इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०५ – शाहबाझ गढी येथील अशोक शिलालेख आणि जोलियां मॉनेस्ट्री

शाहबाझ गढी हे निसर्गरम्य गाव पाकिस्तान मधील मर्दन शहरापासून १२ कि. मी. अंतरावर आहे. आजूबाजूला हिरवीगार कुरणे, उशाला टेकडी, गावातून वहात असलेली नदी यामुळे प्राचीन काळापासून येथे प्रवासी थांबत असत. याच गावात दोन मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत लिहिलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत.

इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी या गावचे नाव पोलौशाह असे असल्याचे नमूद केले आहे. तसेच या शिलालेखास UNESCO World Heritage यादीमध्ये स्थान मिळाले आहे. हे शिलालेख इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकात अशोक राजाच्या कारकिर्दीत खोदलेले आहेत. सम्राट अशोक हा जगातील पहिला असा सम्राट होता की ज्याने बुद्धांचा उपदेश स्वतः अंगिकारून आशिया खंडातील जनतेस सदाचाराचे धडे शिलालेखाद्वारे दिले.

शाहबाझ गढी येथील शिलालेखात सुद्धा माणसाचे आचरण कसे असावे याचा सदुपदेश दिला आहे. जन्म, लग्न, आजारपण यावेळी करण्यात येणारे अंधश्रद्धेचे विधी बंद करावेत याबद्दलही शिलालेखात उल्लेख आहे. हे पाहून सम्राट अशोक हे जगातील पाहिले असे राजे आहेत ज्यांनी समाजातील निरर्थक विधींना विरोध केल्याचे दिसते. तसेच त्या शिलालेखामध्ये आईवडील, गुरू, वयस्कर यांचे प्रती आदर बाळगावा, सेवकांशी सहानुभूतीने वागून सर्वांप्रती मैत्री भावना विकसित करावी असेही पुढे म्हटले आहे. थोडक्यात बुध्दांच्या उपदेशाचे सार सम्राट अशोकाच्या शिलालेखातुन प्रतिबिंबित होते.

जोलियां मॉनेस्ट्री

दुसऱ्या शतकातील जोलियां बुद्ध विहार हे पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूर जिल्ह्यात आहे. १९८० मध्ये या स्थळाचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश झाला. जोलियां गावाजवळील १०० मीटर उंच असलेल्या डोंगरावर हे विहार आहे. हे स्थान मोहरा मरदू या बौद्ध स्थळापासून जवळ आहे.

हे पण वाचा : पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०४ – शिंगारदार स्तूप आणि पिपलान मॉनेस्ट्री

कुशाण राजवटीतील हे स्थळ इ.स. ४५० नंतर हूण राजा मिहीरकुल याच्या आक्रमणाने उध्वस्त झाले. तिथे मुख्य स्तूपाच्या भोवती २७ मध्यम आकाराचे स्तूप आणि ५९ लहान आकाराचे वोटीव स्तुप आहेत. व यांवर बुद्धांचा जीवनपट चित्रीत करण्यात आलेला आहे. बरेच कोरियन आणि पाकिस्तानी पर्यटक हे स्थान बघण्यासाठी येतात.

-संजय सावंत. नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)