इतिहास

बुद्धाचा बामियान : तालिबानने फोडलेल्या बुद्धमूर्तीच्या ढिगाऱ्यात लाकडावर कोरलेली गाथा सापडली

अफगाणिस्तानातील हिंदुकुश आणि कोह-इ-बाबा या पर्वत श्रेणींच्या मधल्या सुपीक प्रदेशाला बामियान असे म्हणतात. बामियान येथे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या प्राचीन बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या. मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या बुद्ध मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. यापूर्वी १७ व्या शतकात औरंगजेबाने तोफेच्या गोळ्यांनी या मुर्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानचे वर्चस्व निर्माण झाल्याने तेथील प्राचीन वारसा बुद्धाचा बामियान नष्ट होतो की, काय अशी भीती निर्माण झाली आहे.

अलेक्जेंडर बर्नस द्वारा १८३२ मध्ये बमियानच्या बुद्धांचे चित्रण.

बामियान हा ८५०० फूट उंचावर असलेला हा प्रदेश काबूलच्या वायव्येला साधारणपणे १३० किलोमीटर अंतरावर आहे. या प्रदेशातील शेकडो बौद्ध लेण्या आणि स्तुपांचे अवशेष हे इतिहासाच्या बऱ्याच मोठ्या कालखंडात, इस्लाम येईपर्यंत अफगाणिस्तान बौद्धमय होता, याची ग्वाही देतात. येथील पर्वतराजीत मैलभर सर्वत्र चैत्य, विहार, मोठमोठी सभागृहे आणि भिक्खू निवास खडक कोरून केलेली आढळतात. डोंगरांच्या उतारावर लेण्या कोरलेल्या आहेत. अलीकडच्या काळात रशियन आणि त्यानंतर अमेरिकन सैन्याने लेण्यात दडून बसलेल्या शत्रूचा नि:प्पात करण्यासाठी तेथे जोराची बाँबफेक केल्यामुळे त्या लेण्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

बामियान

इसवीसन ६३० मध्ये चिनी प्रवासाची ह्यु-एन-त्सँग केलेली नोंद
चिनी बौद्ध भिक्षु ह्यु-एन-त्सँग इ.स.६३० साली बामियानला गेला होता. त्याने आपल्या प्रवासवर्णन केलेल्या पुस्तकात या प्रदेशाला ‘फन येन-ना’ असे म्हणतो. राजधानीच्या उत्तर पूर्व दिशेला एक पर्वत आहे. त्याच्या उतारावर दगडात उभी कोरलेली १४० किंवा १५० फूट उंचीची बुद्धाची मूर्ती आहे. त्याचा सोनेरी रंग सर्व दिशांनी चकाकतो. त्याच्यावरील रत्ने पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतो. तसेच बामियान शहराच्या पूर्वेस दोन मैल अंतरावर १००० फूट लांबीची महापरिनिर्वाण अवस्थेतील आडवी पडलेली मूर्ती असल्याची नोंद ह्यु-एन-त्सँगने करून ठेवली आहे. त्यावर आजही संशोधन सुरु आहे.

ह्यु-एन-त्सँग इ.स.६३० साली बामियानला गेला होता

औरंगजेबाकडून बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचे प्रयत्न
एनसायक्लोपेडिया ऑफ इस्लाममध्ये ( १९२६) असे लिहिले आहे की , तेथील बौद्ध मूर्ती नष्ट करण्याची आज्ञा औरंगजेबाने ( इ.स .१६५८ ते १७०७ ) तेथील आपल्या एका सेनापतीला केली होती. औरंगजेबाच्या त्या सेनापतीने बामियान येथील बुद्ध मूर्ती नष्ट केल्या आणि दोन उभ्या मूर्ती तोफेच्या गोळ्यांनी विद्रूप केल्या. असे असले तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत तो प्रदेश बुत-इ-बामियान या नावाने ओळखला जात असे. बुत म्हणजे बुद्ध. बुद्धाचा बामियान असा त्याचा अर्थ होतो.

सर्वात मोठ्या मूर्तीची उंची १८० फूट
इ.स. १८८५ साली कॅप्टन तालबोट याने बामियान प्रदेशातील पाच अतिभव्य मूर्तीविषयी लिहिले आहे. त्यापैकी दोन अतिभव्य मूर्ती जगप्रसिद्ध आहेत. तिसरी मूर्ती ५० ते ६० फूट उंचीची होती. ती आता दिसत नाही. चौथी ध्यान मुद्रेत बसलेल्या अवस्थेतील मूर्ती २५ ते ३० फूट उंचीची होती. ‘आणि पाचवी मूर्ती तो स्वतः पाहण्यासाठी जाऊ शकला नाही. त्याच्या अगोदर पन्नास वर्षांपूर्वी सी.मॅस्सॉन याने दोन मोठ्या मूर्तीच्या मध्ये आणखी दोन मूर्तीच्या खाचांच्या तळाशी मूर्तीचे अवशेष पाहिल्याचे लिहिले आहे. तालिबानांनी मूर्ती नष्ट केल्यानंतर अफगाणिस्तानात दुसऱ्या एका ठिकाणी ३०-३५ फूट लांबीची महापरिनिर्वाण मुद्रेतील आणखी एक मूर्ती भग्नावस्थेत मिळाली होती. बामियानमधील दोन अतिभव्य उभ्या मूर्ती एवढ्या भव्य मूर्ती जगात आतापर्यंत कुठेच निर्माण झाल्या नाहीत. त्यातील सर्वात मोठ्या मूर्तीची उंची १८० फूट होती. दोहोंमध्ये एक मैलाचे अंतर होते. त्यात असलेल्या शिलालेखांचे अजून वाचन झाले नाही.

बामियानच्या मूर्ती कशा निर्माण केल्या
बेंजामीन रोलैंड याने ‘दी आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ इंडिया’ ( १९५६) या पुस्तकात बामियानच्या मूर्ती कशा निर्माण केल्या याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मूर्ती खडकातून कोरल्यावर चिकण मातीच्या गिलावात गवत बारीक करून मिसळले होते. त्याचा गिलावा केल्यावर त्यावर चुन्याचा गिलावा करून लावला होता. चिवराच्या घड्या नीट दिसाव्यात म्हणून दोरखंड घड्यासारखे टाकून त्यावर लाकडीकाम केले होते. गिलावा झाल्यावर त्याला सोन्याच्या वर्खाने रंग दिला होता. सर्व मूर्ती आणि त्यांच्या खाचा नैसर्गिक गंगाने सुशोभित केल्या होत्या. ज्या ठिकाणी लुटारू जाऊ शकत नव्हते, तेथील वरच्या खाचांत अजूनही रंग दिसून येतो. तेथील चित्रकला प्रामुख्याने भारतीय, इराणी आणि मध्य आशियातील आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चित्रातील मंडल ‘तिबेटियन आणि जपानी शैलीची आहेत. रोलँडच्या म्हणण्याप्रमाणे मूर्तीचे कोरीव काम इसवी सनाच्या तिसऱ्या – चौथ्या शतकात केले असले पाहिजे. एफ.आर.अलचिन याच्या म्हणण्याप्रमाणे ते सहाव्या सातव्या शतकात केले पाहिजे. (एनसायक्लोपेडिया ऑफ इस्लाम, पृ.१०००)

तोडफोड झालेल्या बुद्धमूर्तीच्या दगडी ढिगाऱ्यात लाकडावर कोरलेली गाथा सापडली

अफगाणिस्तानातील पुराणवस्तू संशोधन करण्याचा परवाना फ्रेंच पुराणवस्तूशास्त्रज्ञांना १९२२ साली मिळाला होता. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीचा अंमल आल्यानंतर २००१ मध्ये तालिबानी अतिरेक्यांनी तोफांच्या साहाय्याने या सुंदर आणि अतिप्राचीन बुद्धमूर्ती नष्ट केल्या. जागतिक वारशासंदर्भात संशोधन करणाऱ्या जागतिक संस्थेतील जर्मन संशोधकांना बामीयानमध्ये तोडफोड झालेल्या बुद्धमूर्तीच्या दगडी ढिगाऱ्यात एका संस्कृत भाषेतील उत्किर्ण लेखातील गाथा सापडली. या गाथेमध्ये बुद्धधम्माची मूलभूत शिकवण आहे. जगातील सर्व गोष्टी अनित्य आहेत, असे त्यात म्हटले आहे. ही गाथा लाकडावर कोरलेली आहे. ही संस्कृत गाथा तत्कालीन बामीयान, उत्तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचलीत असलेल्या लिपीमध्ये आहे. त्यावरती काही कापडही लपेटलेले असून ती चिखलाच्या गोळ्यामध्ये सिलबंद केली आहे. या गाथेवरोबरच धातूची पेटी असून त्यावर फुलांची नक्षी आहे.

जगप्रसिद्ध इतिहास लेखक अर्नाल्ड टॉयनबी येथे आला होता. तेथील चंद्रप्रकाशातील निरव शांतता अनुभवून त्याने बुद्ध धम्माविषयी लक्षात ठेवण्यासारखे उद्गार काढले होते. शेवटी तो म्हणतो , “बौद्धांची शांती पाश्चिमात्यांच्या जीवनातील संघर्षाला हळूहळू शांत करेल.”

संदर्भ : जगातील बुद्ध धम्माचा इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *