तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानासाठी शोध घेणे होय. विशेषत: प्रकृतीविषयक ज्ञान आणि अस्तित्वाचा अर्थ जाणण्यासाठी शोध घेणे होय. तत्त्वज्ञान ज्ञानाविषयीचे प्रेम असून त्यामध्ये असा उल्लेख आढळत नाही की, तत्त्वज्ञान एखाद्या माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनात व्यवहार्य वर्तणुकीस मदत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी वापरता येईल. भगवान बुद्धाची शिकवण अतिशय श्रेष्ठ आणि गहन – गंभीर असून फारच आदरास पात्र असलेल्या तत्त्वज्ञांच्या विचारांना सुद्धा मागे टाकणारी आहे. परंतु धम्म म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नव्हे कारण तत्त्वज्ञान प्राकृतिक नियमाने सिद्ध करता येईल अशा प्रायोगिक तत्त्वांवर आधारलेले आहे. धम्म एक व्यवहार्य पद्धती आहे जी भगवान बुद्धांनी तीक्ष्ण आणि चिकित्सक मनाद्वारे जाणलेली असून मनुष्याच्या दैनंदिन वापरासाठी (आचरणासाठी) धम्माची देसना दिलेली आहे.
भगवान बुद्धाच्या तत्त्वांचा सूक्ष्म अभ्यास, बोध आणि त्यांच्या स्वत:च्या अनुभवांवर आधारीत आहे. भगवंताचा मानवी दु:खविषयक समस्येचा दृष्टिकोन मूलत: प्रायोगिक तत्त्वांवर आधारीत आणि प्रयोगाद्वारे सिद्ध करता येईल असाच आहे. वैचारिक आणि पराप्राकृतिक स्वरूपाचा नाही. धम्म केवळ दष्टिकोन ( मान्यता ) आणि सिद्धांतावर अवलंबून राहून शोधलेला नाही. जसे – निरनिराळ्या तत्त्वज्ञानी बरेच दष्टिकोन मांडलेले आहेत जे एक दुसन्यापेक्षा विसंगत आहेत. एखाद्या तत्त्वज्ञानाच्या विचारांचे मोल बौद्धिक भूमिकेतून ठरविले जाते आणि हे गरजेचे नसते की त्यात सदिच्छा आणि करुणाभाव असे तत्त्व अंतर्भूत असावेत. याउलट भगवान बुद्धाची शिकवण लोकांसाठी कोरडे तत्त्वज्ञान नव्हे की, ज्याविषयी बोलताना भावनाशून्य बुद्धी वापरली जाते. ती एक आत्मविकासाची पद्धतशीर प्रणाली आहे. प्रेम, निस्वार्थता आणि करुणेवर केंद्रित झालेली आहे.
बौद्धधम्म काही प्रमाणात एक तत्त्वज्ञान सुद्धा आहे. ज्यात मनुष्याचे मूलगामी कर्म आणि वर्तन याचे वर्णन केलेले आहे तसेच जीवनाचा स्वभाव विश्लेषित केलेला आहे. मागील पारंपरिक मान्यतामध्ये अडकून न पडता जे पुरातन काळातील पुराणकथांवर आधारीत आहेत) कशाप्रकारे आपण एक अर्थपूर्ण धार्मिक जीवन जगू शकतो याचा मार्ग धम्म सुचवितो. भगवान बुद्धाची आम्हाला एका बुद्धिवादी, उदात्त जीवन जगण्याच्या मार्गाकडे घेऊन जाण्याची आणि आपल्या मानवी बुद्धिमत्तेचा सर्वाच्या कल्याणासाठी वापर करण्याची मनिषा आहे. म्हणून बौद्ध जीवन मार्ग सर्व काळासाठी आणि कोणत्याही समाजात व देशात रास्त आणि व्यवहार्य स्वरूपाचा आहे. ती सुसंगतपणाला चालना देतो आणि इतर धर्माच्या अनुयायांना त्रस्त करीत नाही किंवा त्यांच्याबद्दल द्वेषभाव निर्माण करीत नाही.
बौद्धधम्म प्रज्ञा संपत्तीचा विपुल साठा आहे. जो दु:खी मानवतेसाठी असिम प्रेम आणि खोल करुणेने प्रेरित होऊन मोठ्या सखोल संशोधनाद्वारे राजपुत्राने शोधून काढला आहे. हे संशोधन प्रदीर्घ कालावधीत पार पाडले गेले आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत बुद्धधम्म स्वत:ला मानवतेचा आणि सर्वच प्राणीमात्रांच्या फार मोठ्या व्यापक समस्येला म्हणजे दु:खाला विचारात घेत असल्याचे संबोधतो आणि तो अशाप्रकारची पद्धती कथन करतो ज्यामुळे सर्वांना दु:ख आणि लोभातून मुक्त होता येईल. बुद्धधम्माला एक उचित मानसोपचार पद्धती ‘ म्हणूनही संबोधता येऊ शकते.
Namo buddha