इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०३ – कनिष्क स्तूप

कुशाण राजवटीत इ.स.२ऱ्या शतकात राजा कनिष्क याच्या कारकिर्दीत बौद्ध धम्माचा मोठा विकास झाला. त्याच्या राजवटीत विकसित झालेल्या सिल्क रोडमूळे महायान पंथ पार चीनमध्ये गेला. त्याच्याच काळात कनिष्कपुर हे मोठे नगर उदयास आले होते.

त्या नगरात त्यावेळच्या काळातील जगातील सर्वात अवाढव्य आकाराचा उंच स्तूप सध्याच्या पेशावर येथे बांधला गेला होता. स्तुपाचा पाया हा चारी बाजुंना ८३ मी. रुंद होता. त्यास चारही बाजूने वर चढण्यास पायऱ्या होत्या. स्तुपाची उंची १०० मी.च्या वर होती. यावरून स्तुप बांधकाम केवढे भव्य होते हे लक्षात येते. स्तूपाच्या शिखरावर तांब्याची १३ स्तर असलेली छत्री होती. पावसाळ्यात विजा कडाडून त्यावर पडत असल्याने राजा कनिष्क नंतर अनेक राजवटीत तिची दुरुस्ती करण्यात येत असे. चिनी भिक्खू प्रवासी फियान यांनी सुद्धा जगातील सर्वात उंच स्तूप अशी आपल्या प्रवास वर्णनात नोंद केली आहे.

असा हा प्रचंड स्तूप कुशाण राजवटी नंतर हळूहळू विस्मरणात गेला. इ.स. ५५० शतकानंतर हुणाणीं केलेल्या आक्रमणा नंतर धम्माचा प्रभाव अजून कमी झाला आणि चोर, दरोडेखोर, लुटारू यांनी स्तुपावरील मौल्यवान, नक्षीकाम केलेल्या वस्तू पळवील्या. इ.स.८ व्या शतकानंतर तेथील बौद्ध संस्कृती लयास गेली.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०२ – तख्त इ बाही आणि सहर इ बेहलोल

आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनीं अनेक शिल्पे, विटा, कोरीवकाम केलेले दगड, कमानीचे स्तंभ पळविले. एकेकाळी पूजनीय, पवित्र असलेल्या स्तूपाच्या जागी गवत, झाडीझुडपे असलेला मातीचा ढिगारा राहिला. हजारो वर्षे लोटल्यावर सन १९०८ मध्ये ब्रिटिश पुरातत्व अधिकारी डेव्हिड स्पूनर यांचे लक्ष या मातीच्या गोल टेकडीकडे गेले. स्थानिक लोक त्याला ‘शाजी की ढेरी’ म्हणायचे. डेव्हिड यांनी हा स्तूप आहे हे ओळखले आणि तो खणून पाहण्याचे ठरविले. त्याप्रमाणे खोदकाम सुरू करून माती आणि विटा बाजूला काढण्यात येवू लागल्या. आणि काय आश्चर्य ..!

उत्तम नक्षीकाम केलेला ब्रॉन्झ धातूचा करंडक त्यांना स्तुपातील विटांच्या चौकटीत मिळाला. करंडक बाहेर काढून उघडला तेव्हा त्यात काही अस्थी असल्याचे निदर्शनास आले. करंडकाच्या झाकणावर कमळावरील बुद्धांना ब्रम्ह व इंद्र पूजित आहेत अशी प्रतिमा होती. व करंडकावर खरोष्टी भाषेत लिहिले होते की “हा पवित्र करंडक महाराज कनिष्क यांनी कनिष्कपुर नगराच्या कल्याणासाठी अर्पण केला”

सम्राट कनिष्काच्या स्तुपात खोदकाम करताना अस्थींचा करंडक सापडला, ही बातमी वाऱ्यासारखी पूर्वेकडील बौद्ध देशांना कळली. म्यानमार ( ब्रम्हदेश ) देशाला हे कळताच त्यांना या स्तुपाचे महत्व कळले. त्यांनी तात्काळ त्या बुद्ध अस्थींची ब्रिटिशांकडे मागणी केली. ब्रिटिशांनी त्या म्यानमार देशाला दिल्या आणि रिकामा करंडक पेशावर म्युझियममध्ये ठेवला. सद्यस्थितीत या अस्थी म्यानमार मधील मंडाले शहरात उ. खांती हॉल येथे सुरक्षित आहेत.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०१ – मनकायला स्तूप

तर अशी ही कनिष्क स्तुपाची गोष्ट. आज तेथे काहीच राहिलेले नाही. आजूबाजूला वसाहती झाल्या आहेत. पाकिस्तानी पुरातत्त्व खात्याला त्याचे काही ममत्व नाही. ना इथे आता बुद्धमूर्ती आहे, ना माहिती फलक आहे. सम्राट कनिष्काचा हा स्तूप माझ्या मायदेशी असता तर……!

या पवित्र स्तुपास माझे त्रिवार वंदन.

-संजय सावंत. नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *