इतिहास

गौड बंगाल म्हणजेच बौद्ध बंगाल

सम्राट अशोक यांच्या कारकिर्दी नंतर इ.स. पूर्व २ ऱ्या शतका पासून बंगाल प्रांत हा महायान आणि वज्रयान या बौद्ध पंथाच्या शाखांनी भरभराटीला आला होता. पुढे पाल राजवटीने ८ व्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत येथे राज्य केले. ते स्वतः बौद्ध होते आणि धम्माचे मोठे पुरस्कर्ते होते. गोपाळ, धर्मपाल, देवपाल या राजांच्या काळात शाक्यप्रभ, दानशील, विशेषमित्र, प्रज्ञावर्मन असे मोठे विद्वान होऊन गेले. विक्रमशीला, ओदांतपुरी, सोमपुरा अशी अनेक प्रसिध्द विश्वविद्यालये त्यांच्या काळात स्थापन झाली. त्यांची कीर्ती सगळीकडे इतकी पसरली होती की समुद्रात दुरवर असलेल्या जावा सुमात्रा मलाय बेटावरील राजा बालपुत्र यांनी देखील नालंदा विश्वविद्यालयात एक विहार बांधले होते. आता या बंगाल प्रांताचे विभाजन झाले असून पश्चिम बंगाल राज्य आणि बांगलादेश राष्ट्र असे दोन भाग झाले आहेत. सध्यस्थितीत थेरवादी बौद्ध परंपरा तेथे प्रचलित आहे.

पाल राजा धर्मपाल याने बौद्ध तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी अनेक संघाराम स्थापन केले होते. बौद्ध ग्रंथकर्ता हरीभद्राबद्दल त्याला फार श्रद्धा होती. त्याच्या काळात कल्याणगुप्त, सुंदरव्यूह, सागरमेघ, प्रभाकर, पूर्णवर्धन, बुद्धज्ञापद इत्यादी बौद्ध विद्वान होऊन गेले. बौद्ध धम्मावर त्याची अचल श्रद्धा होती तरी त्याने ब्राह्मणांना देखील दान दिले होते. गर्ग नावाच्या ब्राह्मणाची त्याने मंत्री म्हणून नेमणूक केली होती. महिपाल नावाच्या राजाने देखील सारनाथ, नालंदा, बुद्धगया येथील बौद्ध स्थळांच्या इमारतींची दुरुस्ती केली होती. अतीषा दीपंकर, रत्नाकर शांती सारखे विद्वान भिक्षूं त्याच्या काळात होऊन गेले. पाल राजांची राजपत्रे भगवान बुद्धांना वंदन करून सुरू होतात. त्यांच्या अनेक राजांनी त्रेयकुटक, देवीकोट, पंडित, फुल्लहरी, पट्टीकेरक, विक्रमपुरी आणि जगद्दला येथे मोठे संघाराम बांधले. तिबेटच्या बुद्ध धम्मावर पालांच्या काळातील बुद्ध धम्माचा फार प्रभाव पडलेला आहे.

बरुआ, चकमा, मारमा, राखैन, लार्मा अशा बऱ्याच बौद्ध जमाती बंगालमध्ये आज नांदत आहेत. परंपरेने चालत आलेल्या बौद्ध जीवन पद्धती त्यांनी अंगिकारल्या आहेत. कोकणात बंगाल वरून आलेले गौड सारस्वत ब्राह्मण हे त्यांचेच वंशज आहेत. पण आज ते स्वतःचाच इतिहास विसरले आहेत. गौडा, पगोडा, बुडा ( बुध्दा) ही सगळी नावे पाल राजवटीतील बौद्ध संस्कृतीची आहेत. बौद्ध तत्वज्ञानचा अंगिकार करणाऱ्यांना त्याकाळी गौड म्हणत. पाल राजे स्वतःस गौडेश्वर संबोधत. बौद्ध बंगाल म्हणजेच गौड बंगाल असे नामनिधान पाल राजवटी पासून रुजलेले आढळते. परंतु काळाच्या ओघात आज गूढ, रहस्य, कूट रचना असा वेगळाच अर्थ रूढ झाला आहे. सत्याचा विपर्यास करून इतिहासाची पाने लिहिणारे मोठे हुशार होते हेच यातून सिद्ध होते.

मात्र १५ व्या शतकानंतर मुस्लिम आक्रमणामुळे बंगालचे रुपडेच पालटून गेले. अनेक प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूस झाली. धम्म लयास गेला. अकुशल कृत्यांना उत आला. जादुटोणा, चेटूक आणि कामाख्या मंदिरामुळे या वंग प्रदेशास पेशवाईत “बंगाल, लई वंगाळ” असे म्हटले जात असे. सन १९२५ मध्ये कृष्णा परशुराम भावे या कराचीत जन्म झालेल्या मराठी माणसाने “गौड बंगाल” नावाचा मुक सिनेमा लिहून दिग्दर्शित केला होता असे समजते. असो, आता बंगाली भाषेत बुध्द न म्हणता बुद्धोधरमो असे म्हणतात. सध्यस्थितीत पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल (बांगलादेश) मधील उध्वस्त करण्यात आलेली अनेक प्राचीन बौद्धस्थळे जगाच्या पटलावर येत असून तेथील नवीन पिढीला त्याबद्दल आत्मीयता व अभिमान वाटत आहे. बांगलादेशात अनेक प्राचीन बौद्ध विहारांचे अवशेष प्राप्त होत आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)