इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०४ – शिंगारदार स्तूप आणि पिपलान बौद्ध मॉनेस्ट्री

पाकिस्तानात बरिकोट हे ठिकाण स्वात खोऱ्याचे प्रवेशद्वार आहे. कारण इथून पुढे अनेक स्तुपांचे अवशेष आढळतात. त्या खोऱ्यातील सर्वात मोठा स्तूप शिंगारदर गावात आहे. ब्रिटिश अधिकारी डीन आणि स्टेन यांनी हा स्तूप शोधला. तेथील राजा उत्तरसेन याने तिसऱ्या शतकात हा स्तुप बांधल्याचे कळते. याचा पाया चौकोनी होता. याची उंची २७ मी. असून असंख्य मोठे घडीव दगड, पातळ फरशी दगड आणि विटांचा वापर बांधकामात केलेला आढळतो.

चिनी प्रवासी हुएन त्संग यांनी सुद्धा हा स्तूप पाहिल्याचे लिहून ठेवले आहे. पुढे हुणांच्या आक्रमणाने धम्म कमकुवत होऊन पार नष्ट झाला. चोरांनी छोटे भुयार करून आतले मौल्यवान रक्षापात्र पळविले. तसेच गेल्या अनेक वर्षात अज्ञानी स्थानिकांनी या स्तूपाचे कोरीव काम केलेले दगड, माती, विटा घरांच्या बांधकामासाठी वापरल्या.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०५ – शाहबाझ गढी येथील अशोक शिलालेख आणि जोलियां मॉनेस्ट्री

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०३ – कनिष्क स्तूप

पिपलान बौद्ध मॉनेस्ट्री

‘पिपलान बौद्ध विहार’ एक मोठे बौद्ध स्थळ असून तेथे अनेक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष) या भागात होते व आहेत. शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हे स्थळ पर्यटक आणि अभ्यासक यांचे पासून अद्याप दूर राहिलेले आहे. मोहरा मरदू आणि जुलियन टेकड्यांच्या मध्ये असलेले हे बौद्ध स्थळ १९२३-२४ मध्ये हे उघडकीस आले. सर जॉन मार्शल, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांनी तेथे उत्खनन केले. पर्शियन आणि कुशाण काळात विकसित झालेल्या या स्थळावर अनेक वोटीव स्तूप आणि विहार आहेत. विविध राजवटीतील २६ नाणी येथे सापडली आहेत.

-संजय सावंत. नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)