जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात या शिळेवर संस्कृत आणि नागरी लिपीत तिसऱ्या शतकातील बुद्धवचने

हजारो वर्षांपूर्वी व्यापारी, यात्रेकरू व प्रवासी यांचा सिल्क मार्गावरील रस्ता पाकिस्तानच्या स्वातच्या खोऱ्यातून जात होता. अनेक बौद्ध स्थळे, स्तूप, विहार, लेणी, पाषाण लेख यांची रेलचेल या स्वातच्या खोऱ्यात आहे. १६० चौ. किलोमीटर परिसर असलेल्या या खोऱ्यात ४०० पेक्षा जास्त स्तूप आणि विहार आहेत.

पाकिस्तानमधील या स्वात खोऱ्यात मिंगोरा येथील शाखोराई गावाजवळ मोठ्या शिळेवर संस्कृत भाषेतील काही बुद्ध वचने नागरी लिपीत कोरलेली आढळतात. त्याचा अर्थ काय हे गावकऱ्यांना आजपर्यंत माहीत नव्हते. इटालियन पुरातत्ववेत्ते डॉ. लुका ओलीव्हरी यांनी सांगितले की ही वचने तिसऱ्या शतकातील आहेत व त्यांचे भाषांतर १८९६-९७ च्या दरम्यान करण्यात आले. या तीन वचनांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे.

या शिळेवर संस्कृत आणि नागरी लिपी

१) या जगात सर्व काही अनित्य आहे. सृष्टीच्या नियमानुसार जे जन्मले आहे ते काही काळाने नष्ट होणार आहे.

२) यास्तव वाईट कर्म करू नका. सद्गुणांची कास धरा आणि यासाठी मनाला ध्यान मार्गाने शुद्ध करा.

३) जो मनुष्य बुद्धांची ही वचने ध्यानी ठेवून मार्गक्रमण करेल, त्याच्याकडून शरीराने व मनाने कोणतेही वाईट कर्म होणार नाही. त्रिरत्नानां शरण गेल्याने अहर्तांनी शिकविलेल्या मार्गावरूनच त्याचे जाणे होईल.

असा हा बुद्धांचा सर्वकालीन उपदेश आजही या पृथ्वीवरील मनुष्यास मार्गदर्शक ठरत असून भविष्यात ही मार्गदर्शक ठरेल. आजही चीन आणि जपान मधील पर्यटक येथे येऊन या बुद्ध वचनांचे दर्शन घेतात. नतमस्तक होतात. मात्र या उपदेशाचे महत्व व समजून घेण्याची कुवत पाकिस्तानकडे नसल्याने त्यांना या गोष्टींचे मोल कळत नाही.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *