पाकिस्तानच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमात आता लवकरच बुद्धिझमचा समावेश होणार आहे, ही मोठी आश्चर्याची आणि आशादायक बातमी आली आहे. पाकिस्तानात सर्वत्र एकच राष्ट्रीय अभ्यासक्रम राबविला जाणार असून देशातील सर्वांना समान शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. दिनांक ४ मार्च २०२२ रोजी बुद्धिझमचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच सर्वधर्मसमभावचा गजर चालू होईल, असे आशादायक चित्र तयार झाले आहे. शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. तसेच यथावकाश बहाई, ख्रिश्चन, हिंदू, कलश आणि शीख या धर्मांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरियाच्या जोगीय धम्मपीठाला पाकिस्तानात बौद्धविहार उभारण्याची अनुमती दिली आहे. त्याचबरोबर जपान देशसुध्दा उत्तर पाकिस्तानात मोठे बुद्ध विहार उभारीत आहे. यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक बौद्ध समाजाला यामुळे मोठा आधार मिळणार आहे. तसेच स्वात खोऱ्यात सर्वत्र चालू असलेल्या उत्खननात असंख्य स्तूप आणि विहार सापडत असल्याने प्राचीन बौद्ध संस्कृतीचा मोठा वारसा उजेडात येत आहे. बुद्धिझमचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याने विद्यार्थ्यांना बौद्ध तत्वज्ञानाची ओळख होईल. थोडक्यात पाकिस्तानात सुधारणेचे वारे वहात असून भविष्यात तेथील बौद्ध संस्कृतीच्या असंख्य स्थळांना नवंसंजीवनी मिळेल अशी आशा करूया.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)