजे कोण ? तो आपल्या भारत भूमीचा कसा ? याबद्दल कुतूहल वाढीस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सर्व भारतभर बुद्ध माहीत झाला. या थियागणूर गावातील साक्षर झालेल्या पिढीने सुद्धा बुद्धांबाबत रस घेतला. आणि मग अनेक पिढ्या त्यांच्या शेतात पडून असलेली पाषाणाची बुद्धमूर्ती काढून तीची स्थापना एका विहारात करायची या याबाबत सर्वांचे बैठकीत सहमत झाले.

बुद्धविहाराला सर्वांचा हातभार लागला पाहिजे. तरच धम्म समाजात बहरतो. सालेमच्या या बुद्धविहारापासून स्फूर्ती घेऊन सर्वांनी त्याचा धडा गिरवावा. तरुण पिढीला विहाराच्या बांधकामात सहभागी करून घ्यावे.

मग अनुभवी तांत्रिक सल्लागाराकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार मग मोठमोठ्या उद्योग कंपन्यांकडून व लोकांकडून एकूण ७० लाखांचा निधी गोळा करण्यात आला. त्याची व्यवस्थित नोंद ठेवण्यात आली. या विहारासाठी एका शेतकऱ्याने आपली जमीन दान दिली आणि मग सुंदर विहार बांधण्यात आले. या विहाराचे उदघाटन सालेमचे त्यावेळेचे जिल्हाधिकारी महारभूषणम् यांच्या हस्ते २८ जून २०१३ रोजी झाले. तसेच तेथे बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले. अशा तर्हेने नवीन तरुण पिढीला मोठे मार्गदर्शन यातून मिळाले. त्यांच्या पुढील आयुष्यात धम्म फुलविण्यासाठी आयुष्यभराची योग्य पुंजी मिळाली.

थियागनूर गावाजवळच दुसरी बुद्धमूर्ती आढळली असून तिची स्थापना अद्याप विहारात झाली नाही.

हे सर्व सांगण्याचा मुद्दा अशासाठी की आज आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बुद्ध विहार बांधण्यासाठी लोक एकत्र येतात. निधी गोळा करतात. आणि मग कामाला सुरुवात झाली की काही हुशार लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. दुही माजवितात. मग भांडणे होऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊन विहार उभे करण्याचे काम ठप्प होते. विहार बांधावयाचा मूळ हेतू बाजूला राहतो. वर्षे सरत जातात त्या जागेवर अतिक्रमण होत जाते. संबंधित पिढी वार्धक्याकडे झुकते. अशा तऱ्हेने बुद्धविहाराचे काम कायमचे ठप्प होते.

सालेम बुद्ध विहारातील बुद्धमूर्ती

नवीन तरुण पिढीला यातून चुकीचे मार्गदर्शन होते. तरी अशा चांगल्या कार्यात अडथळे आणणारे यांना वेळीच ओळखून त्यांना दूर करावे. विहाराचा प्रकल्प राबविताना योग्य, अनुभवी आणि प्रामाणिक व्यक्तीची निवड करावी. जेणे करून सगळ्यांना घेऊन प्रामाणिकपणे विहार बांधण्याचा तो कसोशीने प्रयत्न करेल. त्याच्यावर विश्वास ठेवून सत्य धर्माची कास शेवटपर्यंत ठेवावी. व्यवस्थित नोंदी ठेवाव्यात. तरच विहाराचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल.

तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याचे त्यावेळचे जिल्हाधिकारी के.महारभूषणम यांनी बुद्ध विहाराचे उदघाटन केले. ते आता निवृत्त झाले आहेत.

सालेमचे हे उदाहरण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावे. एकत्रित राहून कामे केल्यास हेतू साध्य होतो. कामात जरी अडथळे आले तरी धम्म आपोआप सहाय्य करतो, हे लक्षात ठेवावे. विहार उभे करणे, त्याची देखभाल करणे, तेथे नियमित जाणे म्हणजे मोठे पुण्यकर्म अर्जित करणे होय. आज कोंकण प्रदेशात अनेक बुद्ध विहारे उभी रहात आहेत. मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर या घाटप्रदेशात असे दिसत नाही. पालि साहित्यातील ‘कुलावक’ जातक कथा एकीने राहून, सत्यमार्गाने चालून विहार कसे उभारावे याचीच गोष्ट सांगते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)