ब्लॉग

बौद्धशिक्षण प्रणाली व सांस्कृतिक व्यवहार

मुलांना नैतिकता आणि आचारसंहिता शिकविणा-या धार्मिक शिकवणुकीचा परिचय करून देण्यासाठी चित्रे, स्पष्टीकरणात्मक उदाहरणे, धार्मिक चिन्हे आणि मजेदार वाटतील अशी बुद्धधम्म ग्रंथातील आख्यायिका आणि गोष्टी ( जातक कथा ) यांचा वापर करणे हा एक परिणामकारक मार्ग आहे. ही पद्धत ब-याच लोकांना आवडू शकते आणि विशेषतः लहान मुलांना, आणि यामुळे बुद्धधम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होऊ शकते.

मंचकावर काही ( नाट्य ) प्रयोग किंवा भगवान बुद्ध आणि आर्यश्रावकांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण करूनसुद्धा लहान मुलांच्या मनावर चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा (प्रभाव) परिणाम निर्माण करण्यास मदत होऊ शकते. मुलांना योग्य वळण लावण्यासाठी प्रथम आईवडिलांनी आदर्शानुसार जगून त्यांच्यासाठी उदाहरण घालून दिले पाहिजे. अयोग्य आईवडिलांनी योग्य आणि चांगल्या मुलांची अपेक्षा करणे हे अगदीच अशक्य आहे. शिवाय कर्मचेतनेमुळे आईवडिलांच्या गुण दोषांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. जबाबदार पालकांनी याची खबरदारी घ्यावी की, आपली नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये मुलांमध्ये प्रक्षिप्त होणार नाहीत .

भगवान बुद्धाने सांगितले आहे की, कोणतीही परंपरा किंवा चालरीत ( रूढी ) आचरणासाठी उपयोगी आणि अर्थपूर्ण आहे किंवा नाही हे तपासून पाहिल्याशिवाय तिला स्वीकारू नका किंवा नाकारूही नका. जेव्हा व्यक्ती अर्थपूर्ण बौद्ध जीवन जगण्यासाठी धम्माचा अभ्यास करते तेव्हा ती या चालीरीतींना ओघानेच कमी महत्त्व देऊ लागते. भगवान बुद्ध म्हणतात की, मनाला शिकविण्यासाठी व वळण लावण्यासाठी आपण कोणतीही पद्धती उपयोगात आणत असलो तरी आपला दृष्टिकोन त्या माणसासारखा असावा जो नदी पार करण्यासाठी तराफ्या ( नावे ) चा उपयोग करीत असतो. नदी पार केल्यानंतर तो त्या तराफ्याबद्दल कसलीही आसक्ती नाही ठेवत मात्र आपला प्रवास कायम सुकर ठेवण्यासाठी त्यास नदीच्या किना-यावरच सोडून देत असतो. अगदी त्याचप्रमाणे सांस्कृतिक व्यवहारांना मनात प्रेरणा निर्माण करण्याची साधने समजावे, तेच आपले ध्येय किंवा साध्य आहे असे समजू नये.

बौद्ध सांस्कृतिक व्यवहार हे देशपरत्वे भिन्न भिन्न आहेत. जेव्हा आपण हे पारंपरिक व्यवहार पार पाडत असतो तेव्हा आपण ही काळजी घेतली पाहिजे की, त्या परंपरा बुद्धधम्माचा आवश्यक भाग समजू नये. उदाहरणार्थ, आपण असा विचार करू नये की, हा चिनी बुद्धधम्म आहे, हा श्रीलंकेचा बुद्धधम्म आहे, हा जपानी बुद्धधम्म आहे, हा थाई बुद्धधम्म आहे, हा बर्मी ( म्यानमार ) बुद्धधम्म आहे किंवा हा तिबेटी बुद्धधम्म आहे. कारण यामुळे केवळ विसंगती, भेदभाव आणि गैरसमजुती निर्माण होत असतात. तसेच तथाकथित बौद्ध नेत्यांपासून आपण सावध राहिले पाहिजे, जे नाना प्रकारचा जादू – टोणा, दैवी शक्ती, गूढ आणि पराप्राकृतिक शक्तीशी संबंधित व्यवहार आणि संकल्पना बुद्धधम्मात अंतर्भूत करतात आणि स्वतःच्या स्वतंत्र बौद्ध लेबल्स ( Buddhist Lables ) च्या नावाखाली अमलात आणून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करीत असतात. अशा प्रकारचे सदसविवेकबुद्धीला धरून नसणारे तत्त्वहीन वर्तन करणे म्हणजे भगवान बुद्धाने याबद्दल जे काही सांगितले आहे त्याचा अनादर करणे होय.

बौद्धांचा आणखी एक सामान्य संस्कार आहे. गृहप्रवेशाच्या निमित्ताने आशीर्वाद ग्रहण केला जाणे, जेव्हा लोक नवीन बांधलेल्या घरात राहण्यासाठी जातात किंवा एका घरातून दुस-या घरात राहण्यासाठी जातात तेव्हा भिक्षूना बोलावून सुत्तपठण आणि आशीर्वाद ग्रहण करण्याचा कार्यक्रम ठेवणे हा बौद्धांचा एक सामान्य संस्कार आहे. यामुळे जे घरात राहतात त्यांचे आध्यात्मिकदृष्ट्या संरक्षण होते आणि घरात शांततामय वातावरण तयार होते, ज्यामुळे सुख, शांती, आणि परस्परातील सुसंवाद व ऐक्य टिकून राहण्यास, त्याची वाढ होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे असाच ( सुत्तपठण व आशीर्वाद ग्रहण करण्याचा कार्यक्रम जेथे नवीन उद्योगधंदा सुरू केला जाणार आहे त्या ठिकाणी किंवा उद्योगधंद्याच्या सुरुवातीला पार पाडला जातो.

संदर्भ:- बुद्ध धम्माच का?
डॉ. भदंत के.श्री.धम्मानंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *