जगभरातील बुद्ध धम्म

मध्य आशियातील बौद्ध धर्म

अफगाणिस्तान, पेशावर, गांधार, तुर्कस्तान, खोतान, काशगर, कुचा, तुर्फान-पाकिस्तान, अफगाणीस्तान व भारताचा वायव्य सरहद्द प्रांत हा बौध्द धम्माच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा आहे. सुवास्तू नदीचा (आताची स्वात नदी) परिसर म्हणजे प्राचिन सोळा जनपदापैकी गांधार, कंम्बोज प्रदेश होय. कुभा म्हणजे सध्याची पश्चिमवाहीनी काबुल नदी होय. सम्राट अशोकाचे राज्य या प्रदेशापर्यत पसरले. शहबाजगढी या सध्याच्या गावाजवळ सम्राट अशोकाचे धम्मलेख, शिलालेख (धर्माज्ञा) सापडतात. खारोष्ट्री लिपीमध्ये हे चौदा शिलालेख कोरलेले आहेत.

मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर या भागामध्ये इंडो-पशिर्यन, इंडो-ग्रीक या मिश्र वंशाच्या राजांनी तसेच शक, कुषाण आणि हुण या आक्रमक टोळयांनी राज्य केले. याच काळात गांधार शिल्पकलेचे मोठे केंद्र येथे उदयाला आले. इ. स. नंतर कुषाण राजंवशाच्या काळामध्ये येथे मोठे चैतन्य उत्पन्न झाल्याचे दिसते. कुषान राजे बौध्द धम्माचे केवळ उपासकच नव्हते तर महायानी बौध्द पंथाचे प्रवर्तक व आश्रयदाते होते. सम्राट कनिष्काच्या काळानंतर इ.स. तिसरे शतकामध्ये या भागात बौध्द धम्म पसरला होता. स्वात खोऱ्याच्या दक्षिणेला असणारे पुरुषपूर म्हणजे आजचे पेशावर ही त्यांची राजधानी होती.

तक्षशिलेचे विद्यापीठ काबूल नदीच्या दक्षिणेस स्वातपासून जवळच होते. तक्षशिला बौध्दविद्यापीठ जगात प्रसिध्द होते. कुषानांच्या काळात बुध्दाबरोबरच हिंदू देवतांची शिल्पे कोरली गेली. पश्चिमेकडे इराणमार्गे अरबस्थान आणि यरोपकडे जाणारा मार्ग या प्रदेशातून होता. कुशान राजांमुळे मध्य आशियात बौध्द धम्माचा प्रचार झाला. तसेच चीनकडून रोमकडे जाणाऱ्या प्राचीन रेशीममार्गाचा फाटा पामीरच्या पठाराजवळ दक्षिणेकडे भारतात येतो. याच मार्गेर् चीनी प्रवासी भारताकडे आले होते. या भागाचे एक नाव उड्डीयान असे होते. येथे अनेक लहान मोठी बौध्द शिल्पे होती. असे वर्णन चिनी प्रवासी युवान श्‍वांगने इ.स. सातवे शतकात लिहून ठेवले आहे. या भागात अनेक लेण्या, स्तूप, विहारे, शिल्पे, शिलालेख अशी अनेक वास्तू आहेत. यामुळे या नदीचे सुवास्तू हे नाव पडले आहे.

लौरिया तंगाई, तख्त-इ-बाही, जमालगढी, मर्दान, बुतकरा, सीकरी, शहबाढगढी, चकदर्रा इ. ठिकाणी या वास्तुंचे अवशेष सापडले आहेत. बुतकरा या गावाच्या नावाचा अर्थच बुत म्हणजे बुध्द मूर्ती करणारे असा होतो. तख्त-इ-बाही या ठिकाणी ७५ मीटर लांब आणि ७० मीटर रुंद अशा विहाराचे अवशेष सापडले आहेत. येथे शंभर पेक्षा आधिक भिक्खू रहाण्याची व्यवस्था अवावी. विहाराच्या बाहेरच्या बाजूस विविध आकाराच्या गौतम बुध्दाच्या मूर्त्या आहेत. येथे पंधरा मीटर उंचीचा स्तूप सापडला आहे. या स्तूपाच्या सर्व बाजूंनी बौध्द मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच गौतम बुध्दांच्या जीवनातील विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत.

