इतिहास

आंध्रप्रदेश मधील बौद्ध संस्कृतीचे श्रीकाकुलम

‘श्रीकाकुलम’ हा आंध्रप्रदेश राज्यातील जिल्हा असून एक मोठे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या दीड लाख होती. येथे शालिहूंदम, कलिंगपट्टनम, डब्बका वानी पेटा, नागरी पेटा, जागति मेता अशी प्राचीन बौद्ध संस्कृतीची ठिकाणे आहेत. शालिहूंदम येथे स्तूप आणि चैत्यगृह यांचे अवशेष आहेत. तसेच वोटीव स्तुप आणि शिलालेख सुद्धा येथे आढळले आहेत. येथील म्युझियममध्ये डोकावल्यास बौद्ध शिल्पांचे भांडार असल्याचे दिसून येते.

शालिहुंदम स्तुप अवशेष

आंध्रप्रदेशातील या श्रीकाकुलम जिल्ह्यात कलिंगपट्टनम नावाचे शहर आहे. प्राचीन कलिंग प्रांताचे ते एक उत्कृष्ट बंदर होते. इथल्या बंदरातून प्राचीनकाळी सुवासीक अत्तर, कपडे, मसाले यांचा मोठा व्यापार चालत असे. अनेक देशात हा माल गलबताद्वारे जात असे. हळूहळू ब्रिटिश राजवटीत मात्र हे बंदर निकामी झाले व ते कायमचे बंद करण्यात आले. आता फक्त तिथे ब्रिटिशांनी बांधलेले दीपगृह तेवढे राहिले आहे. येथून जवळच शालिहुंदम व रामतिर्थम अशी प्राचीन बौद्ध स्थळे आहेत.

गुरूभक्तीलाकोंडा येथील मॉनेस्ट्री

रामतिर्थम म्हटल्यावर येथे रामायणाशी संबंधित काही स्थळे असावीत असे वाटेल. पण प्रत्यक्षात रामाचे छोटे देऊळ सोडल्यास येथे फक्त बौद्ध स्तुपांचे अवशेष आहेत. रामतिर्थम येथे एका सरळ रेषेत तीन डोंगर आहेत. दक्षिणेच्या डोंगराला बोधिकोंडा म्हणतात. येथे बौद्ध विहारांचे अवशेष आहेत. रामायणातील रामाचा येथे काहीही संबंध नाही.

गुरुभक्तकोंडा बौद्ध विहार अवशेष

उत्तरेकडील डोंगराला घनिकोंडा म्हणतात. येथील गुहेसमोर सुद्धा बौद्ध स्तूपाचे अवशेष आढळले आहेत. रामायणातील रामाचा येथे काहीही संबंध नाही. आणि मध्य भागातील डोंगराला गुरुभक्तकोंडा असे म्हणतात. येथील डोंगरावर सुद्धा बुद्धविहाराचे अवशेष आढळले आहेत. येथे सुद्धा रामायणातील रामाचा काही संबंध नाही.

श्रीकाकुलम मधील नागवली नदीतील बुद्धमूर्ती, बोधिकोंडा आणि घनिकोंडा पर्वतराजी

बोधिकोंडा येथे असलेले रामाचे छोटे देऊळ तेथील पुरातन अवशेषांवर बांधल्याचे स्पष्ट दिसते. तेथील प्राचीन विटांच्या भिंती याची साक्ष देत आहेत. सम्राट अशोकाच्या प्राचीन कलिंग प्रांतापासून समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सर्व पुरातन अवशेष हे बौद्ध संस्कृतीचे आहेत. आता तुम्हीच विचार करा की अवशेष सगळे बौद्ध संस्कृतीचे आणि स्थळाला नाव मात्र रामतिर्थम. सर्व भारत वर्षात असेच गोलमाल आहे.

विझियानगरम, रामतिर्थंम टेकडीवरील बौद्धस्तुप अवशेष

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)