इतिहास

भ. बुद्धांचा दुसरा वर्षावास – सितवन, राजगृह, भाग -५

राजगृह मध्ये बुद्ध वेळूवनात राहत. अनेकवेळा ते चंक्रमन व ध्यान करण्यासाठी गृधकूट डोंगरावर भिक्खूसंघासह जात. येथे अस्साजी यांची भेट सारीपुत्त यांच्याशी झाली होती व अस्साजी यांच्या वक्तव्यावर प्रभावित होऊन ते मोग्गाल्लन यांना घेऊन बुद्धांकडे आले. याच ठिकाणी दोघांची प्रवाज्या झाली. येथील सुकरखता गुहेत बुद्धांनी दीघनख सुत्त याच गुहेत दिले होते.

वेळूवन मध्ये असताना बुद्धांचा लहानपणीचा मित्र काल उदायी निरोप घेऊन आला. राजा शुद्धोदन यांनी फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तूला येण्याची विनंती केली होती. सारीपुत्त, मोग्गाल्लन आणि काही भिक्खूसंघ यांना घेऊन कपिलवस्तूला पोहचले व तेथील न्यग्रोधाराम वनात राहिले. अट्ठकथे नुसार येथे महापजापती गोतमीने प्रवज्या देण्याची विनंती केली होती. येथेच बुद्धांनी आपला पुत्र राहुल आणि सावत्र भाऊ नन्द याला प्रवज्या दिली.

कपिलवस्तू वरून निघताना बुद्ध मल्लांच्या अनुपिया नगरीत पोहचले. गृहत्याग केल्यानंतर याच नगरीत काही दिवस सिद्धार्थाने ध्यान केले होते. दीघनिकायतील पाथिक सुत्तनुसार येथील आम्रवनात भद्दीय, आनंद, भृगु, किंम्बिल, देवदत्त आणि उपाली यांची प्रवज्या झाली. आज मझन नदीच्या पात्रात दिसत असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांवरून “घोड टप” म्हटलेलं भाग म्हणजेच पूर्वीचे अनुपिय नगरी होय.

बुद्ध राजगृहात दुसऱ्या वर्षावासासाठी “सितवन” या स्मशान वनात राहिले. “सितवने ति एवं नामके सुसानवने” असे बुद्धघोशांनी लिहिले आहे. आज राजगीर च्या पश्चिमेस एक प्राचीन स्मशानभूमी आहे. हीच त्याकाळातील सितवन आहे. याच ठिकाणी श्रावस्तीचा श्रेष्ठी सुदत (अनाथपिंडक) बुद्धांच्या प्रवचनाने प्रेरित होऊन त्यांना पुढील वर्षावास श्रावस्तीस येण्याचे आमंत्रण दिले जे बुद्धांनी स्वीकार केले.

अतुल भोसेकर

संदर्भ:
जातक
धम्मपद अट्ठकथा
The Life of Buddha
बुद्धकालीन भारतीय भूगोल
सारत्थप्पकासिनी
Ancient Geography of India
महापरिनिर्वाण यात्री – ले. मुरलीधर भोसेकर
कुशीनारा का इतिहास
मजझीम निकाय
सुत्त निपात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *