जगभरातील बुद्ध धम्म

जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य करणारा बौद्ध सम्राट कुब्लाई खान

चंगीझ खान किंवा चंगेझ खान (इ.स. ११६२ – इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी (खान म्हणजे शासक) शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. त्यानंतर चंगेज खानचा नातू कुब्लाई खान हा जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य करणारा सम्राट बनला. त्याच्या काळात दिलेल्या उत्तेजनामुळे बौद्ध धर्म चीनचा राजधर्म बनला होता.

कुब्लाई खान हा मंगोल साम्राज्याचा पाचवा सर्वात मोठा खान शासक होता. तसेच मंगोलांच्या सत्तेखाली सर्व चीन आणला होता. त्याने 1279 ते 1297 पर्यंत राज्य केले. पूर्व आशियातील युआन राजघराण्याचा तो संस्थापक होता. त्याचे राज्य प्रशांत महासागरापासून उरल्सपर्यंत आणि सायबेरियापासून सध्याच्या अफगाणिस्तानापर्यंत विस्तारले गेले, जे जगाच्या वस्तीच्या 20 टक्के क्षेत्राएवढे होते.

तेराव्या शतकात मंगोलांच्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्म पुन्हा ऊर्जितावस्थेत आला. हा तिबेटमधून आलेला लामांचा बौद्ध धर्म होता. कुब्लाई खान केवळ पराक्रमीच नव्हता तर तो राजनीतीतज्ञ आणि धर्म तसेच तत्वज्ञानात विशेष रस घेणारा सम्राट होता. त्या काळात मंगोल सम्राटांना आपल्याकडे ओढण्यासाठी निरनिराळ्या धर्मांत चढाओढ लागली होती.

सुङ् वंशाच्या राजवटीत ताओचा संप्रदाय बौद्ध धर्माला नष्ट करण्याच्या मार्गावर होता. त्यांनी बौद्धांच्या इमारती, शेतजमिनी बळकावल्या. विहारांत आणि मंदिरांत ताओंचे साधू राहू लागले. बौद्ध लोक हतबल झाले होते. चंगीजखानला ते आपले विनंतीपत्र पोहोचवू शकले नाहीत, कारण चंगीजखान लढाया करीत सारखा फिरत होता. ताओच्या लोकांनी बौद्धांच्या निराशाजनक परिस्थितीचा फायदा उठवला. पण चीनवर मंकूखान राज्य करू लागल्यापासून परिस्थिती बदलली. ३० मे १२५४ साली काराकोरम येथे ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्धांची एक बैठक बोलावण्यात आली. त्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम ‘जगात एकाच देवाचे अस्तित्व आहे’ या विषयावर दोघे मिळून विजयी झाले.

नेपाळी कलाकार अरानिको (1245–1306 CE) यांनी मंगोल शासक कुब्लाई खान यांचे काढलेले हे पोर्टेट आहे. सध्या हे पोर्टेट तायवानची राजधानी तायपाई येथील राष्ट्रीय पॅलेस संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

देवाचे अस्तित्व गृहित धरूनच हा वाद झाला होता. बौद्ध देव मानत नसल्यामुळे त्यांत त्यांनी विशेष भाग घेतला नाही. इ.स .१२५५ साली काराकोरम येथे दुसरी परिषद भरविली गेली. त्यात बौद्धांतर्फे शाओ – लिन येथील फुयु याने भाग घेतला होता. त्या वादविवादात ताओंचा पराभव झाला. मंकुखानने शाही फर्मान काढले की, ताओंच्या लोकांनी कब्जा केलेली.बौद्धांची मालमत्ता बौद्धांना परत द्यावी. पण ताओंनी ती मालमत्ता परत केली नाही. म्हणून पुढच्या वर्षी इ.स. १२५६ साली दसरी परिषद भरविण्यात आली. पण त्या परिषदेत भाग घेण्यासाठी ताओंचे लोक आले नाहीत. ताओंचे न येणे म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य करणे होय, असे मंकूखानने घोषित केले आणि बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व मान्य केले.

हे पण वाचा : आशिया खंडातील १८ महान बौद्ध सम्राट आणि त्यांचे कार्य

तो म्हणाला, “ज्याप्रमाणे हाताच्या तळव्यातून बोटे बाहेर येतात त्याप्रमाणे बौद्ध धर्म हा हाताचा तळवा आहे आणि इतर संप्रदाय त्यातून निघाले आहेत. ताओंच्या आग्रहामुळे आणखी एक परिषद धर्मचर्चा करण्यासाठी बोलावली गेली. असल्या परिषदांना मंकूखान आता कंटाळला होता. त्याने आपला धाकटा भाऊ कुब्लाई खान याला परिषदेत भाग घेण्यासाठी पाठविले. परिषदेत ३०० बौद्ध भिक्खूनी आणि २०० ताओच्या लोकांनी भाग घेतला होता. बौद्धांच्या बाजूने शाओ – लिनचा न – मो , पश्चिमेकडील देशातून एक राजगुरू आणि तिबेटचा भिक्खू फङ् – पा यांनी भाग घेतला होता. फङ् – पा ( मतिध्वज ) हा केवळ १९ वर्षांचा होता. पण तो इतका प्रतिभाशाली होता की, ती सर्व परिषद त्याने एकट्याने गाजविली.

फङ्-पाच्या अमोघ वक्तृत्वाने आणि त्याच्या धर्म समजावून सांगण्याच्या धाटणीने बौद्धांचा त्या परिषदेत विजय झाला. ताओंचा पराभव झाला आणि त्यांच्या १७ पुढाऱ्यांना मुंडण करून बौद्ध भिक्खू व्हावे लागले. बौद्धांना त्यांची २३७ धार्मिक स्थळे परत मिळाली. कुब्लाई खान बौद्धांचे श्रेष्ठत्व मान्य करून स्वतः बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बौद्धांना बदनाम करणारे ताओंचे सर्व ग्रंथ नष्ट केले. फङ् – पाची इ.स .१२६० साली राजगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. कुबलाई ‘ खानच्या सर्व साम्राज्यातील बौद्धांचा प्रमुख म्हणून त्याला मान्यता मिळाली. कुब्लाई खानने तिबेटशी विशेष नाते जोडले आणि तेव्हापासून तिबेटचे भिक्खू चीनमध्ये जाऊन धर्माचे प्रचार – प्रसाराचे काम करू लागले.

हे पण वाचा : भारतातील या तीन सम्राटांनी बुद्ध धम्मासाठी केलेले महान कार्य

फङ् – पाने मंगोल साम्राज्यातील सर्व भाषांसाठी एक स्वरमाला निर्माण केली. कुब्लाई खानने दिलेल्या उत्तेजनामुळे बौद्ध धर्म चीनचा राजधर्म बनला होता. पण तो बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केलेल्या ग्रंथांवर आधारलेला बौद्ध धर्म नसून तो तिबेटियन भोट भाषेत भाषांतर केलेला लामांचा बौद्ध धर्म होता. अशा त-हेने तिबेटचा बौद्ध धर्म चीनमध्ये गेला आणि फङ्-पाची नियुक्ती राजगुरू म्हणून करण्यात आली.

कुब्लाई खानच्या आज्ञेप्रमाणे चिनी त्रिपिटक एकत्र करून ते इ.स .१२८७ साली छापले गेले. सर्व चिनी बौद्ध ग्रंथ तिबेटच्या ग्रंथांशी जुळवून पाहून त्यांची संस्कृत नावे चिनी ग्रंथांना दिली गेली. कुब्लाई खानचे त्यावेळच्या जगातील सर्वात जास्त माणसांवर अधिराज्य होते. मंगोल लोकांचा रानटीपणाचा शिक्का त्याने पुसून टाकला होता.

मार्को पोलो आणि कुब्लाई खान

मार्को पोलो हा व्हेनिस प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा मंगोल साम्राज्याच्या का़ळात चीनला भेट दिली व परतीच्या वाटेवर भारत व इतर अशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन युरोपपुढे केले. त्याने आपल्या भ्रमंतीवर अनेक पुस्तके लिहिली. मार्को पोलोने आपल्या प्रवास वर्णनात कुब्लाई खान बौद्ध धर्मीय असल्याचे सांगितले.

मार्कोचे विविध भाषांचे ज्ञान, त्याची आकलनशक्ती, प्रवासातील माहितीने प्रभावित होऊन कुब्लाई खानने मार्कोला सरकारी नोकरीत ठेवले. १७ वर्षे चीनमध्ये राहिलेला मार्को १२९५ साली व्हेनिसला परत आला. तो इ.स .१२७५ ते १२९२ या काळात चीनमध्ये होता. तो म्हणतो, “कुब्लाई खानने वृद्ध सुशिक्षित लोकांसाठी, निराधार लोकांसाठी, बेवारशी मुलांसाठी आणि रोग्यांसाठी मदत केंद्र स्थापन केली होती. कुब्लाई खान ३० हजार गरीब लोकांना दररोज दान देत असे.

मार्को पोलो आणि कुब्लाई खान.

कुब्लाई खानच्या काळात श्रीलंकेहून भगवान बुद्धांच्या अस्थी चीनमध्ये नेण्यात आल्या. त्यांचा स्वतः कुब्लाई खानने मोठ्या श्रद्धेने स्वीकार केला. इसवीसन १३६८ साली मंगोल वंशाचा शेवट झाला. परंतु मंगोलियामध्ये बुद्ध धम्माचा शेवट झाला नाही. आजही मंगोलियामध्ये बहुसंख्य बौद्ध आहेत.

संदर्भ – बौद्ध संस्कृती – राहुल सांकृत्यायन
जगातील बुद्ध धम्माचा इतिहास – मा.शं.मोरे

-टीम धम्मचक्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *