लेणी

बौद्ध धम्मात लेण्यांचे एवढे महत्त्व का ?

सुरूवातीला भिक्खूंना राहण्यासाठी खास सोय नव्हती. सुरूवातीचे भिक्खू रानावनात उघड्यावर किंवा झाडाखाली, डोंगरकपारी, गुहेत वगैरे ठिकाणी राहत असत. मगधच्या बिंबिसार राजाने, “गावापासून फार दूर नाही आणि अगदी जवळही नाही; लोकांना जाण्यायेण्यास सोयिस्कर, पण त्याचबरोबर एकांतवासास योग्य अशा आपल्या राजगृहाजवळील वेळूवन विहाराचे धम्मदान तथागतांना आणि त्यांच्या संघाला केले. संघास मिळालेला हा पहिला विहार.

त्यानंतर अनेक विहार संघास धम्मदान करण्यात आले. तथागतांनी भिक्खुसंघास पाच प्रकारच्या निवासस्थानी राहण्याची सुचना केली होती. ते पाच प्रकार म्हणजे १) विहार २) अध्यायोग (शिखर असलेले मोठे घर) ३) पासाद (मोठे घर) ४) हम्मीय (घराच्या वरच्या माळ्यावरही खोली) आणि ५) गुहा. महाराष्ट्रात हल्ली फक्त ‘लेण्यांच्या स्वरूपात असलेल्या “गुहा” अस्तित्वात आहेत. भिक्खूंच्या निवासस्थानाचे इतर प्रकार महाराष्ट्रातून आता नष्ट झाले आहेत.

बौद्ध शिक्षण पध्दतीत विद्यार्थी शिक्षणासाठी संगारामात जात असे. संगारामात अनेक विद्वान भिक्खू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असे. ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या तत्त्वानुसार अशा संघारामाचे विश्वविद्यालयात रूपांतर होण्यास बौद्ध शिक्षण पध्दतीत भरपूर वाव असे. म्हणूनच बौद्ध शिक्षण पध्दतीतून नालंदासारखी विश्वविद्यालये निर्माण झाली.

बुद्ध धम्म हा ‘शील, समाधी आणि प्रज्ञा’ यावर आधारलेला धम्म आहे. विद्याव्यासंगाबरोबरच सम्यक समाधीसाठी किंवा ध्यानसाधाणा या लेण्यांचा उपयोग केला जाई. व्यापारी मार्गांवर ज्या ज्या ठिकाणी लेणी खोदण्यास योग्य जागा सापडल्या त्या त्या निसर्गरम्य ठिकाणी एक हजारावर बौद्ध लेणी आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे ७० टक्के लेणी इ. स. ३०० च्या अगोदरची आहेत.

2 Replies to “बौद्ध धम्मात लेण्यांचे एवढे महत्त्व का ?

Comments are closed.