इतिहास

ओरिसा – बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा

भारतामधील ओरिसा राज्याचे मूळ नाव ओद्र-देसा असून ते बौद्ध संस्कृतीतून उदयास आले आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यात डोकावून बघितल्यास अक्षरशः हजारो पुरातन बौद्ध स्थळे दिसून येतील. यांची नावे आज जरी बदलली असली तरी मूळ संस्कृती अवशेष काही नष्ट झाले नाहीत.

लिंगुड टेकडी – पाषाणातील अशोकस्तुप इथे असून संपूर्ण टेकडी पुरातन अवशेषांनी भरलेली आहे.

आंध्रप्रदेशाची किनारपट्टी ते पश्चिम बंगाल किनारपट्टी पर्यंतचा भाग पुरातन बौद्ध स्थळांनी भरलेला आहे. बंगालच्या उपसागराला लागून असलेले ओरिसा राज्य हे आंध्रप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमांनी पूर्ण वेढले आहे. एकेकाळच्या या उत्कल प्रांतात सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर सर्व कायापालट केला. धम्मप्रसारासाठी १९ तुकड्या स्थापित केल्या. त्यामुळे त्यांच्या काळातच बौद्ध संस्कृतीची भरभराट येथे झाली.

एकेकाळच्या समृद्ध संस्कृतीचे अवशेष

थेरवाद, महासंघीका आणि सर्वस्तीवाद या शाखा तेथे लोकप्रिय झाल्या. म्हणूनच या राज्याच्या केंद्रभागी ‘बौद्ध’ नावाचा जिल्हा असून इतरही नावे बघितल्यास बौद्ध संस्कृतीची खाणच इथे असल्याचे दिसते. गजापती, गंजम, पुरी, भद्रक, देवगढ, बारगढ, अंगुल, जाजपुर, बालनगीर, बालेश्वर अशा अनेक जिल्ह्यात बुद्धिझम बहरला होता. पुढेपुढे अनेक बौद्ध आचार्य, भिक्खू यांनी उत्कल प्रांतात येऊन महायान पंथास लोकप्रिय केले.

महायान पंथातील बोधिसत्व, देवता यांची असंख्य शिल्पे आढळतात.

या राज्यातील ‘बौद्ध’ जिल्ह्यासंबधी शोध निबंध नुकताच वाचनात आला, तेंव्हा या भारतभूमीत बुद्ध किती खोलवर रुजला आहे याची जाणीव झाली. जाजपुर जिल्ह्यातील पुष्पगिरी महाविहार, सम्राट अशोक स्तूप, भुवनेश्वर पासून ९० कि.मी. अंतरावर असलेली सम्राट अशोक स्तुपांची लांगुडी टेकडी, गजपती जिल्ह्यातील पद्मसंभव मॉनेस्ट्री, जौगाडा व धौली येथील सम्राट अशोक शिलालेख, कोणार्क जवळील कुरुमा बौद्ध विहार अवशेष, धौलीचा शांतिस्तुप, ललितगिरी- उदयगिरी- रत्नागिरी येथील स्तूप आणि विहारे, कोणार्क विहार, बुद्धनाथ विहार, दंबारुगडा अशी बौद्ध संस्कृतीची असंख्य स्थळे असून त्या सर्वांची नावे इथे नमूद करणे शक्य नाही.

मानियाबंध गावातील बुद्ध विहार.

अभ्यासकांनी तेथील देवळांचा अभ्यास केल्यास खरी संस्कृती कोणती ते माहीत होईल. इथेच बुद्धांच्या दंत अस्थी होत्या, ज्या आता सिरिलंकेत कँडी येथे आहेत. जगन्नाथ मंदिर हे मूळचे दंत अस्थींचे विहार होते. आचार्य दिघनागा भिक्खू हे चौथ्या शतकात पुरीच्या विहाराचे प्रमुख होते. बुद्धांचे दुसरे नाव भुवनेश्वर होते,असे देखील आता उघडकीस आले आहे. हुएंनत्संग या चिनी भिक्खुंनी ओद्र-देशाबद्दल लिहिले आहे की येथे शेकडो संघाराम (मॉनेस्ट्री) असून दहा हजार भिक्खुंचे वास्तव्य तेथे आहे. बंगाल उपसागराचा मोठा किनारा ओरिसास लाभला असल्यामुळे येथूनच एकेकाळी जावा, सुमात्रा, सिलोन, म्यानमार, थायी देशात व्यापाराबरोबर धम्म प्रसार झाला.

भुवनेश्वर पासून ९० कि. मी. अंतरावरील अशोक स्तुपांची लांगुडी टेकडी.

असा हा ओरिसा प्रांत तेराव्या शतकापर्यंत बौद्ध संस्कृतीने दुमदुमला होता. नंतर सत्यधर्म लयास गेल्यावर अनेक संघाराम यांचे देवळात रूपांतर होत गेले. तरीही ओरिसाच्या काही पॉकेट्समध्ये मूळ बौद्ध अजूनही तग धरून आहेत. कटक जिल्ह्यातील मानियाबंध येथे सुद्धा मूळ बौद्ध जमात असून ते विणकराचा व्यवसाय करतात. त्यांची रेशमी वस्त्रांची ‘इकत’ प्रावरणें ही जगप्रसिद्ध आहेत.

असंख्य स्तूप अवशेष, शिल्प, व्होटीव स्तूप नजरेस पडतात.

मराठेशाही सुद्धा इ.स. १७५१ ते १८०३ पर्यंत इथे राज्य करीत होती. त्यामुळे येथील बोली भाषेत मराठी शब्द आढळतात हे ऐकून आश्चर्य वाटते. तरी पुरातन बौद्ध संस्कृतीचा उत्कल प्रांताचा हा वारसा म्हणजेच आताचे राज्य ओरिसा, हे जरूर ध्यानात ठेवावे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *