छत्तीसगढ राज्यातील सिरपूर या महासमुंद जिल्ह्यातील गावाजवळ महानदीच्या तिरावर प्राचिन सिरपूर हे बौद्धसंस्कृती स्थळ वसले होते. महानदीच्या पुरात ते नष्ट होऊन मातीखाली गाडले होते. १८७२ मध्ये डॉ.बेगलर आणि सर जॉन मार्शल यांनी केलेल्या उत्खननात लक्ष्मण मंदिर आणि प्राचिन सिरपूरचा शोध लागला. येथील सिरपूर येथील महाशिव गुप्त बालार्जुनाच्या काळातील लेखात आनंदप्रभू या भिक्खूने सिरपूर येथे विहार आणि भिक्खू निवास बांधला असल्याची नोंद आहे.
पुराणवस्तू संशोधन खात्याने सिरपूर येथे उत्खनन करून तेथे अनेक बुद्ध विहारांचा एक संघाराम शोधून काढला आहे. तेथील एका विहारात साडेसहा फूट उंचीची भूमीस्पर्श मुद्रेतील एक बुद्धाची मूर्ती आणि त्या मूर्तीच्या शेजारी पद्मपाणी बोधिसत्त्वाची मूर्ती सापडली आहे. तो विहार अकराव्या शतकाच्या शेवटपर्यंत वापरात होता, असा पुराणवस्तू संशोधन खात्याने अंदाज केला आहे.

इसवीसन ६ व्या शतकात स्थापन झालेल्या या विहार समुहामध्ये १०० बौद्धविहारांसोबतच, नजिकच्या परिसरात जैन आणि शैव पंथियांच्या मठांचेही अवशेष सापडले आहेत. या ठिकाणी भिक्खूणी हारीतिकेची सुद्धा एक मूर्ती आहे. या परिसरास चिनी भिक्खू यात्रेकरू ह्युएन त्संग याने सुद्धा इसवीसन ६४३ साली भेट दिली होती. त्याने लिहिले आहे की, हे मध्य भारतातील बुद्धधम्माचे आधार स्तंभ असलेले विहार आहे आणि तेथे १०,००० श्रामणेर व भिक्खू बुद्धधम्माचे प्रशिक्षण घेत आहेत. मध्ययुगीन काळात भरभराटीस आलेले हे नगर मध्यभारताच्या वनांचलातील बौद्धधम्माच्या उर्जीतावस्थेची साक्ष देते