इतिहास

गुजरात म्हणजे एकेकाळचे बुद्धराज; महाराष्ट्रापेक्षा जास्तच बुद्धिझम बहरला होता

अडीच हजार वर्षापूर्वी सार्वभौमिक राज्यपद्धती भारतात नव्हती. अनेक छोटी-मोठी राज्ये सर्व भारतात सुखाने राज्यकारभार करीत होती. गुजरात प्रदेश देखील त्याला अपवाद नव्हता. गुजरातमध्ये बौद्धधम्माचा इतिहास दीड हजार वर्षांचा आहे. क्षत्रप-क्षहरत काळापासून मैत्रक काळापर्यंत बुद्धधर्म एक प्रमुख धर्म होता. गुजरातला पूर्वी गुर्जरदेश, सौराष्ट्र, काठियावाड, आनर्त( वडनगर प्रदेश) या नावाने देखील ओळखले जात होते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नागांच्या वसाहती होत्या. व ते बुद्धांचे अनुयायी होते.

इ.स. पुर्व १८५ मध्ये सियालकोट, मथुरा, राजस्थान, सिंध, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये बौद्ध राजा मिलिंद याचे राज्य होते. नहपान, रुद्रदमन, क्षत्रप यांच्या राजवटीत बोरिया स्तूप, इंटवा स्तूप,आणि तलाजा, साना, रणपूर, खम्बालिदा, बावाप्यारा लेण्या, खेंगार लेण्या, कडेश्वरी, बोरिया, केडिया डुंगर बुद्धलेण्या आकारास आल्या होत्या. यावरून धम्म सर्वत्र पसरला होता याची माहिती मिळते.

त्याकाळी भडूच बंदरावरून रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. पोरबंदर (बोर्ड एक्सिमा), मंगलोर (मंगलोसन), हाथब( अष्टकप्रा), भडूच ( बॅरिगझा), बरिके(द्वारका), नवसारी( नवसारिप) अशी अनेक बंदरे त्याकाळी नावारूपास आली होती. त्यामुळे व्यापार-उद्योगधंदे यामुळे तेथील लोक सधन झाले होते. येथील अनेक राज्यांच्या राजवटीत बौद्धधम्मास सढळ हस्ते दान मिळत होते. वाकाटक, कलचुरी, चाहमान, चालुक्य आणि राष्ट्रकूट अशा अनेकांनी दक्षिण गुजरातवर राज्य केले. अनेकांनी बौद्ध विहारांना दानपत्रे दिली होती. सैंधन, जेठवा, चावडा, चपोटकट, सोळंखी, परमार, वाघेला अशी लहानलहान बौद्ध राज्ये देखील सौराष्ट्रात विकसित झाली होती. मात्र आता तीच नावे तेथील मागासवर्गीयांची झाली आहेत. त्यामुळे एकेकाळी राज्य करणाऱ्या या जमाती खालच्या थराला ढकलल्या कशा गेल्या, हे एक कोडेच आहे.

या स्थळां व्यतिरिक्त अनेक बौद्ध स्थळे आहेत. मा.श.मोरे यांचे पुस्तक घेऊन सरळ भटकंती करावी.

थेरीगाथेत भरुकच्छच्या वृद्धमाता थेरी बद्दल माहिती मिळते. पालि भाषेतील अनेक जातक कथा गुजरातच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेल्या आहेत. अपदान, महानिद्देस, मनोरथपुरणी अशा प्राचीन बौद्ध साहित्यात समुद्रमार्गाने सोपारा, भरूकच्छ बंदरातून होत असलेल्या भारताच्या व्यापाराविषयी अनेक संदर्भ मिळतात. दीपवंश, महावंस या सिरिलंकेच्या ग्रंथात सुद्धा गुजरातच्या प्राचीन बंदरांचा उल्लेख आढळतो. सम्राट अशोकाचे १४ शिलालेख जुनागढ येथील सुदर्शन तलावाजवळ खडकावर कोरले आहेत. साबरकंठा जिल्ह्यात देवनीमोरी येथे बुद्धधातू प्राप्त झाले आहेत. सम्राट अशोक यांच्या काळातच बौद्ध धर्म गुजरात-सौराष्ट्र मध्ये बहरला होता.

बोधी नावाचे घराणे सुद्धा गुजरातच्या काही भागावर राज्य करीत होते कारण त्यांची नाणी सापडली त्या नाण्यांवर विरबोधी, बोधिदत्त, शिवबोधी, चंद्रबोधी अशी नावे आढळून आली आहेत. नहापनाच्या मुलीने आणि जावयाने महाराष्ट्रातील अनेक बौद्ध विहारांना सढळ हस्ते दान दिले आहे. सौराष्ट्रातील गिरनार पर्वतरांगा सोडल्यास गुजरात भौगोलिकदृष्ट्या सपाट प्रदेश आहे. त्यामुळे उभारलेल्या अनेक विहारांकडे दुर्लक्ष होऊन त्यांची पडझड झाली. येथील वलभीच्या विश्वविद्यालयाचा मोठा दबदबा होता. त्याची ख्याती भारताबाहेर सुद्धा पसरली होती. मैत्रकांच्या ताम्रपटावरून वलभीच्या आजूबाजूस १४ विहार असल्याचे दिसून येते. मेहसाणा जिल्ह्यात ५ बुद्धांच्या मूर्ती मिळाल्या होत्या. बुद्धधम्माच्या अस्तित्वाची शेवटची नोंद १३ व्या शतकातील सोळंकी राजा वीरधवल याच्याकडे ‘असराज’ नावाचा बौद्ध भिक्खू होता अशी आढळते.

बावा प्यारा लेणी.

हुएन त्संगच्या प्रवास वर्णनावरून गुजरातमध्ये इ.स. ६४१ साली १३,३०० बौद्ध भिक्खू होते अशी नोंद सापडते. गुजरातमध्ये मौर्य, ग्रीक, शक, क्षत्रप, क्षहरत, मैत्रक, गारुळक, सैंधव आणि राष्ट्रकुटाकडून धम्मास सढळ हस्ते दान मिळत होते. अशा या गुजरातमध्ये एकेकाळी महाराष्ट्रापेक्षा जास्तच बुद्धिझम बहरला होता. पण आजची परिस्थिती पाहता तेथे धम्म लयास कसा गेला याचे आश्चर्य वाटते. बौद्ध संस्कृतीच्या अनेक स्थळांचे रूपांतर पुढेपुढे हिंदू आणि जैन मंदिरात झाल्याचे दिसून येते. सोमनाथ मंदिराच्या पायामध्ये देखील बौद्ध विहाराचे अवशेष आढळलेत हे पुरातत्व खात्याने मान्य केले आहे. प्रसिद्ध दिवंगत लेखक मा. श. मोरे यांनी गुजरातमध्ये राहून जो तेथील बौद्ध धम्माचा अभ्यास केला त्याची सर कुणालाच येणार नाही. आज त्यांचे ‘गुजरातमधील बौद्धधम्म’ हे पुस्तक बौद्ध साहित्यात मैलाचा दगड ठरले आहे. थोडक्यात “गुजरात” राज्यास “बुद्धराज” म्हणणे जास्त सयुक्तिक राहील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)