जमालगढी या ठिकाणीही एक मोठा स्तूप आणि तीन मोठे विहार मिळाले आहेत. या ठिकाणी सुमारे ८० भिक्खूंची रहाण्याची सोय असावी. महाराष्ट्रातील कान्हेरी आणि नाशिक येथील कोरीव विहारांच्या रचनेशी या विहारांच्या अंतर्गत रचनेचे साम्य असल्याचे जेम्स फर्ग्यूसन या संशोधकाने म्हटले आहे. चकदर्रा गावाजवळ सुमारे १५ मीटर व्यासाचा मोठा स्तूप आढळून आला आहे. युवान श्‍वांगने सांगितलेला उत्तरसेन येथील स्तूप आणि विहार हाच असावा असे तज्ञांचे मत आहे. या स्तूप आणि विहाराजवळच्या लौरिया तंगाई, हैबतग्राम या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक गुहांमध्ये बौध्द भिक्खू राहत असावेत. त्याच बरोबर निरनिराळया राजांनी आणि व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानातून अनेक गुहा खोदल्या गेल्या आहेत असे दिसते.

स्वात खोऱ्याच्या आसपासच्या भागात अशा शेकडो स्तूपांचे आणि विहारांचे अवशेष पसरलेले आहेत. ग्रीक कलेच्या अनुकरणातून उत्पन्न झालेली गांधार शैलीची शिल्पकला या सर्व प्रदेशात विखुरलेली बौध्द शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. गौतम बुध्दांच्या अनेक आकारातील मुर्त्याबरोबरच ध्यानमुद्रा, अभयमुद्रा, प्रवचनमुद्रा, धम्मचक्र प्रवर्तनमुद्रा, सिध्दार्थ गौतमांचा जन्म, महानिष्क्रमण, मारविजय, महापरिनिर्वाण अशी गौतम बुध्द चरित्रावर आधारलेली शिल्पेही येथे आढळतात. मध्यममार्ग सापडण्यापूर्वी सततच्या उपोषणाने आणि तपश्चर्येर्ने खंगलेला गौतम बुध्द हे प्रसिध्द शिल्प स्वात खोऱ्यातील सीकरी येथील आहे. खोल गेलेले डोळे, वाढलेली दाढी, संपूर्ण शरिराची दिसणारी हाडे, छातीच्या फासळ्या व पाठीचे मणके, चेहऱ्यावरील तपश्चर्येमुळे दिसणारे तेज हे शिल्प कोरणाऱ्या अज्ञात कलाकाराचे शरीरशास्त्रचे ज्ञान आणि त्याची प्रतिभा अद्वितीय म्हणावी लागेल.

जागतिक कलेच्या इतिहासात या शिल्पाचे स्थान अनन्यसाधारण आहे. गोैतम बुध्दांच्या शिल्पाबरोबरच अवलोकितेश्वर, मैत्रेय या बोधिसत्वांची आणि पांचिक, हरिती इ. देवांची सुंदर शिल्पेही येथे आढळतात. हिंदूकुश पर्वतराजीचा भाग म्हणजे गांधार होय. शिल्पकलेत गांधार शैली प्रसिध्द आहे. गंाधार शैलीत ग्रीक आणि रोमन कलेचा सुंदर मिलाप झाला आहे. अनेक बौध्द मुर्त्या गांधार शिल्पामध्ये तयार केल्या गेल्या आहेत. असंग व वसुबंधू सारखे महान बौध्द भिक्खू गांधार प्रदेशाने दिले.

इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून गांधार प्रांत आत्ताचे अफगानिस्तान हे बुध्द धम्म, साहित्य, संस्कृतीचे महत्वाचे केंद्र होते. सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपांपैकी तक्षशिला येथील धम्मराजिक स्तूप अतिशय महत्वाचा आहे. हिंदूकुश पर्वतावर, बामियान येथील पर्वतराजीतील शेकडो बौध्द लेण्या आणि स्तुपांचे आवशेष आजही सापडतात. चंगीजखान पासून औरंगजेब पर्यत आक्रमणकारांनी बामियानमधील बौध्द मूर्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या भागास बुत-इ-बामियान असे ओळखले जाते. बुत म्हणजे बुध्द. बुध्दांचा बामियान असा याचा अर्थ होतो. मध्ययुगामध्ये हा प्रदेश मुसलमानी आक्रमकांच्या टाचांखाली भरडला गेला. अफगाणिस्तानातून भारतात प्रवेश करण्याचा खैबरखिंडीचा मार्ग या प्रदेशातून जात असल्याने अलेक्झांडरपासून मुघलांपर्यत सर्व आक्रमकांच्या आक्रमणाला येथील परिसर बळी पडला. तेथील पाषाणातील भव्य उभ्या दोन मूर्त्या तालिबान राजवटीने अलिकडे नष्ट केल्या. तसेच स्वात येथील पाषाणातील प्रचंड बुध्द मुर्त्या तालिबाणींकडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

अफगाणिस्तान मेस आयनक येथील परिसरामध्ये भव्य बौध्द विहार व तांब्याची खाण असलेला प्रदेश नुकताच उत्खनाणामध्ये सापडला आहे. प्राचिन काळी येथे उत्कृष्ट प्रकारच्या तांब्याच्या धातूची निर्मिती होत असे. अफगाणिस्तानातील बामियान येथील भव्य बुध्दमूर्तींचे निर्माण हे सम्राट कनिष्काच्या काळात झाले…. त्यावेळच्या गजबजलेल्या रेशीम मार्गावर ( Silk route ) वर हिंदूकुश पर्वत श्रेणीतील डोंगरावर त्या खोदल्या गेल्या…. जगातल्या अतिभव्य अशा मूर्तींमध्ये त्यांची गणना होत असे. त्यापैकी एक मूर्ती ही सुमारे १८० फूट उंचीची, तर दुसरी मूर्ती १४० फूटांची होती…..मूर्तींमधील बारकावे, शरीरसौष्ठव समजण्याकरीता संपूर्ण मूर्तींना विशिष्ट पध्दतीनेगिलावा ( Plaster ) केलेला होता, तर त्यांच्या अंगावरील वस्त्राच्या घड्या व चुण्या दाखविण्याकरीता भले मोठमोठे दोर त्या आकारात मूर्तींवर लावून, त्यावरदेखील अतिशय कौशल्याने तसाच गिलावा केलेला होता….

त्यामुळे त्या मूर्त्या अगदीच जिवंत भासत….एवढेच नव्हे, तर त्या मूर्त्यांचे रंगकाम करून, संपूर्ण पणे सोन्याच्या पत्र्याने मढवून, डोळ्यांमध्ये अतिशय तेजस्वी असे मोठ्या आकाराचे हिरेही बसविले होते, आणि २० मैल अंतरावरूनही ते चमकतांना दिसत असत, व रेशीम मार्गावरून प्रवास करणार्या प्रवासी, व व्यापार्यांना रस्ता समजून येण्यासाठी त्यांची मोठी मदत होई…..पण इ.स.च्या तिसर्या-चौथ्या शतकात उत्तरे कडून आलेल्या रानटी हूण व लुटारूंच्या टोळ्यांनी त्या मूर्त्यांवरील सोन्याचा पत्रा कापून ,उखडून काढून नेला….ही घटना, व त्या मूर्त्यांचे अद्वितीय सौंदर्य व रंगकामाचे अवशेष, इ.स.च्या ७ व्या शतकात भारतात आलेला सुप्रसिद्ध चिनी प्रवासी ” ह्यू- एन्- त्संग ” याने आपल्या ” तातांग -सि- यु -की ” ( पश्चिमेकडील देशाची कथा ) या प्रवास वर्णनपर आत्मचरित्रात अगदी सविस्तर पणे लिहिलेली आहे.

(बौद्ध इतिहास-बौद्ध संस्कृती)

– अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्मलिपी तथा बौद्ध लेणी, बौद्ध चित्र-शिल्प-कला-स्थापत्य-पुरातत्व अभ्यासक. पारनेर, जि.अहमदनगर.