१) बहुतेक करून व्हिएतनामी जनता ही बौद्ध तत्वांचे पालन करते. कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा येथे बौद्ध भिक्खुंचे महत्व अबाधित राहिले. व्हिएतनामी बुद्धिझम हा अनेक शाखांचे मिश्रण असलेला बुद्धिझम आहे. त्यातील काही ठळक बाबी या जापनीज झेन, चायनीज चॅन, तिबेटीयन बुद्धिझम आणि अमिताभ (Pure Land) बुद्धिझम प्रमाणे आहेत. त्यामुळे येथील बुद्धिझमवर महायान शाखेचा पगडा दिसतो. फक्त मेकाँग डेल्टा भागातील बौद्ध हे थेरवादी आहेत. थेरवादी बुद्धिझम हा थायलंड, कंबोडिया, म्यानमार आणि सिलोन येथे आढळतो तर महायान बुद्धिझम चीन, जपान, कोरिया देशात आढळतो.
२) व्हिएतनामी जनतेच्या मते बुद्धिझम नुसता धर्म नसून संसारातील अनित्यता समता भावनेने पहात जीवन जगण्याचा एक उच्चतम मार्ग आहे. लोकांचा विश्वास आहे की पेराल तसे उगवेल. आज जी फळे ते चाखत आहेत त्याची भूतकाळात त्यांनी पेरणी केली होती. थोडक्यात ते पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. आजचे जीवन जगणे हे पूर्व जन्माच्या कृत्याचा परिणाम आहे असे ते मानतात.

३) इ.स. २ऱ्या शतकात व्हिएतनाममध्ये बौद्धधर्म आला. आणि ११व्या शतकापर्यंत तो शिगेला पोहोचला होता. लोकांच्या दैनंदिन जीवनात बुद्धिझमचे वर्चस्व दिसते. येथील चालीरीती, परंपरावादी साहित्य आणि स्थापत्यशास्त्र यावर त्याचा पगडा दिसून येतो. इ.स. १०१० मध्ये येथे बौद्ध राजे राज्य करीत होते आणि अनेक राजांनी मॉनेस्ट्रीज बांधल्या व भिक्खूंना ते मान देत होते. ११ व्या शतका नंतर महायान बुद्धिझम इथे बहरला. पण शासनकर्ते यांची तत्वप्रणाली चायनीज होती.

४) १५ व्या शतकात चायनीज ताओइझम आणि कनफुइझम यांचा प्रवेश होऊन ते प्रबळ झाले. त्यामुळे बुद्धीझमची जरी पीछेहाट होऊ लागली तरी बौद्ध धर्माची तत्वे जनमाणसात त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ठळकपणे टिकून राहिली. १९ व्या शतकात फ्रेंच राज्यकर्त्यांनी कॅथॉलिझमचा जोरदार प्रसार केला. तरीही भिक्खूंच्या आश्वासक आणि सत्यमार्गाने चालण्याचा वृत्तीने बुद्धीझमची विश्वासार्हता टिकून राहिली.

५) काही प्रांतात कन्फ्युशियन आणि ताओइझम यांचे मिश्रण होऊन बुद्धीझमचा नव्याने विस्तार झाला. सन १९२० नंतर बुद्धिझम परत पुनर्स्थापित होऊ लागला. १९३१ मध्ये असोसिएशन ऑफ बुद्धीष्ट स्टडीज उत्तर, दक्षिण व मध्य व्हिएतनाममध्ये स्थापित झाले. त्यामुळे अनेक बौद्ध शाळा व संस्था स्थापन झाल्या.आजमितीस ७० टक्के जनतेने नवीन मिश्र बुद्धीझम अंगीकारला असून बहुतेकजण बौद्ध विहारांमध्ये जातात.
६) इथे विहारातील नियम कडक आहेत. अंग कपड्यांनी झाकलेले असावे. पादत्राणे बाहेर काढावी लागतात. विहारात डावीकडून उजवीकडे ( Clockwise ) प्रदक्षिणा घालणे योग्य समजले जाते. विहारांचा खर्च चालविण्यासाठी दानपेटीत पैसे टाकल्यावर बुद्धमूर्तीला खाली बसून व वाकून नमस्कार करावा लागतो. अशा वेळी तेथे हजर असलेले भिक्खू आशीर्वाद देतात. तसेच विहारात पूर्ण शांतता पाळावी लागते.

