सन १८५२ मध्ये युरोपियन लेफ्टनंट लुम्सडेन आणि स्टोक्स यांनी हे मोठे संघाराम ( विहार ) शोधून काढले. हे ठिकाण पाकिस्तानातील मर्दन शहरापासून ईशान्य दिशेला १५ कि. मी. अंतरावर आहे. १ ल्या शतकात बांधलेला हा गंधार शैलीतील संघाराम जवळजवळ सहाशे वर्षे गजबजलेला होता. जागतिक वारसा यादीत नाव असलेल्या या संघारामामध्ये खालील मुख्य गोष्टी आढळल्या.
१) मुख्य स्तूप, २) विहार, ३) स्तुपाचे मोठे आवार, ४) बैठक आवार, ५) पाणी मार्गिका, ६) सीमांकन, ७) तीन छोटे स्तूप, ८) स्वतंत्र छोटे विहार
हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०१ मनकायला स्तूप
वरील सर्व बांधकामे ही राखाडी रंगांच्या लाईम स्टोन दगडा मधील आहेत. ‘तख्त इ बाही’ म्हणजे झरा असलेला पर्वत माथा. पाचव्या शतकातील कुशाण राजवटीनंतर हुणांच्या आक्रमणाने येथील वैभव लयास गेले. गंधार शैलीतील सापडलेली येथील काही शिल्पे ब्रिटिश म्युझिअममध्ये आहेत.
सहर इ बेहलोल
हे ठिकाण ‘तक्त इ बाही’ या संघारामापासून ७० कि. मी. अंतरावर वायव्य दिशेला आहे.
हे जवळजवळ छोटे गावच आहे. येथे केलेल्या उत्खननात अनेक छोट्या मोठ्या दगडाच्या बुद्ध मूर्ती आढळल्या. नाणी, भांडी, दागिने अशा अनेक मौल्यवान वस्तू इथे मिळाल्या. त्यामुळे अनधिकृत असंख्य खोदकामे इथे झाली आणि सापडलेला पुरातन ठेवा पळविण्यात आला. जागतिक वारसायादीत या गावाचे नाव आले असल्याने बुद्धमूर्तींची तस्करी कमी झाली आहे. नंद याची उपसंपदाबाबतचे शिल्प येथे मिळाले आहे. ते सध्या कलकत्ता म्युझिअममध्ये आहे.
-संजय सावंत. नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)