जगभरातील बुद्ध धम्म

हंगेरीयाची राजधानी ‘बुद्धापेस्ट’ म्हणजेच आताची ‘बुडापेस्ट’

हा मथळा वाचून चकित झालात ना ? पण काय करणार. सत्य हे कधी ना कधी उघडकीस येतेच.या जगात जो जो इतिहास दडला गेला आहे तो तो हळूहळू उघडकीस येत आहे. अयोध्या इथे नुकतेच सापडलेले पुरावे हे जसे बौद्ध संस्कृतीचे दिसत आहेत तसेच हंगेरीया आणि बुद्धीझमचा गेल्या दोन हजार वर्षापासून संबंध असल्याचे तिथल्या आशियाई संस्कृतीवरून आणि ग्रंथावरून दिसून येत आहे. हंगेरियन भाषा ही वेगळी भाषा असून आजूबाजूच्या देशांसारखी नाही. हंगेरियन भाषा ही मूळ मग्यार लोकसंस्कृतीची भाषा आहे आणि ती आशिया खंडातून आली आहे. बौद्ध भिक्खू जसे रोम पर्यंत गेले तसेच इतर काही भिक्खू सुद्धा तुर्क वरून युरोप खंडात गेले असावेत. फक्त आज त्यांची माहिती आपल्याला ज्ञात नाही.

हंगेरियन लोक हे मूळचे प्राच्य म्हणजे पूर्वेकडील देशांचे आहेत. हे आता सर्वांनी मान्य केले आहे. इथे प्रचलित असलेल्या चालीरीती, परंपरा, लोककथा आणि अध्यात्मिक गोष्टी या आजही पूर्वेकडील देशांसारख्या आहेत. आजही इथल्या लोकजीवनातून दिसत असलेली बुद्धसदृश तत्वप्रणाली ही हंगेरियन लोकांना अनोळखी नाही. हा भूभाग अठराशे वर्षापूर्वी पूर्वेकडच्या भटक्या जमातींच्या (मग्यार) ताब्यात होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथला जिप्सी समाज. मुख्य म्हणजे आशिया खंडातील बौद्ध संस्कृतीचे स्वास्तिक चिन्ह (चार अरिय सत्ये) येथे पुरातत्त्वीय उत्खननात आढळून आले आहे.

जय भीम नेटवर्क ही तेथील संस्था डॉ.आंबेडकर स्कुल चालवीत आहे.

इथले काही हंगेरीयन लोक शामनिझम पाळीत होते. त्यामुळे बहुतेकांना बौद्ध तत्वे माहीत होती. त्यामूळे अनेकजणांनी बुद्धिझम अंगीकारला होता. व हे सगळे तिबेटियन व मंगोल वंशीय होते. त्यामुळे बुद्धिझमला इथे पोषक वातावरण तयार झाले. व हळूहळू त्याची भरभराट होत गेली. मात्र दुर्दैवाने या संदर्भातील असलेले सर्व पुरावे (डोंगरावरील स्तूप आणि विहार ) ख्रिस्ती धर्ममार्तंडांनी १० व्या शतकात नष्ट करून टाकले. ८-९ व्या शतकानंतर भारतातही तीच परिस्थिती होती व आताही तीच आहे. परंतू इथले धर्ममार्तंड वेगळे होते व आहेत. इ.स. १२६५ मध्ये हंगेरीच्या राजाने मोठा किल्ला बांधला. पण ख्रिस्ती परंपरेची राजवट असून सुद्धा लोक बुद्धा (बुडा) किल्ला म्हणत असत.

त्यानंतर जवळजवळ १५व्या शतकात बुद्धिझमचा पुन्हा उदय होऊ लागला. प्रा. झोल्टन फेलव्हीनझ यांनी डॉ. टी कार्डोस यांचे पुस्तक The Age of the Humanism in Hangary या पुस्तकाकडे लक्ष वेधले. त्यामध्ये लिहिले होते की गेलोत्ती हा एक तत्ववेत्ता, मानवतावादी कवि आणि भविष्यवेत्ता होता. इटालियन धर्मवेड्या पिसाटांपासून तो पळून आला आणि हंगेरीचा राजा मत्तीहास याकडे आसरा घेतला. तिथे तो राजाबरोबर पूर्वेच्या देशातील बुद्ध आणि त्यांचे तत्वज्ञान यावर चर्चा करीत असे. राजा देखील त्यावेळच्या विद्वानांबरोबर बुद्धांच्या तत्वज्ञानाबाबत चर्चा, वाद-विवाद करीत असे. आणि हे सर्व हंगेरी मधील बुडा किल्ल्यात होत असे.

डॉ. ड्युक ( कोरस यांचे ग्रंथकार)

त्यानंतर जवळजवळ तीन शतकानंतर अलेक्झांडर सोमा डी कोरस (इ.स. १७८४-१८४२) यांनी भुतकाळातील विस्मरणात गेलेला बुद्धिझम परत जीवित केला. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तिबेटमधील अनेक पर्वतातील बौद्ध मठांना भेटी देऊन ज्ञान प्राप्त केले. कलकत्ता येथे पाली, संस्कृत, मराठी आणि बंगाली भाषा शिकून त्यातील अनेक शब्दांचे भांडार हंगेरीयन भाषेत आणून रुजविले. त्यामुळे हंगेरीतील काही नावांना भारतीय साज चढविल्या सारखा वाटतो. त्यांचे हे अवाढव्य धम्मकार्य पाहून जपानमधील टोकियो बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीने त्यांना १९३३ साली ‘बोधिसत्व’ घोषित केले.

रोमानी (जिप्सी) महिला

डॉ. ड्युक हे सोमा डी कोरस यांचे नावाजलेले ग्रंथकार होते. त्यांनी सुद्धा बुडापेस्ट नावाबद्दलची माहिती दिली आहे. डन्यूब नदीच्या पश्चिमेकडील डोंगरावर एकेकाळी स्तूप होते. त्यांना बुडा म्हणत. व नदीच्या पूर्वेकडील खालील भागात लामांची सपाट भागावर घरे असत. त्यांना पेस्ट म्हणत. त्यांचा परिसर हा बौद्ध संस्कृतीने उजळून जात असते. यामुळे बुडापेस्ट नाव हळूहळू रुजले गेले. बुडापेस्ट म्हणजेच Lower of Buddha/ Lower of Gompa यावरूनच तिथल्या भागाचे Buda – Pest नाव अधोरेखित झाले.

बुडा राजवाडा

Alexander Csoma de Koros यांनी केलेल्या कार्यामुळे बुद्धिझम बाबत लोकांमध्ये आवड निर्माण झाली. तेथील प्राचीन ग्रंथांमधून हे सर्व पुरावे पुढे आले आहेत. सन १९०० ते १९३५ या कालावधीत ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, इटली, डेन्मार्क, पोलंड, अमेरिका आणि रशियामध्ये धम्माचा अभ्यास करणारे अनेक विद्वान तयार झाले. यामुळे बुद्ध तत्वज्ञानावरील विश्वास वाढून बौद्ध कम्युनिटी तयार होऊ लागल्या. पुढे १९३२ नंतर हंगेरीयात बौद्ध संघ स्थापन करण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या छाया गडद होऊ लागल्यावर तो प्रयत्न अयशस्वी झाला. परंतु त्यानंतर जर्मन मातृभूमी असलेल्या पद्मा लामांनी बौद्धसंघ येथे रुजविला व हंगेरीयात बोधिसत्व अलेक्झांडर सोमा डी कोरस यांचे स्वप्न साकार केले.

सोमा डी कोरस यांचे दार्जिलिंग येथील समाधीस्थळ

तिबेटियन वज्रयान पंथांची शाखा आर्य मैत्रीय मंडळ इथे २ नोव्हेंबर १९५२ रोजी लामा अनागरिका गोविंदा यांनी स्थापन केली. हंगेरियन बुद्धीष्ट मिशन त्यांच्याबरोबरीने कार्य करीत आहे. आजूबाजूच्या देशात सुद्धा धम्माचे कार्य त्यांच्या शाखा करीत आहेत. १९५६ साली २५०० वी बुद्धजयंती जर्मनी आणि फ्रान्स बरोबरीने हंगेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली. आज हंगेरीमध्ये बौद्ध पंथांच्या अनेक संस्था कार्यरत आहेत. जय भीम नेटवर्क ही तेथील संस्था डॉ.आंबेडकर स्कुल चालवीत आहे. जिप्सी आणि नॉनजिप्सी समुदायात तिचा संपर्क वाढत चालला आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)