७) भिक्खूंच्या शिक्षणासाठी येथे पैसे खर्च करावे लागत नाहीत. बहुतेक भिक्खूंना येथे मार्शल आर्ट म्हणजेच कुंगफू व कराटे माहित असतात. सामाजिक जीवनात भिक्खूंना खूप मान असतो. सत्य बाबींशी इमान राखण्यासाठी तसेच त्याची प्रचिती देण्यासाठी स्व:आहुती देणे हे बुद्ध परंपरेशी इमान राखणे होय, असे तेथे समजले जाते. व्हिएतनाम मधील काही भिक्खूंनी अमेरिका बरोबरच्या युद्धकाळात आत्मदहन करून त्याची प्रचिती जगाला दिली आहे.
८) व्हिएतनामी स्त्री-पुरुषांची शरीरयष्टी भारतीयांपेक्षा किरकोळ वाटते. पण त्यांची चिकाटी व सहनशीलता सर्व जगाने युद्धकाळात बघितली आहे. तरुण पिढी मिळेल ते काम आनंदाने करते. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ अशी सर्वांची वृत्ती असते. सार्वजनिक ठिकाणी सर्वजण वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. तेथे अनेक चौकात सिग्नल नसतात. तरीही वाहतूक सुरळीत चालू असते.

९) हनोई शहराच्या आसपास शिल्प कारखाने दिसले. महायान शाखेतील बुद्धांची अनेक रूपे तसेच देवतांची सुंदर संगमरवरी शिल्पे तेथे आढळली. दुकानात किंमतीबाबत घासाघीस करू शकतो. लाकडी कोरीवकाम केलेल्या बुद्धमूर्ती सुंदर आणि स्वस्त होत्या. कपडे स्वस्त असल्याचे दिसले. टापटीप व स्वच्छता सगळीकडे आढळली. कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता तरी सर्वजण मास्क वापरत होते.दुपारचे त्यांचे जेवण महत्त्वाचे असते. उकडलेल्या भाज्या जेवणात खूप असतात व त्या चवीला चांगल्या होत्या. फक्त भारतीय हॉटेलमध्येच रोटी मिळते. म्यानमार देशामध्ये जेवणातील काही पदार्थांना उग्र वास असतो. त्यामुळे काहीवेळा घास गिळवत नाही. पण व्हिएतनामी शाकाहारी जेवण खूपच चांगले होते.

१०) दानांग शहरात ‘आगरी बँक’ चा नामफलक दिसला तेव्हा चमकलो. पण ती बँक आपल्या आगरी बांधवांची नसून तिथली ऍग्रीकल्चर बँक असल्याचे समजले. सायगाव शहराचे नाव आता ‘हो-ची-मिन्ह’ असे आहे. तेथील अनेक इमारतींना ऐतिहासिक फ्रेंच लूक दिलेला आढळतो. व्हिएतनामला अफाट समुद्र किनारा लाभलेला आहे. तेथील दक्षिण चीन सागरातील ‘च्याम’ बेट खूपच बघण्यासारखे आहे. आपल्या कोंकण प्रदेशासारखी सुकी मासळी तेथे मिळाल्याने आनंद झाला. तरी लाओस व कंबोडिया या दोन्ही बौद्ध देशांना लागून असलेला शांत आणि निसर्गरम्य व्हिएतनाम पुन्हा बघायला निश्चितच आवडेल.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)